Thursday, 26 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.01.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 26 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

 

आमच्या सर्व श्रोत्यांना ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

ठळक बातम्या

·      प्रजासत्ताक दिनाचा दिल्लीत कर्तव्य पथावर  मुख्य सोहळा, विजय चौकात सकाळी साडे दहा वाजता संचलनाला प्रारंभ

·      संविधानात नमूद आदर्शांचं देशाला कायम मार्गदर्शन - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

·      ६ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित, प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांना पद्मविभूषण, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, आणि गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तर समाजसेवेसाठी दादा इदाते, साहित्यिक डॉक्टर प्रभाकर मांडे तसंच रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

·      सैन्य दलासाठीच्या ४१२ शौर्य पुरस्कारांची घोषणा, सहा कीर्ती चक्र आणि १५ शौर्य पदकांचा समावेश

·      ९०१ अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर, राज्यातील ३१ पोलीस अधिकाऱ्यांसह १४० पोलिस कर्मचाऱ्यांचा गौरव

·      पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या तारखेत बदल

·      पहिलं दलित स्त्री आत्मचरित्र लिहिणाऱ्या साहित्यिक शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं निधन

आणि

·      सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना जोडीची ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक

 


सविस्तर बातम्या

७४ वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा दिल्लीत कर्तव्य पथावर होणार असून, विजय चौकात सकाळी साडे दहा वाजता या संचलनाला प्रारंभ होईल. या सोहळ्यात इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. काल राष्ट्रपती भवनात अल सिसी यांचं औपचारिक स्वागत करुन त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

****

संविधानात नमूद आदर्शांनी देशाला कायम मार्गदर्शन केल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्या बोलत होत्या. संविधानाला अंतिम रुप देणारे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा देश कायम ऋणी राहील, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं. त्या म्हणाल्या...

 

हमारा देश बाबासाहेब भीमराव आंबेडकर का सदैव ॠणी रहेगा। जिन्होने प्रारुप समिती की अध्यक्षता की, और संविधान को अंतिम रुप देने मे महत्वपूर्ण भुमिका निभाई। हमे इस बात का गर्व है की उस संविधान सभा के सदस्यों ने भारत के सभी क्षेत्रों और समुदायों का प्रतिनिधीत्व किया। संविधान निर्माण मे सभा की पंधरह महिला सदस्यों ने भी योगदान दिया। संविधान मे निहित आदर्शों ने निरंतर हमारे गणतंत्र को राह दिखाई है। इस अवधी के दौरान भारत एक गरीब राष्ट्र की स्थिती से आगे बढते हुए विश्व मंच पर एक आत्मविश्वास से भरी राष्ट्र का स्थान ले चुका है।

****

७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल केंद्र सरकारनं पद्म नागरी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये ६ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्काराचा समावेश आहे. या राज्यातील प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांना कला क्षेत्रातून पद्मविभूषण, त्यानंतर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, कला क्षेत्रातील गायिका सुमन कल्याणपूर तसंच विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील दिपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

याशिवाय समाजसेवेसाठी भिकू रामजी उर्फ दादा इदाते, गजानन माने, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी डॉक्टर प्रभाकर भानुदास मांडे, रमेश पतंगे,  कला क्षेत्रासाठी परशुराम खुने, रवीना टंडन, कुमी नरिमन वाडिया यांना तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी राकेश झुनझुनवाला यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

याशिवाय समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसंच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर, एस एम कृष्णा आणि श्रीनिवास वर्धन यांचा पद्मविभूषण तर सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती, संगीतकार कीरावानी, साहित्यिक एस. एल. भैरप्पा कलाकार वानी जयराम यांचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्यवरात समावेश आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये १९ महिला. तर २ अनिवासी भारतीयांचा समावेश आहे.

