Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जानेवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
· २०२२-२३ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत
सादर, विकास दर सात टक्के राहण्याची अपेक्षा.
·
केंद्र सरकारनं समाजातल्या
प्रत्येक घटकासाठी कोणताही भेदभाव न करता काम केलं - राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू.
·
राज्य
सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायाऐवजी वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याचा निर्णय
२०२५पर्यंत पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी.
· ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’
गीत महाराष्ट्र राज्य गीत म्हणून स्वीकार
करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
·
अभिमत
विद्यापीठांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना सुरू करण्यास मान्यता.
आणि
· शिष्येवर बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२२-
२३ या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात
टक्के राहण्याची अपेक्षा असून, भारत यावर्षीही जगातली सर्वात
वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील, असं या सर्वेक्षणात
म्हटलं आहे.
जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
असलेल्या भारताचं सकल देशी उत्पादन यावर्षीच्या मार्च
महिन्यात सुमारे साडेतीन ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचण्याचा अंदाजही यात
व्यक्त करण्यात आला आहे. देशात महागाईमध्ये लक्षणीय घट झाली असून वार्षिक महागाई
दर सहा टक्क्याच्या खाली आल्याचं यात म्हटलं आहे. चालू
आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात, वस्तू आणि सेवांच्या
निर्यातीमध्ये, मागच्या वर्षीच्या तुलनेत सोळा टक्के वाढ
झाल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
२०२३-२४ या वर्षात भारताच्या सकल देशी
उत्पादनात सहा ते साडे सहा दशांश टक्क्यांची वाढ अपेक्षित
असल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे. २०२३ मध्ये चलनवाढीचा दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के
राहण्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनं वर्तवल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.
२०२१-२२ या वर्षात कृषी क्षेत्रातल्या खाजगी गुंतवणुकीत वाढ होऊन ती नऊ पूर्णांक
तीन दशांश टक्क्यांवर पोहचल्याचं, तसंच
एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या काळात प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाल्याचं या
सर्वेक्षणात म्हटलं आहे.
दरम्यान, २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत
उद्या सादर होणार आहे.
****
केंद्र सरकारसाठी राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचं असून, सरकारनं समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कोणताही भेदभाव न करता काम केलं
असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीला दोन्ही सदनांच्या सदस्यांना
संबोधित करताना त्या आज बोलत होत्या. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा
सर्वात मोठा शत्रू असल्याचं सरकारचं स्पष्ट मत असून, कामकाजात प्रामाणिकपणा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी
सांगितलं. गेल्या काही वर्षांत देशात थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल इंडियाच्या
मदतीने, कायमस्वरूपी आणि पारदर्शक प्रणाली विकसित झाली
असल्याचं त्या म्हणाल्या. मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा लाभ
मिळण्यास सुरुवात झाली असून, आज देशाची उत्पादन क्षमता वाढली
असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, आयुष्मान
भारत योजना, महिला सशक्तिकरण, सामाजिक,
शैक्षणिक, आर्थिक विकास, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यासारख्या सरकारच्या लोककल्याणकारी
योजनांचा राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना, यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्रासाठी आशेचा किरण घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या
अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
****
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस पक्ष भारत-चीन
सीमा विवाद, महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे लावून धरणार आहे,
अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते
मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलत
होते. संपूर्ण देशाचा खजिना काही निवडक भांडवलदारांच्या हातात सोपवल्याचा आरोप करत,
हा मुद्दाही सदनात मांडणार असल्याचं ते म्हणाले. चीनसंदर्भातल्या
परराष्ट्र धोरणाचा मुद्दाही सदनात उपस्थित करणार असल्याचं खरगे यांनी यावेळी
सांगितलं.
****
राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्याय पद्धतीऐवजी वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याच्या
निर्णयामुळे या परिक्षेची तयारी करणाऱ्या
विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय २०२५च्या मुख्य
परिक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सेवा आयोगाकडे
एका पत्राद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी
तातडीनं विचारात घेऊन आयोग विद्यार्थ्यांना दिलासा देईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सेवा आयोग अत्यंत
कार्यक्षमतेनं काम करत असून, गेल्या सात आठ महिन्यात आयोगानं
नोकऱ्यांमधला अनुशेष भरून काढण्याचं काम वेगानं केलं आहे,
तसंच शासकीय नोकऱ्यांमधली पंचाहत्तर हजार
रिक्त पदं भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचं नियोजनही झालं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
प्रसिद्ध कवी राजा बढे यांचं ‘जय जय महाराष्ट्र
माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्र
राज्य गीत म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत
घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज
मंत्रिमंडळाची बैठक झाली. येत्या एकोणीस फेब्रुवारीपासून, छत्रपती
शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे.
राज्यातल्या अभिमत विद्यापीठांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय
विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना सुरू करण्याचा निर्णयही
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय, महिला आणि बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेच्या परिपोषण अनुदानात एक
हजार दोनशे पंचाहत्तर रुपयांची वाढ करून ते अडीच हजार रुपये करण्याचा निर्णयही
मंत्रिमंडळांनं घेतला आहे. फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरता राज्य
शासनाच्या आर्थिक सहभागालाही आजच्या बैठकीत मान्यता दिली.
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना राज्य आणि जिल्हा स्तरांवर
राबवण्यासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात
आली.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मध्ये, अग्निसुरक्षेच्या अनुषंगानं सुधारणा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात
आला. यामध्ये, शैक्षणिक इमारतींची उंची तीस मीटरवरून
पंचेचाळीस मीटर करणं, तसंच आग परिक्षण किंवा सल्लागार नेमणं
या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबईच्या एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातल्या जमिनीच्या वापराबाबत या बैठकीत
निर्णय घेण्यात आला. यानुसार आता तिथे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्था येणार असून, त्यातून साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख रोजगारांची निर्मिती
होईल, अशी अपेक्षा आहे.
याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेला चारशे साठ कोटी
रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता या बैठकीत देण्यात आली. यामुळे पुणे
जिल्ह्यातल्या अवर्षण प्रवण भागातल्या सुमारे साडेपंचवीस हजार हेक्टर जमिनीला
सिंचनाचा लाभ मिळेल.
****
गुजरातमधल्या गांधीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं एका शिष्येवर बलात्कार
केल्याप्रकरणी आसाराम बापूला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात असून २०१८
मध्ये, जोधपूर न्यायालयानं त्याला अन्य एका लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. २०१३ मध्ये सुरतमधल्या दोन बहिणींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात
गांधीनगरच्या न्यायालयानं काल आसाराम बापूला दोषी ठरवलं होत. सुरतमधल्या
दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची ही तक्रार दाखल केली होती.
****
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांसाठी सरकारनं एक नवीन कायदा करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महत्वाच्या मुद्यांवरून लक्ष हटवण्यासाठी काही
लोक जाणीवपूर्वक असं करतात, असा आरोप त्यांनी केला. संविधानाच्या
चौकटीत बसणाऱ्या बाबीच माध्यमांनी दाखवाव्यात, ज्या बाबी या
चौकटीत बसत नाहीत, ज्यांनी समाजात तेढ निर्माण होते, अशा बाबी टाळाव्यात, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्या आमदारांची
विधानभवनात बैठक आयोजित केली आहे. त्यात पोटनिवडणुकांबाबत चर्चा केली जाईल असं
सांगत, चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक
लढवण्यावर आम्ही ठाम आहोत, असं अजित पवार यांनी यावेळी
सांगितलं.
****
आजादी का अमृतमहोत्सवाच्या औचित्यानं उस्मानाबाद विभागातल्या सगळ्या टपाल
कार्यालयांमध्ये येत्या नऊ आणि दहा फेब्रुवारीला ‘सुकन्या समृद्धी योजना’ खाती उघडण्याकरता विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुलींच्या शिक्षण आणि
भवितव्यासाठी ही योजना किती महत्वाची आहे, याबाबत ग्राम
पंचायत, अंगणवाडी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी या विविध
घटकांमध्ये टपाल कर्मचारी या योजनेबद्दल
माहिती देणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातले आठवडी बाजार, मंदिरं,
यात्रा आणि शाळा अशा ठिकाणी पालक मेळाव्यांच्या माध्यमातून ही योजना
जनसामान्यांपर्यंत पोहोचावी असे प्रयत्नही केले जाणार आहेत. आपल्या मुलींचं भविष्य
उज्ज्वल व्हावं यासाठी या काळात जास्तीत जास्त नागरिकांनी टपाल खात्याच्या सुकन्या
समृद्धी योजना खात्यांमध्ये गुंतवणूक
करावी, असं आवाहन उस्मानाबाद विभागाचे डाकघर अधीक्षक भगवान
नागरगोजे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment