Tuesday, 31 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारसाठी राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचं असून, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कोणताही भेदभाव न करता काम केलं असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सदनांच्या सदस्यांना संबोधित करताना त्या आज बोलत होत्या. विकासाच्या लाभांपासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारनं काम केलं, त्यामुळे मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रु असल्याचं सरकारचं स्पष्ट मत आहे, त्यामुळे कामकाजात प्रामाणिकपणा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांत देशा थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल इंडियाच्या मदतीने, कायमस्वरूपी आणि पारदर्शक प्रणाली विकसित झाली असल्याचं त्या म्हणाल्या. मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून, आज देशाची उत्पादन क्षमता वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारत पाच तत्वांच्या प्रेरणेनं प्रगती करत आहे. पारतंत्र्याची प्रत्येक खूण, प्रत्येक मानसिकतेतून मुक्ती मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, आयुष्मान भारत योजना, महिला सशक्तिकरण, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यासारख्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.

दरम्यान, २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या संसदेत सादर करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना, यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्रासाठी आशेचा किरण घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.   

***

जागतिक पातळीवर उलथापालथ असूनही भारत, जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. नाणेनिधीनं आज प्रकाशित केलेल्या जागतिक आर्थिक दृष्टीकोनच्या जानेवारी महिन्याच्या आवृत्तीत हे नमूद करण्यात आलं आहे. २०२३ मध्ये भारताचा सहा पूर्णांक एक टक्के या दराने विकास होईल, असं देखील या आवृत्तीत म्हटलं आहे.

***

आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागासाठी माय जी ओ व्ही अॅपद्वारे जिंगल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. नागरिकांच्या मनात आणि हृदयात कायम राहील अशी संस्मरणीय आणि सहज गुणगुणता येल अशी धून तयार करणं, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. सर्वोत्कृष्ट जिंगलला अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत प्रवेशिका देता येतील.

मन की बात कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाच्या औचित्याने, आकाशवाणी तर्फे लोगो अर्थात स्मरणचिन्ह स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. उद्यापर्यंत या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका सादर करता येतील. विजेत्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा अधिक तपशील माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

***

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खातं अनिवार्य करण्यात आलं असून, यासाठी राज्यभरातल्या इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत उद्यापासून १२ फेब्रुवारी पर्यंत मोहिम राबवण्यात येणार आहे. तसंच बँक खातं आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा, गावातल्या टपाल कर्मचाऱ्यांमार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. या मोहिमेराज्यातल्या सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचं बँक खातं उघडावं, असं आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केलं आहे.

***

गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत काल दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी आणि चिन्ना मासे झोरे अशी त्यांची नावं आहेत. फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी 'टी सी ओ सी' अर्थात टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन साजरा करतात. यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत या दोघांना अटक करण्यात आली.

***

औरंगाबाद इथल्या जल आणि भूमि व्यवस्थापन संस्था - वाल्मी इथला प्रशासकीय अधिकरी प्रदिप बाहेकर याला तीस हजार रुपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. वाल्मी कार्यालयाअंतर्गत काम मंजुर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून त्यानं ही लाच घेतली होती.

 

//**********//

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...