****

सैन्य दलासाठीचे ४१२ शौर्य पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये चार मरणोत्तर, सहा कीर्ती चक्र, दोन मरणोत्तर सह १५ शौर्य पदकं, एक नौसेना शौर्य पदक, सात वायू सेना पदकं, २९ परम विशिष्ट सेवा पदकं, ५२ अतिविशिष्ट पदकं, दहा युद्ध सेवा पदकं, चार उत्तम कर्तव्य सेना पदकं, ३६ विशेष सेना पदकं, ११ नौसेना विशेष पदकं, ९२ सेना पदकं, १२६ विशिष्ट सेवा पदकं, आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

****

उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं जाहीर झाली आहेत. ९३ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबईचे पोलिस उपमहानिरीक्षक देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुप कुमार सिंग, मुंबईचे वरीष्ठ गुप्तचर अधिकारी संभाजी देशमुख आणि ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांसह १४० पोलिस अधिकाऱ्यांना शौर्य पदकं मिळाली असून, त्यात औरंगाबादचे पोलिस अधीक्षक मनीष कालवानिया, कोल्हापूर इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस हवलदार नामदेवराव यादव यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय सेवेसाठी ६६८ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झालं असून, त्यात महाराष्ट्रातल्या ३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबादचे रमेश काथार आणि हवालदार गोकुळ वाघ यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ४३ जीवन रक्षा पदकंही जाहीर केली. यामध्ये सात जणांना सर्वोत्तम, आठ जणांना उत्तम, तर २८ जणांना जीवन रक्षा पदकं जाहीर झाली आहेत. एखाद्याचा जीव वाचवल्याबद्दल हे पदक दिलं जातं.

४७ अग्निशमन सेवा पदकंही राष्ट्रपतींनी काल जाहीर केली. यापैकी दोन पदकं शौर्यासाठी तर सात पदकं उत्कृष्ट सेवेसाठीची आहेत. ५५ गृहरक्षक पदकं आणि नागरी सुरक्षा पदकंही जाहीर झाली. यामध्ये राज्यातल्या काशिनाथ कुरकुटे, एकनाथ सुतार, परमेश्वर जावडे आणि मोनिका शिंपी यांचा समावेश आहे.

****

पुढील तीन महिन्यात ३० हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन विभागाच्या बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. सध्या निवडणूक आचारसंहिता असल्याने घोषणा करता येत नाही मात्र, या संदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीत प्रारंभी औरंगाबाद जिल्ह्याचा नियोजन विभागाचा आढावा घेण्यात आला त्यानंतर विभागातल्या विविध जिल्ह्यांच्या आढावा घेण्यात आला. यामध्ये लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली.

****

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे. या दोन्ही विधानसभा मतदार संघात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र आता २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला ही निवडणुक पार पडणार आहे. मतमोजणी नियोजित तारखेला २ मार्च रोजी करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेमुळे निवडणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं.

****

आगामी आर्थिक वर्षात नवं महिला सन्मान धोरण जाहीर होणार असून, या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत सहयाद्री अतिथीगृहात राज्य महिला आयोगाचा तिसावा वर्धापन दिन साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी राज्य महिला आयोग सदैव तत्पर असल्याची ग्वाही चाकणकर यांनी दिली.

****

राज्यात आज प्रजासत्ताक दिनापासून महाराजस्व अभियानाला प्रारंभ होत आहे. येत्या ३० एप्रिल पर्यंत राबवण्यात येणाऱ्या या अभियानात, एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणं, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित तसंच बंद झालेले गाडी रस्ते, शेतरस्ते, शिवाररस्ते मोकळे करणं, गाव तिथे स्मशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करुन देणं, ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी, ई-चावडी प्रणालीची अंमलबजावणी, आदी कामं केली जाणार आहेत. महसूल आणि वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय काल निर्गमित केला.

****

उत्तम आरोग्यासाठी योग आणि पौष्टिक तृणधान्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे, त्यामुळे प्रत्येकाने रोजच्या आहारात तृणधान्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा समावेश केला, तर विविध व्याधींपासून व्यक्ती लांब राहू शकतो, असा सूर, जळगाव इथं झालेल्या जिल्हास्तरीय आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेत व्यक्त झाला. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ही कार्यशाळा घेण्यात आली.

****

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत औरंगाबाद इथल्या विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात काल चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण एक हजार २१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकही आज प्रदान करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातही नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काल जिल्ह्यातल्या १७ केंद्रांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत १२ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परभणी इथंही केंद्रीय विद्यालयात झालेल्या चित्रकला स्पर्धे शंभरावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

****

राष्ट्रीय मतदार दिन काल मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला.

मतदार दिन हा लोकशाहीच्या जागराचा सोहळा असल्याचं, ज्येष्ठ मराठी साहित्यिक फ.मु.शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं सरस्वती भुवन महाविद्यालयात, नवमतदारांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ट काम करणारे मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, महाविद्यालयींन विद्यार्थी तसंच विविध स्पर्धांची पारितोषिकं यावेळी प्रदान करण्यात आली.

****

वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या संविधानाने मतदानाचा हक्क दिला आहे. हा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार नोंदणी करावी, असं आवाहन, लातूरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी केलं आहे. त्या काल राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लातूर इथं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.

****

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काल परभणी इथं जिल्हा निवडणूक विभाग आणि शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी यावेळी युवकांना मार्गदर्शन करतांना, जास्तीत-जास्त युवकांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.

****

नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. लोकशाही बळकट करण्यासाठी नवमतदारांनी नोंदणी करून मतदान कर्तव्याचे पालन करावं, असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी यावेळी केलं.

****

जालना इथं निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी मतदार दिनानिमित्त तरुणांना मार्गदर्शन केलं. निवडणूक आयोगाने वर्षातून चार वेळा नवमतदारांना नाव नोंदणीची संधी उपलब्ध करुन दिली असून, नवमतदारांनी त्याचा लाभ घेऊन मतदार नोंदणी अवश्य करावी, असं आवाहन त्यांनी केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश नीती आयोगाने जाहीर केलेल्या आकांक्षीत जिल्ह्यात असून, आगामी अर्थसंकल्पामध्ये जिल्ह्यातल्या प्रकल्पांसाठी भरीव निधी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चितीच्या अनुषंगाने बैठक बोलवण्याची मागणी, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. काल उस्मानाबाद इथं त्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.

****

मराठी साहित्यात पहिलं दलित स्त्री आत्मचरित्र लिहिणाऱ्या साहित्यिक शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं काल सकाळी पुण्यात वार्धक्यानं निधन झालं. त्या शंभर वर्षांच्या होत्या. माज्या जल्माची चित्तरकथा हे त्यांचं आत्मचरित्र विशेष गाजलं. 'नाजुका' ह्या नावानं मुंबई दूरदर्शनवर चित्रमालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्मकथन सादर झालं. हिंदीसह फ्रेंच, तसंच इंग्रजी भाषेत या पुस्तकाचे अनुवाद प्रसिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहवास त्यांना लाभला होता.

****

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सानिया - बोपन्ना जोडीनं ग्रेट ब्रिटनच्या नील स्कूप्स्की आणि यू एस ए च्या देसिरा क्रॉज्जिक या जोडीचा सात - सहा, सहा - सात आणि दहा - सहा असा पराभव केला. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या शनिवारी २८ तारखेला होणार आहे.

****

चित्रपट हे भाषेप्रमाणे अभिव्यक्तीचं माध्यम असून मराठी चित्रपटांनी भाषा संवर्धनाचं मोठं काम केलं आहे, असं प्रतिपादन, 'पाचोळा'चे दिग्दर्शक प्राध्यापक शिव कदम यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाद्वारे, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात, ते काल बोलत होते. मराठी चित्रपटांनी मराठवाडा, विदर्भ, कोकणातील बोली भाषांना योग्य प्रकारे स्वीकारलं आहे, असंही कदम म्हणाले.

****

बालिकांनी उच्च शिक्षण घेऊन अधिकारी व्हावं, असं आवाहन, उस्मानाबादचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी केलं आहे. राष्ट्रीय बालिका दिनानिमित काल उस्मानाबाद इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक मुलीने विविध क्षेत्रात ज्ञान अवगत करावं, शासकीय तसंच सामाजिक संस्थाच्या उपक्रमातून मिळणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन चकोर यांनी केलं.

****

औरंगाबाद इथं पुढच्या महिन्यात होत असलेल्या जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ फेब्रुवारीला शहरात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. औरंगाबाद महानगरपालिका आणि टीम ऑफ असोसिएशनच्या वतीनं होणाऱ्या या स्वच्छता अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन समन्वयक प्रशांत देशपांडे यांनी केलं आहे.

****

No comments: