Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 25 January
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २५ जानेवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक बातम्या
· राज्यात
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· साखर
उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सशक्तीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं केंद्रीय
सहकारमंत्री अमित शहा यांचं आश्वासन
· महावि कास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला तुरुंगात टाकण्याचा डाव
होता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
· शिवसेना
आणि वंचित बहुजन आघाडी युतीला विरोध नाही- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत
पाटील यांचे स्पष्टीकरण
· पक्षाच्या
संघटनात्मक बांधणीसाठी नांदेड इथं पक्षाचं अधिवेशन घेण्याचा तेलंगणाचे मुख्यमंत्री
के. चंद्रशेखर राव यांचा निर्णय
· प्रजासत्ताक
दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्राला संबोधित करणार
· आगामी
जी-20 परिषदेसाठी औरंगाबाद शहरात रंगरंगोटी आणि सौंदर्यकरणाचं काम सुरु
· मुलाने
विवाहित महिलेस पळवून आणल्याच्या कारणामुळे कुटुंबातील सात जणांची आत्महत्या
आणि
· तिसऱ्या
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर ९० धावांनी विजय
सविस्तर बातम्या
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी साखर आणि सहकार संबंधत विविध प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री
अमित शहा यांची भेट घेतली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती
दिली. विस्ताराबाबत शहा यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री
फडणवीस यांनी विस्तारासाठी कोणतीही कायदेशीर अडचण नाही, २७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार निश्चित होईल, असं सांगितलं.
साखर उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सशक्तीकरणासाठी
केंद्राची नेहमीच सहकार्याची भूमिका असून, आठवडाभरात यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात
येईल, असं आश्वासन शाह यांनी दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. नफेवारी, खेळते भांडवल,
कर्जाची पुनर्रचना, आयकर प्रलंबित विषय, इथेनॉल आणि कोळसा निर्माण यासारख्या साखर उद्योगाशी
निगडीत अडचणी आणि उद्योगांच्या सशक्तीकरणासाठी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा या बैठकीत
झाल्याचं मुख्यमंत्रीयांनी सांगितलं.
****
उद्योगांना पोषक वातावरण असल्यानं राज्यात मोठ्या प्रमाणात
रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एका
खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात
थेट गुंतवणूक होत आहे. निर्यातीत राज्याचा वाटा जास्त असून, विकासासाठी नवनवीन चांगले
उपक्रम हाती घेतले आहेत. उद्योगांनी राज्यात यावं यासाठी त्यांना जलद गतीनं परवानग्या
दिल्या जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला तुरुंगात टाकण्याचा डाव होता,
असा आरोप केला. मला अटक करण्याचं लक्ष्य तत्कालीन पोलीस आयुक्तांना दिलं होतं, मात्र
तुरुंगात जावं लागेल असं मी काहीच केलं नव्हतं, त्यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले
नाहीत, असं फडणवीस म्हणाले.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणनवीस यांचे हे
आरोप फेटाळून लावले आहेत. असा कोणताही प्रयत्न किंवा योजना महाविकास आघाडी सरकारची
नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीला आमचा विरोध नाही,
कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतल्या प्रमुख
घटकांनी घ्यावी, अशी इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी
व्यक्त केली आहे. काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची खासदार शरद
पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. नवे मित्र
जोडण्याला कुणाचा विरोध नाही, मात्र मित्र जोडताना ते शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक
आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं, जयंत पाटील यांनी नमूद केलं.
****
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पक्षाच्या
संघटनात्मक बांधणीसाठी नांदेड इथं पक्षाचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड
इथल्या सभेनंतर ते पुण्यात आणि त्यानंतर औरंगाबादेत जाहीर सभा घेणार आहेत. सध्या सीमा
भागातल्या किनवट, बिलोली, देगलूर, धर्माबाद आणि माहूर या तालुक्यांमध्ये पक्षवाढीसाठी
त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात लोकसभेच्या आठ आणि विधानसभेच्या २२ जागांवर तेलगू
भाषिकांचा प्रभाव असल्यामुळे, केसीआर यांच्या पक्षाला फायदा होण्याची शक्यता वर्तवली
जात आहे. भारत राष्ट्र समिती - बी आर एस हा पक्ष येत्या काळात महाराष्ट्रात निवडणूक
लढवण्याची शक्यता असून, त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी हा पक्ष युती करणार
असल्याची चर्चा आहे.
****
७४ वा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून
भाषण करणार आहेत. सायंकाळी सात वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून
राष्ट्रपतींच्या हिंदी आणि इंग्रजीतल्या भाषणाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. आकाशवाणीवरून
भाषणाचा मराठीतून अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या
मुख्य सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सिसी हे उपस्थित
राहणार असून, काल त्यांचं भारतात आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं
स्वागत केलं.
मुंबईत दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर उद्या
मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाची रंगीत तालीम काल करण्यात
झाली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त
आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय मतदार पुरस्कार २०२२ प्रदान करणार आहेत. यावर्षीच्या मतदान
दिवसाचा विषय ‘मी अवश्य मतदान करेन’ हा असून, हा विषय मतदानात सहभागी
होणाऱ्या मतदारांना समर्पित केला आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत ज्या राज्य आणि जिल्हा
स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यांना सर्वोत्कृष्ट निवडणूक
सराव हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे.
****
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी यावर्षी ३८ लाखांहून
अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५० टक्के
अधिक असल्याची माहिती, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. ते काल दिल्लीत
प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशभरातल्या राज्य शिक्षण मंडळाच्या सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी
या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. या महिन्याच्या २७ तारखेला नवी दिल्लीत तालकटोरा
स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून १०२ विद्यार्थ्यांना
आमंत्रित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
****
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं आणि खतं पुरवण्यासाठी सहकारी
संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन सहकारमंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. काल मुंबईत
पणन महासंघ अधिमंडळाच्या चौसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन राबवत
असलेल्या योजनांची माहिती देत, शेतमालाला अधिक भाव मिळावा, यासाठी पणन महासंघानं पुढाकार
घ्यावा, असं आवाहन सावे यांनी केलं. वर्ष २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या सहकारी
संस्था आणि पणन महासंघातले उत्कृष्ट काम करणारे अधिकारी- कर्मचारी यांचा सत्कार यावेळी
करण्यात आला.
****
सामान्य शेतकरी कर्जमाफीच्या विळख्यात अडकलेला असताना मोदी
सरकारनं देशातल्या फक्त एकवीस उद्योजकांचं सुमारे साडेदहा लाख कोटींचं कर्ज माफ केलं
असून, संसदेत दिलेल्या माहितीत या उद्योजकांची नावं दडवण्यात आली आहेत, असा आरोप काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नाशिक इथं काल काँग्रेस पक्षाच्या ‘हाथ से
हाथ जोडो’ या अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
औरंगाबाद इथं जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्षाचा
ध्वज फडकावून या अभियानाची सुरवात करण्यात आली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत
जोडो यात्रेची उद्दिष्टं आणि संदेश देशातल्या जनतेपर्यंत पोचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो
अभियान राबवण्यात येत आहे.
****
आगामी जी-20 परिषदेसाठी औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरात
रंगरंगोटी आणि सौंदर्यकरणाचं काम करण्यात येत असून, नागरिकांनी त्याचं जतन करावं, असं
आवाहन औरंगाबाद महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी केलं आहे.
आगामी जी-20 परिषदेनिमित्त शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आणि शहर स्वच्छ करण्यासाठी
आपलं योगदान देण्यासाठी पुढे आलेल्या टीम ऑफ असोसिएशन्स, विविध सेवाभावी संस्था, जिल्हा
व्यापारी महासंघ आणि महानगरपालिकेतले जवान यांची संयुक्त बैठक काल झाली, त्यावेळी ते
बोलत होते. येत्या २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शहरात जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात
येणार असून, या काळात नागरिकांनी रस्त्यावर थुंकणं, कचरा टाकणं, बांधकाम मलबा रस्त्यावर
टाकणं, बेशिस्त पार्किंग तसंच अनधिकृत बॅनर्स, होर्डिंगस, झेंडे लावणं टाळावं, असं
चौधरी यांनी सांगितलं.
****
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं, २०२३ हे वर्ष "हरित संकल्प
बळकट करण्यासाठी" समर्पित केलं असल्याची माहिती, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी
संचालक अनिर्बन घोष यांनी दिली आहे. औरंगाबाद इथल्या इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर,
एक्स्ट्राग्रीन डिझेल विक्रीचं औपचारिक उद्घाटन काल झालं, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत
बोलत होते. इंडियन ऑईलकडून राज्यात विविध सुविधांच्या विकासासाठी दोन हजार ३२६ कोटी
रुपये खर्च होणार असून, पुढील ३-४ वर्षांत राज्यात सुमारे दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
करणार असल्याची घोषणाही अनिर्बन घोष यांनी केली.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित, जागर मराठीचा, या कार्यक्रमाच्या
काल दुसऱ्या दिवशी तत्वज्ञान आणि साहित्याचे अभ्यासक शरद भिंगारे यांचं व्याख्यान झालं.
आत्मचरित्रांच्या वाचनातून समृद्ध जगण्याची प्रेरणा मिळते, असं प्रतिपादन भिंगारे यांनी
यावेळी केलं. ’माझा वाचन प्रवास' या विषयावर प्रसिद्ध लेखक शाहू पाटोळे यांनी, तर स्व
वाचनानुभव याबद्दल आकाशवाणीच्या कार्यक्रमाधिकारी नम्रता फलके यांनी आपली मनोगतं यावेळी
व्यक्त केली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या आणि संलग्नित
महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तत्काळ सोडवणूक करण्यासाठी, कुलगुरु-विद्यार्थी
संवादचं आयोजन करण्यात आलं आहे. यात परीक्षा, वसतीगृह, प्रवेश प्रक्रिया, संशोधनाच्या
संदर्भात विद्यार्थ्यांना प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक महिन्यात दोन
वेळा हा संवाद होणार आहे. पहिला संवाद फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यासाठी
विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या लेखी स्वरुपात विद्यार्थी कल्याण विभागात आज द्याव्यात,
असं आवाहन कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी केलं आहे.
****
मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी
प्रोत्साहन मिळावं आणि मतदानाच्या कर्तव्याची जाणीव व्हावी या उद्देशानं स्वामी रामानंद
तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे. विद्यापीठ
आणि नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अधिकाधिक
संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
राज्यात अनेक भागात काल अवकाळी पाऊस पडला. जालना जिल्ह्यात
जानेफळ मिसाळ गावात काल रात्री जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे गहू आणि ज्वारी पिकांचं
नुकसान झालं. औरंगाबाद शहर आणि परीसरातही काल रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला.
आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने
वर्तवली आहे.
****
मुलाने विवाहित महिलेस पळवून आण्यामुळे पित्याने कुटुंबासह
आत्महत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात पारगाव इथं घडली आहे. सदर कुटुंब
हे मूळचं बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातलं आहे. मोहन पवार असं मृत पित्याचं नाव असून,
मुलाने विवाहित महिलेस पळवून आणल्याने समाजात आपली बदनामी होईल, या भीतीने त्यांनी
पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसह भीमा नदीच्या पात्रात उडी मारुन आत्महत्या केली.
पवार हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खामगावचे तर श्याम फलवरे असे जावयी उस्मानाबाद
जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील हातोला इथले ते रहिवाशी आहेत. काल या सगळ्यांचे मृतदेह
बाहेर काढण्यात आले.
****
वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळल्यास रस्ते अपघातांचं प्रमाण
आपण कमी करू शकतो, असं मत उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केलं
आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उस्मानाबाद इथं मोफत नेत्र आणि रक्तशर्करा तपासणी
तसंच रक्तदान शिबिरात ते काल बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या मागचं पोलीस मैदान लोकांना
व्यायामासाठी उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरात सुरू असलेल्या वृक्ष
लागवड मोहिमेत विविध संघटनांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही कुलकर्णी यांनी यावेळी केलं.
या शिबिरात ७३ जणांची रक्तशर्करा आणि ५४ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर १८ जणांनी
रक्तदान केलं.
****
इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात
भारतीय संघानं न्यूझीलंडचा ९० धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत कर्णधार
रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर, ३८५ धावा केल्या.
रोहितनं ८५ चेंडूत एकशे एक धावा तर शुभमननं ७८ चेंडूत ११२ धावा केल्या. भारतानं दिलेल्या
लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंड संघ बेचाळीसाव्या षटकांत २९५ धावांवर सर्वबाद झाला.
सहा षटकांत ४५ धावांच्या बदल्यात तीन बळी घेणारा शार्दुल ठाकूर सामनावीर तर मालिकेत
एक शतक आणि एक द्वी-शतक झळकावणारा शुभमन गिल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, न्यूझीलंडसोबत तीन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला
पहिला सामना परवा २७ तारखेला रांची इथं खेळला जाणार आहे.
****
मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या
मिश्र दुहेरी श्रेणीत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या जोडीनं उपान्त्य
फेरीत प्रवेश केला आहे. काल नियोजित उपान्त्यपूर्व सामन्यापूर्वी लाटवियाच्या येलेना
ओस्तापेंको आणि स्पेनच्या डेविड वेगा हर्नांडिज या जोडीनं भारतीय जोडीला पुढे चाल दिल्यानं
मिर्झा-बोपन्ना जोडीचा उपान्त्य फेरीत प्रवेश झाला.
****
No comments:
Post a Comment