Tuesday, 31 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, उद्या अर्थसंकल्प सादर होणार 

·      देशातल्या व्यापार-उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरांवर स्वतंत्र व्यापार मंत्रालयाची निर्मिती करण्याची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी

·      देशातील खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना रोज ३० मिनिटं सार्वजनिक सेवांचं प्रसारण करणं बंधनकारक

·      सरकार आणि निमसरकारी विभागातील १५ वर्षांपेक्षा जुनी नऊ लाखांहून अधिक वाहनं भंगारात काढण्यास मान्यता

·      विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सरासरी ७२ टक्के मतदान

·      पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर

·      एका शिष्येवर बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी

आणि

·      महिलांच्या तिरंगी टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडीजवर आठ खेळाडू राखून विजय

 

सविस्तर बातम्या

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अभिभाषणानं प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर संसदभवन परिसरात काल सर्वपक्षीय बैठक झाली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, प्रल्हाद जोशी, यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळातले इतर सदस्य तसंच संसदेच्या दोन्ही सदनातले विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मात्र काँग्रेस पक्षाचे नेते यावेळी गैरहजर राहिले. अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन सरकारच्यावतीनं यावेळी करण्यात आलं.

बैठकीत विरोधी पक्षांनीही काही मुद्दे आणि प्रस्ताव सरकारकडे सुपूर्द केले. विविध २७ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली. अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचीही काल बैठक झाली.

आज दोन्ही सदनात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. उद्या २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. २०२४ साली सार्वत्रिक निवडणुका होणार असल्यानं यंदाचा अर्थसंकल्प अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या संसद सदस्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय मंत्री नारायण राणे,  राज्यमंत्री भागवत कराड,  कपिल पाटील,  डॉ. भारती पवार, यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातले मंत्री यावेळी उपस्थित होते. संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा, सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा उभी करतानाच महाराष्ट्र सदनातल्या निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय आणि राज्यातल्या विविध विभागातला दुवा म्हणून काम करावं,  असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.          

****

देशातल्या व्यापार-उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर स्वतंत्र व्यापार मंत्रालयाची निर्मिती, तसंच देशांतर्गत व्यापाराचं नवीन धोरण तयार करण्याची मागणी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अर्थसंकल्पाकडून व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अपेक्षासंबंधी आपली भूमिका मांडताना गांधी यांनी, वस्तु आणि सेवा कर-जीएसटी प्रणालीचा पाच वर्षाचा आढावा घेऊन यातील कीचकट प्रणाली दुरूस्त करण्याची, तसंच करांचे दर तर्कसंगत पद्धतीनं कमी करण्याचीही मागणी केली. राज्यात नांदेड, लातूर, जळगांव, गोंदीया या परिपूर्ण विमानतळांवरून नियमित विमानसेवेबरोबरच, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद विमानतळावर कार्गो टर्मिनल, अमरावती, रत्नागिरी विमानतळांच्या कामाची सुरूवात, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामासाठी निधी या प्रमुख मागण्या गांधी यांनी सादर केल्या आहेत.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, भारतातल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंग साठी  नोव्हेंबर २०२२ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत, खासगी वाहिन्यांचे प्रसारक आणि त्यांच्या संघटनांबरोबर विस्तृत चर्चा करून काल याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार खासगी प्रसारकांसाठी रोज ३० मिनिटं सार्वजनिक सेवांचं प्रसारण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची संकल्पना, शिक्षण आणि साक्षरतेचा प्रसार, कृषी आणि ग्रामीण विकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला कल्याण, समाजाच्या दुर्बल घटकांचं कल्याण, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारशाचं जतन, आणि राष्ट्रीय एकात्मता या राष्ट्रीय महत्वाच्या विषयांवर आणि सामाजिक संदर्भांवर आधारित असावं असं यात म्हटलं आहे.

****

सरकार आणि निमसरकारी विभागातील १५ वर्षांपेक्षा जुनी नऊ लाखांहून अधिक वाहनं भंगारात काढण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय परीवहन मंत्री गडकरी यांनी दिली. नवी दिल्लीत भारतीय ‍वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की तर्फे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना काल ते बोलत होते. एक एप्रिलपासून ही सर्व वाहनं रस्त्यावर दिसणार नाहीत, यासोबतच प्रदूषण करणाऱ्या बस आणि चारचाकींच्या जागी नवीन वाहनांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त देशानं काल त्यांना आदरांजली वाहिली. देशभरात सकाळी अकरा वाजता दोन मिनिटांचं मौन पाळून राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी आणि लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. राजघाटावर काल सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली. यावेळी ‘महात्मा गांधी यांच्या राजभवन भेटी या विषयावरचा माहितीपट दाखवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महात्मा गांधीजींना अभिवादन केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतल्या टिळक भवन मुख्यालयात विशेष कार्यक्रम झाला.

****

राज्यातल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काही अपवाद वगळता काल शांततेत मतदान झालं. या पाच मतदारसंघात सरासरी ७२ टक्के मतदान झालं.  मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी ८६ टक्के मतदान झालं. औरंगाबाद जिल्ह्यात ८०, जालना ८२, परभणी ९०, हिंगोली ९१, नांदेड ८४, लातूर ८६, उस्मानाबाद ९२, तर बीडमध्ये ९० टक्के मतदान झालं. एकूण १४ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ९१ टक्के, नागपूर शिक्षक मतदारसंघात ८५ टक्के, नाशिक पदवीधर मतदार संघात ४९ पूर्णांक २८, तर अमरावती पदवीधर मतदार संघात ४९ पूर्णांक ६७ टक्के मतदान झालं. परवा दोन फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या कामात हेतू पुरस्पर टाळाटाळ आणि हलगर्जीपणा करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला. मंडळ अधिकारी कचरू तुपे यांनी दिलेल्या तक्रारी वरून ही कारवाई करण्यात आली.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांनी काल पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर केला. शिंदे गटानं १२४ पानी तर ठाकरे गटानं ११२ पानी लेखी युक्तिवाद सादर केल्याचं सांगण्यात आलं. घटनेच्या दहाव्या अनुसूचीचा दाखला देत, शिंदे गटानं स्वेच्छेनं पक्ष सोडला आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या चिन्हावर दावा करु शकत नाहीत, अशी बाजू मांडून शिंदे गटाचा युक्तिवाद ऐकला जाऊ नये, अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. शिंदे गटाने प्रतिनिधी सभेवर दावा ठोकला. प्रतिनिधी सभेतले १४४ लोक आमच्या बाजूनं आहेत, असं त्यांनी सांगितलं. यासह खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची यादी लेखी स्वरुपात सादर करण्यात आली.

****

वर्धा इथं येत्या तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची प्रत्यक्ष सुरुवात उद्या सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या खंजिरी भजनानं होणार आहे. या संमेलनात  परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचं कविसंमेलन, परिचर्चा, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद, विशेष कार्यक्रम, खुले अधिवेशन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

****

गुजरातमधल्या गांधीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं एका शिष्येवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला दोषी ठरवलं आहे. २०१३ मध्ये सुरतमधल्या दोन बहिणींवर बलात्कार केल्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणी न्यायालय आज शिक्षा सुनावणार आहे. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. २०१३ मध्ये सुरतमधल्या दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे. २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयानं त्याला एका लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

****

मुंबई विद्यापीठ तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठीत करण्यात आली आहे, तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.

****

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त काल राज्यात ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२३ राबवण्यात आलं. कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात हे यंदाचं घोषवाक्य आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत काल सार्वजनिक आरोग्य विभागानं महाराष्ट्र नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लोक सेवा संगम यांच्या वतीनं स्पर्श कुष्ठरोग निवारण जनजागृती अभियान पदयात्रा काढली  होती.

परभणीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथून सुरु झालेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केलं.

उस्मानाबादमध्येही काल मॅरेथॉनचं  आयोजन करण्यात आलं होतं. यात ५० मुलं आणि ५० मुलींनी सहभाग नोंदवला.

****

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं आज आणि उद्या हुरडा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसात स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं पर्यटक निवास औरंगाबाद, लोणार, फर्दापुर या ठिकाणी हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्थानिक बचत गट, शेतकरी यांच्यामार्फंत नाचणीचे वाळलेले खाद्य पदार्थांचे दर्जेदार प्रकार जसे की पापड, कुरडया, बिस्किटं पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. औरंगाबाद इथल्या महामंडळाच्या पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचं प्रदर्शन आणि विक्री सुरु करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली.

****

हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केलं आहे. संघटितपणे गुन्हे करणार्या या पाच जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. शेख अफरोज शेख गैबू, शेख मोसीन शेख गैबू, शेख शब्बीर शेख चाँद, शेख अजीस शेख चाँद, शेख वसीम शेख अजीस अशी त्यांची नावं असून, त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश श्रीधर यांनी जारी केले.

****

शेत जमीन मोजण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मारुती घाटोळ या भूमापकासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल दुपारी ही कारवाई केली.

****

नांदेड जिल्ह्यात लिंबगाव इथं घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉक मुळे परभणी- नांदेड दरम्यान धावणारी विशेष रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी परभणी रेल्वेस्थानकावरुन ही रेल्वेगाडी सुटत असते.

****

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज मुरली विजय यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यानं २००८ ते २०१५ या काळात ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि नऊ टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

****

भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघादरम्यान  दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या तिरंगी टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत काल भारतानं वेस्ट इंडीजचा आठ खेळाडू राखून पराभव केला. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. वेस्ट इंडिजच्या संघानं निर्धारित २० षटकांत सहा बाद चौऱ्याण्णव धावा केल्या. उत्तरादाखल भारतानं हे आव्हान चौदाव्या षटकांत दोन खेळाडुंच्या मोबदल्यात पार केलं. या मालिकेतला अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान येत्या गुरूवारी होणार आहे.

****

बीडमध्ये येत्या ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान १४ वर्षाखालील मुलांच्या गटासाठी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था फुटबॉल संघटना तसंच फुटबॉल क्लब यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि येत्या सात तारखेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रवेशिका पाठवाव्यात असं आवाहन संयोजकाच्यावतीनं केलं आहे.

****

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त काल वाशिममध्ये रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिम जिल्हा रुग्णालयापासून, जिल्हा आरोग्य अधिकारी तसंच जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा कुष्ठरोग अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ केला.

लातूर इथं देखील "रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन"मध्ये कुष्ठरोग विभागातले सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

****

No comments: