Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जानेवारी २०२३ सायंकाळी
६.१०
****
· काळाच्या
ओघातही भारतीय संस्कृती अबाधित - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
· वायुसेनेच्या
विमानांना मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये अपघात.
· इतर
मागास प्रवर्गातल्या नागरिकांसाठी घरकुल योजना प्रस्तावित - मंत्री अतुल सावे यांची
माहिती.
आणि
· आमदार
संतोष बांगर यांच्याविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद.
****
काळाच्या
ओघात जगातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या, पण भारतीय संस्कृती अबाधित राहिली असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये राजस्थानमधल्या
भिलवाडा जिल्ह्यात मालसेरी डुंगरी इथं भगवान देवनारायण यांच्या एक हजार एकशे अकरावा
अवतार महोत्सव झाला, त्यावेळी मोदी बोलत होते. भारताच्या हजारो वर्षांच्या या प्रवासात
सामाजिक शक्तीची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद
केलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमात देशवासीयांशी
संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ९७ वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यात येणार आहे. हिंदी प्रसारणानंतर लगेचच
प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.
****
मध्य
प्रदेशातल्या मुरैना इथं आज पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास भारतीय वायुसेनेची सुखोई-३०
आणि मिराज-२००० ही दोन लढाऊ विमानं कोसळली. ग्वालियर इथल्या वायुसेनेच्या प्रशिक्षण
केंद्राची ही विमानं प्रशिक्षण सरावादरम्यान अपघातग्रस्त झाली. वायूसेना प्रमुखांनी
या संदर्भातली माहिती संरक्षण मंत्र्यांना दिली आहे. मुरैना इथल्या अपघातातले दोन वैमानिक
सुखरुप असून एकाचा मृत्यू झाला आहे. हवाई दलानं या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं
म्हटलं आहे. राजस्थानातल्या भरतपूर इथंही एक विमान आज अपघातग्रस्त झालं. हे विमान हवाई
दलाचं आहे की लष्कराचं हे अद्याप निश्चित झालेलं नाही. या विमानाचा आकाशातच स्फोट झाला,
असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
थोर
स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं संसद भवनात अभिवादन
कार्यक्रम झाला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेचे उपसभापती
हरिवंश आणि इतर खासदार यावेळी उपस्थित होते. लाला लजपतराय देशप्रेम, समर्पण आणि बलिदानाचं
प्रतीक होते. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला असं
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या अभिवादनपर संदेशात म्हटलं आहे. शिक्षण, आरोग्य,
संस्कार आणि समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ ‘पंजाब केसरी’ नव्हते तर खऱ्या
अर्थानं ‘हिंद केसरी’ होते, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात
त्यांना अभिवादन करताना नमुद केलं.
****
जी-ट्वेंटी
समुहाच्या स्टार्टअप गटाच्या दोन दिवसीय बैठकीला आज हैदराबादमध्ये सुरूवात झाली. केंद्रीय
पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, जी-२० शेर्पा अमिताभ कांत, स्टार्टअप-२० चे अध्यक्ष
चिंतन वैष्णव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, डीपीआयआयटीचे सचिव अनुराग
जैन तर जी-२० चे १८० प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. २० सदस्य देश आणि नऊ विशेष आमंत्रित देश याशिवाय स्टार्टअप
आणि गुंतवणूकदार या बैठकीला उपस्थित आहेत.
****
इतर
मागास प्रवर्गातल्या नागरिकांसाठी घरकुल योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी
माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं माध्यम
प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले –
अनुसूचित
जातीच्या मंडळींना रमाई योजनेच्या माध्यमातून घरं मिळतात. व्ही जे एन टी च्या लोकांना
यशवंतराव चव्हाण या योजनेतून घरं मिळतात. त्याच पद्धतीने बऱ्याच दिवसांपासून ओ बी
सी ची मंडळी आमच्या मागे होती की आम्हाला पण घरं मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही
याच्यावर विचार करून प्रस्ताव तयार करतो आहोत की या माध्यमातून त्यांना मिळावी असा
आमचा त्याच्यातला प्रयत्न आहे.
****
राज्यातल्या
तीन पदवीधर तर दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सांगता आज झाली.
या निवडणुकीतल्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात असून भारतीय जनता
पक्षाचे किरण पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आणि प्रदीप सोळुंके यांच्यात
तिरंगी लढत होत आहे. काळे हे सलग चौथ्यांदा आमदार होण्यासाठी निवडणूक रिंगणात आहेत.
औरंगाबाद इथं आज मुकुंदवाडी आणि चिकलठाणा इथं काळे यांच्या प्रचारासाठी फेरी काढण्यात
आली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांनी शक्ती पणाला लावली. मंत्री,
खासदार, आमदार अन्य नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या. परवा, सोमवारी या निवडणुकीसाठी मतदान
होत आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात २२२ मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. मतमोजणी
दोन फेब्रुवारीला होणार आहे.
****
औरंगाबादचे
खासदार इम्तियाज जलील यांना पुण्याच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टच्या
वतीनं आदर्श खासदार पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. माजीमंत्री महादेव जानकर यांच्या
हस्ते हा पुरस्कार काल पुणे इथं प्रदान करण्यात आला. संसदेतल्या अधिवेशनात विविध चर्चांतील
सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात
मांडलेली खासगी विधेयकेतील चर्चा या मुद्यांच्या आधारे त्यांना निवडण्यात आलं. मुद्देसूद
भाषण, तरुणांना वैचारिक मार्गदर्शन आणि आपल्या मतदारसंघातील विविध सामाजिक आणि लोकोपयोगी
कामं या निकषांवरही ‘आदर्श खासदार’ या पुरस्कारासाठी इम्तियाज जलील यांची निवड करण्यात
आल्याचं संयोजकांनी सांगितलं.
****
प्रवाशांची
मागणी लक्षात घेवून मध्य रेल्वेनं ‘मागणीनुसार रेल्वे’ या श्रेणीमध्ये मुंबई ते सिकंदराबाद
दरम्यान एका विशेष रेल्वेची एक फेरी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आज मध्यरात्रीनंतर
१२ वाजून २० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणार असून मनमाड, औरंगाबाद,
नांदेड मार्गे सिकंदराबादला उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता पोहोचणार आहे.
****
कुसुमाग्रज
प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार
आशा बगे यांना जाहीर झाला आहे. आशा बगे यांच्या ‘भूमी’ या कादंबरीला २००६ चा साहित्य
अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ७ कादंबऱ्या आणि १२ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.
नाशिकच्या कालिदास कला मंदिरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी १० मार्चला
प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण
करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप
आहे.
****
बाळासाहेबांची
शिवसेना पक्षाचे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध
गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दहा दिवसांपूर्वी एका प्राचार्यांना मारहाण केल्या प्रकरणी
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यासह
महाविद्यालयातल्या पाच अधिकाऱ्यांसह इतर सुमारे चाळीस जणांवरही गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करुन पाच हजार रुपयांचं नुकसान
केल्याचं या संदर्भातल्या फिर्यादीत नमुद करण्यात आलं आहे. या प्राचार्याविरुद्ध महिला
प्राध्यापिकांनी आपल्याकडे गाऱ्हाणं मांडलं होतं. हा गुन्हा खोटा आहे, असं बांगर यांनी
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
****
धुळ्याचे
माजी आमदार प्राचार्य सदाशिवअण्णा माळी यांच्या पार्थीव देहावर आज धुळ्यामध्ये अंत्यसंस्कार
करण्यात आले. माळी यांचं काल रात्री निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी काँग्रेस
पक्षाचे आमदार म्हणून १९७२ ते १९७८ या काळात कुसुंबा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं
होतं.
****
महाराष्ट्र
कामगार कल्याण मंडळाच्या २६व्या औद्योगिक आणि व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्ल्यू.
संघानं ग्रामीण विभागात सलग चौथं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईत झालेल्या या स्पर्धेत
बँक ऑफ बडोदानं शहरी विभागात अजिंक्यपद मिळवलं. एकवीसाव्या महिलांसाठीच्या राज्यस्तरीय
खुल्या स्पर्धेत पश्चिम रेल्वे संघ अजिंक्य ठरला. ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू.चा
अदिल पाटील, महिला विभागात सोनाली शिंगटे, तर शहरी विभागात बँक ऑफ बडोदाचा प्रणव राणे
स्पर्धेतले सर्वोत्तम खेळाडू ठरले. विजेत्या संघांना कामगार कल्याण चषक आणि रोख ५०
हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं तर उपविजेत्या संघाला चषक आणि रोख ३५ हजार
रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment