Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जानेवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
· पर्यावरण
संरक्षणासाठी ई कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त.
· सर्वसामान्य
नागरिक आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत असल्याची मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची ग्वाही; औरंगाबाद इथल्या निरंकारी सत्संगात मुख्यमंत्री सहभागी.
· औरंगाबाद
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची तयारी पूर्ण-मतदान पथकं साहित्यासह मतदान केंद्रावर दाखल.
आणि
· मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात वडीकाळ्या इथं जनजागृती फेरी.
****
पर्यावरण
संरक्षणासाठी ई कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या
९७ वाव्या भागातून त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. ई कचऱ्यावर विविध प्रक्रिया
करून त्यापासून सुमारे १७ प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात. यामध्ये सोने, चांदी,
तांबे आणि निकेल यांचाही समावेश आहे. त्यामुळे ई- कचऱ्याचा योग्य वापर झाला पाहिजे
असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.
भरड
धान्ये आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे निरोगी जीवनासाठी
सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात योगासह भरड धान्यांचा जीवन शैलीत अंगीकार करावा असं आवाहन
पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय
योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्हीबाबतचा निर्णय घेतला असल्याचं
पंतप्रधानांनी सांगितलं. G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्यांपासून
तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स, सीरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली. देशाचा हा
प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी, आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार
आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
देशातल्या
पाणथळ जागांची संख्या आता ७५ झाली असून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक समुदायांचं
पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांचही पंतप्रधानांनी आजच्या
मन की बातच्या माध्यमातून अभिनंदन केलं.
प्रजासत्त्ताक
दिनाच्या औचित्यानं सादर झालेल्या दिमाखदार पथसंचलनाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
****
प्रजासत्ताक
दिनाचा समारोप सोहळा- बिटींग द रिट्रीट ला नवी दिल्लीत प्रारंभ झाला आहे. विजय चौकात
सुरू असलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सैन्य
दलाची विविध बॅण्डपथकं भारतीय शास्त्रीय संगीतातील रागदारीवर आधारित सुरावटी या सोहळ्यात
सादर करत आहेत.
****
सर्वसामान्य
नागरिक आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाशिक इथं श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल
ट्रस्टतर्फे गेले पाच दिवस सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सवाचा आज मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख
अण्णासाहेब मोरे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना औषधी वनस्पतींची माहिती मिळते,
शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळतं, तसंच पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठं पाठबळ
मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. राज्यातील अडचणीत असणाऱ्या
६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत दिली असल्याचंही शिंदे
यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातील बिडकीन इथं आयोजित ५६ व्या निरंकारी वार्षिक संत सत्संग सोहळ्याला मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आज हजेरी लावली. या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांशी मुख्यमंत्र्यांनी
संवाद साधला. जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप
जैस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून
समाजाला दिशा देण्याचे काम संत करत असतात. निरांकारी मंडळातील साधक देखील आपल्या गुरूंच्या
शिकवणीनुसार निस्वार्थीपणे अखंड सेवाभाव जपण्याचा प्रयत्न करतात असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी
काढले.
****
सकल
हिंदू समाजाच्या वतीने आज मुंबईत ’हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ‘लव्ह जिहाद,
तसंच धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा, या मागणीसाठी हा मोर्चा
काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये भाजपा आणि शिंदे गटाचे प्रवीण दरेकर, खासदार मनोज
कोटक, आशिष शेलार, नितेश राणे, सदा सरवणकर, किरण पावसकर आदी नेत्यांच्या नेतृत्वात
शेकडो नागरिक सहभागी झाले.
****
दरम्यान,
लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरू असून, त्या माध्यमातून आपली राजकीय
पोळी भाजून जातीजातीत तेढ निर्माण केली जात आहे, असं विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित
पवार यांनी म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या कासेगाव इथं विरांगना इंदुमती पाटणकर
यांच्या स्मारकाचं उद्धाटन आज पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. धर्मनिरपेक्ष
या शब्दाला आज तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, हे देशाच्या दृष्टीने अतिशय
अडचणीचं होणार असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रानं
जाती निर्मूलनामधे महत्त्वाची भूमिका बजावली असून राज्यातील प्रत्येक जातीने, धर्माने
या निर्मूलनात सहभाग घेतल्याचं प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर
सुखदेव थोरात यांनी केलं आहे. वंचितांचे वर्तमान या आपल्या पुस्तकावरच्या एका चर्चासत्रात
ते नागपूर इथं आज बोलत होते. या पुस्तकात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि राजकीय घटकांची
मुद्देसूद माहिती असून भारत सरकारच्या राष्ट्रीय नमूना सर्वेक्षणाची माहिती आणि आकडेवारी
वापरात घेऊन वाचकांना माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
नाशिक
पदवीधर निवडणूकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक
कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज
नाशिक इथं माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. हा निर्णय पक्षाच्या वतीने नसून स्थानिक
कार्यकर्त्यांच्या पातळीवर घेण्यात आला असल्याचं, विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
****
औरंगाबाद
विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून सर्व मतदान पथकं
साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचली आहेत. निवडणुकीसाठी जिल्हानिहाय पुरेसा पोलीस बंदोबस्त
ठेवण्यात आला आहे. मतदान उद्या ३० जानेवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार
आहे. विभागात असलेल्या २२७ मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रावर
मतदारांना मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येणार नाही.
मतदान प्रक्रियेचं अखंडीतपणे व्हिडीओग्राफी
तसंच वेबकास्टींग केले जाणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती
करण्यात आली आहे. मतदारांनी मतदानासाठी मतपत्रिकेसोबत दिल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाच्या
स्केचपेनचाच वापर करावा. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एक हा अंक
नमूद करावा. उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम दर्शवणं ऐच्छिक आहे. एका पेक्षा
जास्त उमेदवारांच्या नावासमोर एक हा अंक नमूद करू नये, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून
करण्यात आली आहे.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी गत महिनाभरापासून साखळी उपोषण करत असलेल्या जालना जिल्ह्यातल्या
वडीकाळ्या इथल्या ग्रामस्थांनी आज गावातून आरक्षण जनजागृती फेरी काढली. गावातील बालगोपालांसह
ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येनं या पायी फेरीत सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी
जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसह आरक्षणाची मागणी केली. दरम्यान,
वडीकाळ्या ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळानं दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची भेट घेत आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु
यावर काहीच तोडगा न निघाल्यानं वडीकाळ्या ग्रामस्थांनी येत्या पाच फेब्रुवारीपासून
आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
सोलापूर
जिल्ह्यातल्या बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या बेहिशोबी मालकत्तेची चौकशी
करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी यासंदर्भात न्यायलयात याचिका
दाखल केली होती, लाचलुचपत विभागाकडे तक्रार करुनही तक्रारीची चौकशी होत नसल्याच्या
पार्श्वभूमीवर आंधळकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
****
दक्षिण
आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत
भारत आणि इंग्लंड संघात सध्या अंतिम सामना सुरू आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून
इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंड संघाच्या
१० षटकांत पाच बाद ३९ धावा झाल्या होत्या.
दरम्यान,
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुरुषांच्या तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
दुसरा सामना आज सायंकाळी सात वाजेपासून लखनऊ इथं खेळला जाणार आहे. रांची इथं झालेला
पहिला सामना जिंकून न्यूझीलंड संघ मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment