Monday, 30 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आकाशवाणी औरंगाबाद

योगिता शेटे ठळक बातम्या देत आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. आज हुतात्मा दिनानिमित्त सकाळी ११ वाजता सर्वत्र दोन मिनिटं स्तब्धता पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. नवी दिल्लीतील राजघाट येथिल गांधी समाधी इथं सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे.

****

राज्यातील विधान परिषदेच्या तीन पदवीधर तसंच दोन शिक्षक मतदार संघाच्या जागांसाठी आज मतदानाला सुरूवात झाली. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. औरंगाबाद शिक्षक मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात आहेत.

नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शहरात २९ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात झाली.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिकेत १९ वर्षांखालील भारतीय मुलींच्या क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्याबद्दल संघाला पाच कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केलं आहे. या विजयाबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे.

****

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

***

जी-20 आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचना कार्यकारीणीची पहिली बैठक आज आणि उद्या चंदीगडमध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचनेची स्थिरता आणि एकसंधता वाढवण्याच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होईल.

****

पाचव्या खेलो इंडिया स्पर्धांना आज मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं सुरवात होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर आणि मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या क्रीडास्पर्धांचं उद्घाटन करतील.

***

नांदेड इथं काल आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीनं रंगोत्सव चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शहरातील ८० शाळांच्या माध्यमातून २००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

 

//**********//

No comments: