Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 26 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६
जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
आमच्या सर्व श्रोत्यांना ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा
****
७४
वा प्रजासत्ताक दिन देशात उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत कर्तव्य पथावर राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह
अल सिसी या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र
मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांनी विजय चौकात राष्ट्रीय
समर स्मारकावर हुतात्म्यांना अभिवादन केलं. कर्तव्य पथावर देशाच्या
विविधतेचं दर्शन घडवणारं संचलन पार पडलं. विविध राज्यांचे, मंत्रालयांचे चित्ररथ, वेगवेगळे सांस्कृतिक नृत्य, लष्कर, नौदल आणि वायूसेनेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी यावेळी देशवासियांचं लक्ष वेधलं.
आदीशक्तीचा जागर करणारा, साडे तीन शक्तिपीठांचं दर्शन घडवणारा महाराष्ट्राचा
चित्ररथ या संचलनात सहभागी झाला होता.
****
मुंबईत
शिवाजी पार्क इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी
पोलिस दलाच्या विविध पथकांनी संचलन केलं.
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा या शासकीय निवाससस्थानी ध्वजारोहण केलं. भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहोचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे.
ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट होऊया, अशा
शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या
शुभेच्छा दिल्या.
नागपूर
इथं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. स्वातंत्र्याच्या
अमृत काळाचा उपयोग राज्याच्या विकास काळासाठी आपण करणार असून, सामान्य माणसाला पुढे घेऊन जाण्याची आपली भूमिका असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
मराठवाड्यात
सर्वत्र ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. विविध शाळा, महाविद्यालयं,
शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन चिरायू होवो, अशा घोषणांसोबत
ध्वजारोहण झालं.
औरंगाबाद
इथं पोलिस मुख्यालयात पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
झालं. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं
नागरिकांनी सर्व भेदभाव विसरुन एक समानतेनं सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर
राहण्याचं आवाहन भुमरे यांनी यावेळी केलं. ते म्हणाले..
या प्रजासत्ताक दिनाच्या
अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करतो की, जात, धर्म,वंश,लिंग हे सर्व भेदभाव विरसुन
एक समानतेने सर्वांना समान संधी मिळून देण्यासाठी अविरत रहावे. आता तुम्ही आम्ही सर्वजण
मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्याबरोबरच
आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो. याची मला खात्री आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
दरम्यान,
औरंगाबाद शहरातल्या विविध शाळा, महाविद्यालयं, सामाजिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयांत प्रजासत्ताक दिन
साजरा करण्यात आला. यानिमित्तानं प्रभात फेरी, सांस्कृतिक
कार्यक्रम, देशभक्तिपर गीतांसह लेझीम, बॅँड,
परेड आदी कार्यक्रम पार पडले.
****
हिंगोली
इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी
यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री सत्तार यांनी उपस्थितांना व्यसनमुक्ती, तंबाखू मुक्तीची शपथ दिली.
****
उस्मानाबाद इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर पालकमंत्री तानाजी
सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संविधानाने दिलेले अधिकार आणि
कर्तव्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी, असं त्यांनी यावेळी केलेल्या भाषणात नमूद
केलं. बालविवाह प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी बालविवाह मुक्त उस्मानाबाद
जिल्हा हा उपक्रम राबवणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं.
****
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या
हस्ते, बीड इथं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते, लातूर इथं जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते, तर परभणी इथं अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या
हस्ते ध्वजारोहण झालं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं राष्ट्रीय सेवा योजना
शिबिरात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण
अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या हस्ते काल या शिबिराचं उद्घाटन झालं. यावेळी कोरडे यांनी बालविवाह समस्या आणि अडचणी या विषयावर
मार्गदर्शन केलं. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्यात
आली.
//**********//
No comments:
Post a Comment