Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५
जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
७४ वा
प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत.
सायंकाळी सात वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून राष्ट्रपतींच्या
हिंदी आणि इंग्रजीतल्या भाषणाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. आकाशवाणीवरून भाषणाचा
मराठीतून अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे.
दरम्यान,
प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात प्रमुख
पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी हे उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपती भवनात आज सकाळी अल सिसी यांचं औपचारिक स्वागत करुन त्यांना गार्ड ऑफ
ऑनर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल सिसी यांच्यात विविध मुद्यावर
द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
****
प्रजासत्ताक
दिनानिमित्त देशात ९०१ जणांना पोलिस पदक जाहीर झालं आहे. राज्यातल्या ८३ जणांना
शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर झाले आहेत. चार जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती
पोलिस पदक जाहीर झाले असून, त्यामध्ये मुंबईचे पोलिस उपमहानिरीक्षक देवेन भारती,
अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुप कुमार सिंग, मुंबईचे वरीष्ठ गुप्तचर अधिकारी संभाजी
देशमुख आणि ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. तर राज्यातल्या
३९ जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झालं असून, त्यामध्ये औरंगाबादचे
रमेश काथार आणि हवालदार गोकुळ वाघ यांचा समावेश आहे.
गुणवत्तापूर्ण
सेवेसाठी होम गार्ड आणि नागरी संरक्षण पदक देखील जाहीर करण्यात आले. यामध्ये
राज्यातल्या काशिनाथ कुरकुटे, एकनाथ सुतार, परमेश्वर जावडे आणि मोनिका शिंपी यांचा
समावेश आहे.
****
राष्ट्रीय
मतदार दिन आज साजरा होत आहे. 'मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्कीच मतदान
करणार' ही या वर्षीच्या मतदार दिनाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी एकत्र
काम करूया असं त्यांनी ट्विट संदेशात म्हंटल आहे.
आकाशवाणीच्या
वृत्तसेवा विभागाची निवडणूक आयोगानं राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी निवड केली
आहे. देशात मतदार जागृती आणि शिक्षणासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ही निवड
करण्यात आली आहे .
****
पुणे
जिल्ह्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड इथल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल
करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याआधी सहा राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी
२७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, महाराष्ट्रात १२ वीच्या परीक्षा आणि
मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आयोगाने
मतदानाच्या तारखांमध्ये बदल केल्याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार कसबा
पेठ आणि चिंचवड इथल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होईल.
यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दोन मार्च रोजी इतर राज्यांमधल्या
पोटनिवडणुकांसोबतच या दोन मतदारसंघांमध्येही मतमोजणी केली जाईल.
****
यंदाच्या
ऑस्कर पुरस्कारांमध्ये दाक्षिणात्य दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आर आर आर या
चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळालं आहे. बेस्ट ओरिजिनल साँग या
श्रेणीत हे नामांकन आहे. या गाण्याला नुकताच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.
****
महाराष्ट्र
राज्य महिला आयोगाचा तिसावा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या उपस्थितीत होणार आहे. राजकारण, समाजकार्य, प्रशासन या क्षेत्रात
महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी
करण्यात येणार आहे. राज्य महिला आयोग आणि मेटा यांच्यातर्फे संयुक्तपणे महिलांच्या
सुरक्षिततेकरता राबवण्यात येणाऱ्या ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभही यावेळी
करण्यात येणार आहे.
****
नाशिक
जिल्ह्यात यंदा हंगाम पूर्व द्राक्षांची निर्यात सुरू झाली असून, आत्तापर्यंत दहा
लाख टन द्राक्ष विदेशात पाठवण्यात आली आहे. १२५ ते २०० रुपये प्रति किलो
वेगवेगळ्या प्रकारच्या द्राक्षांना भाव मिळत आहे, त्यामुळे ही निर्यात द्राक्ष
उत्पादकांना उपयुक्त ठरली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात येत्या सहा ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या
क्रीडा स्पर्धेचं, तर सतरा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय
धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचं क्रीडा आणि युवक सेवा
संचालनालय आणि उस्मानाबाद क्रीडा अधिकारी कार्यालय, यांनी संयुक्तपणे आयोजित
केलेल्या या स्पर्धांमध्ये, प्रत्येकी सुमारे ४०० खेळाडु भाग घेणार आहेत. यातली
आट्यापाट्यांची स्पर्धा कळंब इथल्या तर धनुर्विद्या स्पर्धा उस्मानाबाद इथल्या
क्रीडांगणावर होणार आहे.
****
No comments:
Post a Comment