Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 January
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ जानेवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
· पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक
आणि शिक्षकांशी संवाद साधणार
· प्रजासत्ताक
दिन देशभर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा, नवी दिल्लीत कर्तव्यपथावर बलशाली आणि
आत्मनिर्भर भारताचं दर्शन
· राज्यातही
विविध कार्यक्रमानं प्रजासत्ताक दिन साजरा, २०२६- २७ पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था
साध्य करण्याचं उद्दिष्ट
· नाकाद्वारे
दिली जाणारी इन्कोव्हॅक कोविड प्रतिबंधात्मक लस बाजारात दाखल
· ऑस्ट्रेलियन
खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताचे रोहन बोपण्णा आणि सानिया
मिर्झा यांचा मुकाबला सुरु
आणि
· भारत
- न्यूझीलंड यांच्यात आज टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रांचीत
खेळला जाणार तर एकोणीस वर्षांखालील महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही
न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध भारताचा सामना
सविस्तर
बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता दिल्लीत तालकटोरा
स्टेडियमवर परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रमाबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्येही उत्सुकता आहे. या कार्यक्रमाबाबत
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथल्या एकलव्य निवासी शाळेचे प्राचार्य नरेश कुमार सकपाळ
यांनी मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले,
आम्हाला अतिशय आनंद होत आहे,
की आता यावर्षीच्या परिक्षा पे चर्चा याची सहावी आवृत्ती पंतप्रधान मोदीजी यांच्याकडून
येत आहे. या वर्षी सुद्धा आमचे विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमाची आतूरतेने वाट पाहत
होते आणि ती प्रतिक्षा आता आमची संपलेली आहे. या अभियानाचा आमच्या ऐकलव्य परिवारातील
सर्व विद्यार्थ्यांना अतिशय फायदा होत आहे. व यापुढे ही होत राहील त्याबद्दल मी पंतप्रधान
मोदीजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
****
७४वा प्रजासत्ताक दिन काल देशभर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात
साजरा झाला. राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी
प्रथमच बलशाली आणि आत्मनिर्भर भारताचं दर्शन घडवणाऱ्या, 'वन झिरो फाईव्ह एमएम इंडियन
फिल्ड गन्स' धडाडून, मानवंदना देण्यात आली. यावेळी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल
फतेह अल सिसी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यानंतर पथसंचलनाद्वारे समर्थ आणि
संपन्न भारताचं गौरवशाली दर्शन घडवण्यात आलं. देशाचं लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक वैविध्य,
आत्मनिर्भर होण्यासाठीची वाटचाल, स्री सक्षमीकरणाचे प्रयत्न, आणि नवभारताचा उदय- या
प्रमुख संकल्पनांचा विस्तार यामध्ये दिसून आला. यावर्षी प्रथमच इजिप्तच्या १४४ सैनिकांच्या
तुकडीनेही आपल्या संचलनात भाग घेतला.
****
राज्यातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या मुख्य शासकीय समारंभात
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. राज्यपालांना पोलीस दलामार्फत
मानवंदना देण्यात आली. तसंच त्यांनी संचलनाची पाहणी केली. सन २०२६- २७ पर्यंत पाच ट्रिलियन
डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या देशाच्या उद्देशास सुसंगत असं एक ट्रिलियन डॉलरची
अर्थव्यवस्था साध्य करण्याचं महत्वाकांक्षी लक्ष्य महाराष्ट्रानं ठेवलं आहे, असं राज्यपालांनी
यावेळी सांगितलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वर्षा या शासकीय
निवाससस्थानी ध्वजारोहण केलं. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना शिंदे यांनी,
आपलं सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले.....
महाराष्ट्राच्या सर्वांगीण
विकासासाठी अतिशय चांगली कामं, पायाभूत सुविधा असतील, राज्यातल्या सर्व समाजघटकांसाठी
योजना असतील, असे अनेक निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण घेतोय. आणि खऱ्या अर्थाने
हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठीचं सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय
घेण्यासाठीचं सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र काम करतायत.
****
नागपूर इथं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेतला.
सामान्य माणसाला पुढं घेऊन जाण्याची सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. ते
म्हणाले,
देशाच्या एकूण जीडीपीच्या
पंधरा टक्के आपण महाराष्ट्रातनं जीडीपी देतो. आणि देशाची जी निर्यात आहे, त्या निर्यातीमध्ये
जवळजवळ बावीस ते पंचवीस टक्के हिस्सा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे. आणि म्हणूनच खऱ्या
अर्थाने आज ज्याप्रमाणे महाराष्ट्र हा प्रगतीकडे चाललेला आहे, ही प्रगती करत असताना,
जो सामान्य माणूस आहे, त्या सामान्य माणसाला सोबत घेऊन या महाराष्ट्रातील दीन-दलित,
गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर अशा प्रत्येकाला या ठिकाणी सोबत घेऊन आपल्याला पुढे
जायचंय.
****
मराठवाड्यातही काल सर्वत्र प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून
आला. विविध शाळा, महाविद्यालयं, शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक
दिन चिरायू होवो, अशा घोषणांसोबत ध्वजारोहण झालं.
औरंगाबाद इथं पोलिस मुख्यालयात पालकमंत्री संदीपान भुमरे
यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नागरिकांनी सर्व भेदभाव
विसरुन एक समानतेनं सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहण्याचं आवाहन
भुमरे यांनी यावेळी केलं. ते म्हणाले..
या प्रजासत्ताक
दिनाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करतो की, जात, धर्म,वंश,लिंग हे सर्व भेदभाव
विरसुन एक समानतेने सर्वांना समान संधी मिळून देण्यासाठी अविरत रहावे. आता तुम्ही आम्ही
सर्वजण मिळून प्रयत्न केल्यास सामाजिक जीवनमान
उंचावण्याबरोबरच आपल्या देशाला सामर्थ्यशाली महासत्ता बनवू शकतो. याची मला खात्री आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना
पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आस्तिककुमार
पाण्डेय यांच्या हस्ते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ.
प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
हिंगोलीत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण
झालं. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्ती, तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.
****
उस्मानाबाद इथं तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर
पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संविधानानं दिलेले
अधिकार आणि कर्तव्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी, असं त्यांनी यावेळी केलेल्या
भाषणात नमूद केलं.
बालविवाह प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी बालविवाह मुक्त उस्मानाबाद
जिल्हा हा उपक्रम राबवणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. ते म्हणाले,
उस्मानाबाद जिल्हा
हा पूर्णपणे बालविवाह मुक्त व्हावा. या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बालविवाह
मुक्त धाराशीव / उस्मानाबाद जिल्हा हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्याचा संकल्प हाती
घेण्यात आला आहे. हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज आहे. तसंच जिल्ह्यातील
स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत हा चिंतेचा विषय आहे. त्याबाबतही आपण जागरुक होऊन स्त्री-भ्रुण
हत्या होणार नाही हा प्रण घेऊया.
****
जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री अतुल
सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेद
विसरुन सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन सावे यांनी केलं.
परभणीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ध्वजारोहण केलं. राज्यात
बालविवाह प्रथेमध्ये परभणी जिल्हा वरच्या क्रमांकावर आहे, जिल्ह्यासाठी ही बाब चांगली
नाही, त्यामुळे आता जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकानं बालविवाहमुक्त परभणी मोहिमेत
सहभागी होणं आवश्यक असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
नांदेडमध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते, बीड
इथं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते तर लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी पी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
नाकाद्वारे दिली जाणारी इन्कोव्हॅक ही कोविड प्रतिबंधात्मक
लस काल बाजारात दाखल झाली. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने ही लस विकसित केली असून,
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख मांडविया तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र
सिंह यांच्या हस्ते ही लस वितरित करण्यात आली. इन्कोव्हॅक ही नाकातून दिली जाणारी जगातली
पहिली कोविड प्रतिबंधक लस आहे. ही लस सरकारी रुग्णालयांमध्ये ३२५ आणि खाजगी रुग्णालयांमध्ये
८०० रुपयांना मिळणार आहे.
****
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन रस्ते अपघात आणि
मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या
सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील, शिफारसपात्र २३३ उमेदवारांपैकी,
प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना नियुक्तीपत्र काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. रस्ते अपघातांवर आळा घालण्यासाठी अपघात प्रवण
क्षेत्रावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
औरंगाबाद इथलं प्रमुख पर्यटन स्थळ असलेला बीबी का मकबरा
काल प्रजासत्ताक दिनापासून दररोज रात्री १० वाजेपर्यंत आकर्षक रोषणाईनं उजळत आहे. भारतीय
पुरातत्व विभागानं काल संध्याकाळी सात वाजता बीबी का मकबरा परिसरात या अंतर्गत महागामीच्या
संचालिका पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांचं ध्रुपदांगी कथ्थक नृत्य सादरीकरण ठेवलं
होतं.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं प्रजासत्ताक दिनानिमित्त औरंगाबादमध्ये
१५० हून अधिक वस्त्यांमध्ये भारत माता प्रतिमा पूजन केलं. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास,
संविधान आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामात - स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग यावर यावेळी माहिती
देण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या उजेड
गावात राष्ट्रपिता महात्मा गांधी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक सलोखा जपत, महात्मा गांधीजींच्या
विचारानं प्रेरित होऊन गेल्या ७० वर्षांपासून ही यात्रा भरत आहे. यात्रेच्या काळात
विविध स्टॉल्स उभारण्यात येतात, तसंच, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर विविध उपक्रमही
राबवण्यात येतात. ३० जानेवारीला महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी, त्यांच्या स्मृतीला
अभिवादन करून यात्रेचा समारोप होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या बिडकीन इथं आजपासून ५६व्या वार्षिक
निरंकारी संत समागमाला सुरुवात होत आहे. सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या उपस्थितीत
होत असलेल्या या समागमाची सुरुवात आज सकाळी शोभायात्रेनं होणार आहे.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या
अंतिम फेरीत भारताचे रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांचा सामना लुईसा स्टेफनी आणि
राफेल माटोस यांच्यासोबत सध्या सुरु आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला पहिला सामना आज रांची इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामना सुरू
होईल. भारतानं नुकत्याच झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा तीन-शून्य
असा पराभव करुन, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे.
****
एकोणीस वर्षांखालील महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेत आज भारताचा उपांत्यफेरीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. दुपारी दीड वाजता
सामन्याला सुरुवात होईल. दुसरी उपांत्य लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार आहे.
स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे.
****
नांदेड शहरातले बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर
गोळीबार करणाऱ्या शूटरला राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. पाच एप्रिल
२०२२ रोजी बियाणी यांची घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाइंड
दहशतवादी हरविंदरसिंह रिंदा हा असून, त्याच्या दोन शार्पशूटरने बियाणी यांच्यावर गोळीबार
केला होता. त्यातील फरार असलेला दुसरा मुख्य शूटर दीपक सुरेश रांगा याला राष्ट्रीय
तपास यंत्रणेने नेपाळ सीमा रेषेवर अटक केली.
****
प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेतर्फे चार विशेष गाड्या
सोडण्यात येत आहेत. या अंतर्गत मनमाड - औरंगाबाद गाडी आज मनमाड इथून सकाळी आठ वाजून
पंचवीस मिनिटांनी सुटेल आणि औरंगाबाद इथं सकाळी साडे अकरा वाजता पोहोचेल. औरंगाबाद
- मनमाड गाडी आज दुपारी बारा वाजता निघेल.
औरंगाबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ही गाडी आज रात्री
आठ वाजता निघून उद्या पहाटे साडे तीन वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल.
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ही गाडी
३० जानेवारी रोजी रात्री आठ वाजता सुटून मुंबई
इथं ३१ जानेवारीला पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल.
औरंगाबाद कोल्हापूर या विशेष गाडीची एक फेरी घेण्यात येत
आहे. ही विशेष रेल्वे औरंगाबादहून आज सकाळी आठ वाजता सुटणार असून, कोल्हापूरला मध्यरात्री
बारा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं
आहे.
****
रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुमंतराव
गायकवाड यांचं काल सकाळी नवी मुंबई इथं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. सुमंतराव गायकवाड
यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं १९६० ते १९६७ असं सात वर्षे कार्याध्यक्ष म्हणून
काम पाहिलं आहे.
****
भगवान बुद्धाच्या अस्थिधातू कलशासह परभणी इथून निघालेल्या
धम्मयात्रेचं आज सकाळी नऊ वाजता औरंगाबादच्या केंब्रीज चौकात आगमन होणार आहे. आंतरराष्ट्रीय
बौद्ध भिक्खू संघ थायलंडच्या ११० बौद्ध भिक्खूंचा यात समावेश आहे. औरंगाबादमध्ये शासकीय
दुध डेअरी समोर भिक्खू संघाद्वारे महापरित्राण पाठ आणि धम्मदेसना आणि भगवान बुद्ध यांच्या
अस्थीकलशाला अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती, समन्वयक डॉ.पवन डोंगरे यांनी दिली.
ही धम्मयात्रा पुढे मुंबईत चैत्यभूमीपर्यंत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment