Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जानेवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
· प्रजासत्ताक
दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण;
पोलिस, अग्निशमन, नागरी सुरक्षा तसंच गृहरक्षक पदकांची घोषणा.
· कसबा
पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत आता २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला मतदान.
· दौंड
इथे एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू हे हत्याकांड असल्याचं निष्पन्न.
आणि
· सानिया
मिर्झा-रोहन बोपन्ना जोडीची ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम
फेरीत धडक.
****
७४
वा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. सायंकाळी
सात वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून राष्ट्रपतींच्या हिंदी आणि
इंग्रजीतल्या भाषणाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. आकाशवाणीवरून भाषणाचा मराठीतून अनुवाद
रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे.
****
उल्लेखनीय
कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं
जाहीर झाली आहेत. ९३ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकं जाहीर झाले
असून, त्यामध्ये मुंबईचे पोलिस उपमहानिरीक्षक देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक
अनुप कुमार सिंग, मुंबईचे वरीष्ठ गुप्तचर अधिकारी संभाजी देशमुख आणि ठाण्याचे पोलिस
उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांसह १४०
पोलिस अधिकाऱ्यांना शौर्य पदकं जाहीर झाली असून त्यात औरंगाबादचे पोलिस अधीक्षक मनीष
कालवानिया, कोल्हापूर इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस हवलदार नामदेवराव
यादव यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी ६६८ पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पदक जाहीर
झालं असून, त्यात महाराष्ट्रातल्या ३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबादचे
रमेश काथार आणि हवालदार गोकुळ वाघ यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी ४३ जीवन रक्षा पदकंही आज जाहीर केली. यामध्ये सात जणांना सर्वोत्तम,
आठ जणांना उत्तम, तर २८ जणांना जीवन रक्षा पदकं जाहीर झाली आहेत. एखाद्याचा जीव वाचवल्याबद्दल
हे पदक दिलं जातं. ४७ अग्निशमन सेवा पदकंही राष्ट्रपतींनी आज जाहीर केली. यापैकी दोन
पदकं शौर्यासाठी तर सात पदकं उत्कृष्ट सेवेसाठीची आहेत. ५५ गृहरक्षक पदकं आणि नागरी
सुरक्षा पदकंही राष्ट्रपतींनी आज जाहीर केली. यामध्ये राज्यातल्या काशिनाथ कुरकुटे,
एकनाथ सुतार, परमेश्वर जावडे आणि मोनिका शिंपी यांचा समावेश आहे.
****
प्रजासत्ताक
दिनाचा मुख्य सोहळा उद्या दिल्लीत राजपथावर होणार आहे. विजय चौकात सकाळी साडे दहा वाजता
या संचलनाला प्रारंभ होईल. या सोहळ्यात इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी हे
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात आज सकाळी अल सिसी यांचं
औपचारिक स्वागत करुन त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
अल सिसी यांच्यात विविध मुद्यावर द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
****
अण्णासाहेब
पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तीक कर्ज आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेत
कर्ज मर्यादा १० लाख रुपयांहून १५ लाखापर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती महामंडळामार्फत
प्रसिद्धीपत्राद्वारे देण्यात आली आहे. मराठा प्रवर्ग आणि ज्या प्रवर्गाकरता स्वतंत्र
महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील उमेदवारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास
विकास महामंडळाच्या योजनांमार्फत उद्योगधंदे उभारण्याकरता आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा
प्रयत्न या योजनांमार्फत केला जाणार आहे. महामंडळामार्फत साडेचार लाखाच्या व्याज मर्यादेत
परतावा आणि व्याज परतावा कालावधी जास्तीत-जास्त ७ वर्ष तसंच व्याजाचा दर जास्तीत जास्त
१२ टक्के इतका असेल असंही पत्रकात म्हटलं आहे.
****
पुण्यातील
कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तारीख बदलण्यात आली
आहे. या दोन्ही विधानसभा मतदार संघात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याची
घोषणा करण्यात आली होती. मात्र आता २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला ही निवडणूक
पार पडणार आहे. मतमोजणी नियोजित तारखेला २ मार्च २०२३ रोजी करण्यात येणार आहे. बारावीच्या
परीक्षेमुळे निवडणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
भोसरी
जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने
एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचालनालय ईडीने
दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायाधीश राहुल रोकडे यांनी अटी शर्तींसह हा निकाल दिला आहे.
कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना अटकेपासून अंतरिम
संरक्षण देतांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितलं होतं, त्यानुसार
खडसे यांनी सत्र न्यायलयात जामिनासाठी अर्ज केला होता.
****
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या जिल्हा माहिती अधिकारी, सहायक संचालक आणि माहिती
अधिकारी पदांसाठीच्या जागेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करतांना तांत्रिक अडचणी येत आहेत,
यामुळे या पदासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी आणि पत्रकारितेच्या पदव्युत्तर
पदवीधारकांनाही यासाठी अर्ज करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
****
पुणे
जिल्ह्यात दौंड इथल्या एकाच कुटुंबातल्या सात जणांचा पाण्यात बुडून मृत्यू हे प्रत्यक्षात
हत्याकांड असल्याचं पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी
श्याम पवार, प्रकाश पवार आणि दोघांना अटक केली आहे. हे चौघं मृतक मोहन पवार यांचे सख्खे
चुलत भाऊ आहेत. आपल्या मुलाच्या अपघाती मृत्यूला मोहन पवार यांचा मुलगा कारणीभूत असल्याच्या
संशयावरून श्याम पवार यानं मोहन पवार, त्यांची पत्नी, मुलगी, जावई, आणि तीन चिमुरड्या
नातवंडांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हे सातही मृतदेह गेल्या सहा दिवसांत भीमा
नदीपात्रात आढळले. दरम्यान, मोहन पवार यांचा मुलगा देखील बेपत्ता आहे त्याचाही शोध
घेतला जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत मिश्र
दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सानिया बोपन्ना जोडीनं ग्रेट
ब्रिटनच्या नील स्कूप्स्की आणि यूएसएच्या देसिरा क्रॉज्जिक या जोडीचा ७-६, ६-७ आणि
१०-६ अशा फरकाने पराभव केला. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या शनिवारी २८ तारखेला होणार
आहे.
****
उत्तम
आरोग्यासाठी योग आणि पौष्टिक तृणधान्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे प्रत्येकाने
रोजच्या आहारात तृणधान्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा समावेश केला, तर विविध व्याधींपासून
व्यक्ती लांब राहू शकतो, असा सूर जळगाव इथं झालेल्या जिल्हास्तरीय आंतरराष्ट्रीय पौष्टिक
तृणधान्य कार्यशाळेत व्यक्त झाला. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय
पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केलं आहे. त्या अनुषंगाने ही कार्यशाळा घेण्यात
आली.
****
‘परीक्षा
पे चर्चा’ या कार्यक्रमाअंतर्गत औरंगाबाद इथल्या विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य
आणि विज्ञान महाविद्यालयात आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण १ हजार
२१२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकही आज प्रदान करण्यात
आले.
परीक्षा
पे चर्चा या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी
आज जिल्ह्यातील १७ केंद्रांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण
विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत १२ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
****
वयाची
अठरा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला आपल्या संविधानाने मतदानाचा हक्क दिला
आहे. हा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने मतदार नोंदणी करावी असं आवाहन
लातूरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी केलं आहे. मुख्य निवडणूक
अधिकारी कार्यालय, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या
संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शिंदे
बोलत होत्या. आपली लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निर्भयपणे आणि कोणत्याही
अमिषाला बळी न पडता सजगपणे मतदानाचा हक्क बजावावा, असंही डॉ शिंदे यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त आज परभणी इथं जिल्हा निवडणूक विभाग आणि शिवाजी महाविद्यालयाच्या
संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे
यांनी यावेळी युवकांना मार्गदर्शन केलं.
****
No comments:
Post a Comment