Sunday, 29 January 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २९ जानेवारी २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      आगामी निवडणुकांबाबत वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांचं स्पष्टीकरण

·      खोट्या कर परताव्याच्या माध्यमातून २६३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या आयकर खात्यातील कर्मचाऱ्याच्या ३० मालमत्तांवर सक्तवसुली संचानालयाच्या धाडी, १६६ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली. तीस भूखंड जप्त

·      इतर मागास प्रवर्गातल्या नागरिकांना घरकुल देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

·      राज्यातल्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान

·      हिंगोली मधल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यासह ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

·      यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर

·      ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमहिला एकेरीत बेलारूसच्या आरिना साबलेन्काला विजेते पद

आणि

·      एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताची इंग्लंडसोबत अंतिम लढत तर लखनौमध्ये भारत -न्यूझीलंड दरम्यान दुसरा टी-२० क्रिकेट सामना   

****

आता सविस्तर बातम्या

****

आगामी निवडणुकांबाबत आपली वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नसून या बाबतची भूमिकाही स्पष्ट झालेली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी या काल संदर्भात माहिती दिली. या संदर्भात कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं. सध्यातरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबत महाविकास आघाडी म्हणून आपण आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत, असं त्यांनी नमूद केलं. अलिकडेच आलेल्या सर्वेक्षणातून देशातील वातावरण केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचं दिसत असल्याचं ते म्हणाले.

देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी बोलतांना केली.

****

खोट्या कर परताव्याच्या माध्यमातून २६३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या आयकर खात्यातील वरिष्ठ सहाय्यक पदावर काम करणाऱ्या तानाजी मंडल अधिकारी नावाच्या कर्मचाऱ्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जवळपास ३० मालमत्तांवर सक्तवसुली संचानालयानं काल धाडी टाकल्या. तानाजी अधिकारी हा आपल्या सहकाऱ्यांना आयकर विभागाकडे खोटे कर परताव्याचे दावे दाखल करायला सांगत असे. आणि त्यानंतर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगणकीय पोर्टलचे लॉगिन आणि पासवर्ड वापरुन हे दावे मंजूर करत असे. त्यानंतर ही कर परताव्याची रक्कम एस.बी. एन्टरप्रायझेस या बनावट कंपनीच्या बँक खात्यात जमा केली जात असे. तानाजी अधिकारी यानं अशा खोट्या कर परताव्याच्या माध्यमातून जमवलेल्या पैशातून खरेदी केलेले ३२ भूखंडही सक्तवसुली संचानालयानं जप्त केले आहेत. अधिकारी यांनं राज्यातील लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे, तसंच कर्नाटकात उडपी याठिकाणी अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या. याशिवाय, मुंबई आणि पनवेलमध्ये त्याच्या मालकीचे काही फ्लॅटस आहेत. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडी अशा महागड्या गाड्या असल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणात आतापर्यंत केलेल्या कारवाईत एकूण १६६ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचानालयानं गोठवली आहे.

****

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथका  मार्फत करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस मितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भारतीय स्टेट बँक आणि आयुर्विमा महामंडळ-एलआयसी सह सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील सामान्य जनतेचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अदानींच्या  विविध कंपन्यांमध्ये कोणताही विचार न करता गुंतवला, असा आरोप त्यांनी केला. आता हे कोट्यवधी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे असा दावा पटोले यांनी केला आहे. अदानींचा गैरकारभार पाहता सरकारनं धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीकडून काढून घ्यावा, असही पटोले म्हणाले.

****

मुंबईत सुरु असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या चित्रपट महोत्सवात काल पहिल्या दिवशी, 'अ‍ॅनिमेशन वापरून वेगवेगळी विश्वं निर्माण करणे' या विषयावर  चर्चासत्रं झालं. यामध्ये,  ग्रॅफिटी मल्टीमीडियाचे संचालक आणि सीओओ मुंजाल श्रॉफ, तसच टून्झ ॲनिमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार प्रभाकरन यांनी भारतीय ॲनिमेशन उद्योगात काम करताना आलेले अनुभव आणि या उद्योगाच्या वाढीसाठी त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं नियोजन कथन केलं. भारतीय लोकगीतांनी जगभरातील संगीतरसिकांचं लक्ष कसं वेधून घेतलं आहे यावरही या सत्रात चर्चा झाली.  आघाडीचे जागतिक ॲनिमेशन उद्योग आणि वितरकांसोबतची भागीदारी आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य ठरल्यानं, स्थानिक विषयांचा वापर ॲनिमेशनमध्ये करण्यात कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेल्या आव्हानांबद्दलही सहभागी मान्यवरांनी यावेळी चर्चा केली.

****

जगात सर्वत्र स्टार्टअप उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने जी-२० देशांच्या स्टार्टअप ट्वेंटी परिषदेत विचारविनिमय होत असल्याचं भारताचे जी ट्वेंटी शेर्पा अमिताभ कांत यांनी सांगितलं आहे. हैद्राबाद इथं काल ही बैठक सुरु झाली. स्टार्टअप उद्योगांमधून शाश्वत विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्याबाबत सहभागी देशांचे प्रतिनिधी चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. बॅटरी स्वरुपात उर्जेची साठवण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि अभिनव तंत्रज्ञान दी क्षेत्रात स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीन वेगवेगळे मार्ग पडताळून पाहण्यात येत आहेत.

****

इतर मागास प्रवर्गातल्या नागरिकांसाठी घरकुल योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. ते काल औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले...

अनुसूचित जातीच्या मंडळींना रमाई योजनेच्या माध्यमातून घरं मिळतात. व्ही जे एन टी च्या लोकांना यशवंतराव चव्हाण या योजनेतून घरं मिळतात. त्याच पद्‌धतीने बऱ्याच दिवसांपासून ओ बी सी ची मंडळी आमच्या मागे होती की आम्हाला पण घरं मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही याच्यावर विचार करून प्रस्ताव तयार करतो आहोत की या माध्यमातून त्यांना मिळावी असा आमचा त्याच्यातला प्रयत्न आहे.

****

राज्यातल्या तीन पदवीधर तर दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उद्या सकाळी आठ ते दुपारी चारवाजेपर्यंत मतदान होणार आहे. काल या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. या निवडणुकीतल्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात असून भारतीय जनता पक्षाचे किरण पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आणि प्रदीप सोळुंके यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांनी शक्ती पणाला लावली. मंत्री, खासदार, आमदार तसंच अन्य नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या. उद्या सोमवारी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात २२२ मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. मतमोजणी दोन फेब्रुवारीला होणार आहे.

****

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ९७ वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यात येणार आहे. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

****

राज्यातल्या कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कापसाला योग्य भाव देण्यात यावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्र शासनानं २०२२-२३ या वर्षासाठी कापसाकरिता ६ हजार ३८० रुपये प्रति क्विंटल असा हमी दर जाहीर केला आहे. मात्र, या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचं देशमुख यांनी या पत्रात नमूद केलं आहे. कापसाची आयात बंद करून निर्यात सुरू करण्याची मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

****

राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा गतीन उपलब्ध करुन देण्यात येतील असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. कोल्हापूर इथं काल झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ आणि उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत हेाते. राज्यातल्या सर्व औद्योगिक परिसरात पोलीस चौक्या उभारणं, पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी दोन गाड्या जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन देणं, उद्योगांना अल्प दरानं वीज पुरवठा करणं, नवीन औद्योगिक परिसरामध्ये स्थानिक आणि लघु उद्योगांना प्राधान्य देण यासारख्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

****

बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित उद्यापासूनचा दोन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित करण्यात आला आहे. २०१७ पासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बँक कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. केंद्रीय कामगार आयुक्त आणि युनायटेड फोरम बँक संघटनेच्या प्रतिनिधींची काल मुंबईत बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलं त्यामुळे, हा देशव्यापी संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

हिंगोली मधल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आणि महाविद्यालयातल्या ५ अधिकाऱ्यांसह ४० जणांविरुद्ध काल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय, मानसिक छळ करत असल्याची तक्रार या तंत्रनिकेतनच्या काही कर्मचाऱ्यांनी आमदार बांगर यांच्याकडे केली होती. प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता, आमदार बांगर यांनी गेल्या १८ तारखेला, प्राचार्य उपाध्याय यांना त्यांच्या कक्षात जाऊन मारहाण करत सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड केली. या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. शा बगे यांच्या भूमी या कादंबरीला २००६चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ७ कादंबऱ्या आणि १२ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कालिदास कला मंदिरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी १० मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****

परभणी महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा विभाग तसंच इतर विभागांच्या वतीनं  जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त काल विशेष कार्यक्रमाचं  आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात सूर्यनमस्कार घालून विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 निरोगी जीवन जगण्यासाठी सुदृढ शरीरासोबत सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता असते. ही  सकारात्मक ऊर्जा आपल्याला सूर्यनमस्कारातून मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं  नियमित सूर्यनमस्कार करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी  आंचल गोयल यांनी यावेळी केलं. उस्मानाबाद मधल्या विवेकानंद संस्कार केंद्र कन्याकुमारीतर्फे आज रथसप्तमीनिमित्त  शहरातल्या सहा शाळांमधल्या ७५५ विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत बेलारूसच्या आरिना साबलेन्कानं विजय मिळवत चषक पटकावला आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कझाकस्तानच्या एलेना रीबाकिना हीचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला.

पुरुष एकेरीत आज नोव्हाक जोकोविक आणि स्टेफानोस त्सितसिपास यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

****

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा इंग्लंडच्या संघासोबत आज अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघानं न्युझीलंड, श्रीलंका, स्कॉटलंड, यु ए ई आणि यजमान दक्षिण आफ्रिका संघांचा पराभव करत ही अंतिम फेरी गाठली आहे.

****

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना लखनौच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर आज होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरु होईल. रांची इथं झालेल्या पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा २१ धावांनी पराभव केला होता.

****

नवव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाला काल नाशिकमधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात प्रारंभ झाला. या संमेलनाचं उदघाटन ज्येष्ठ विचारवंत, हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आलं. मुस्लीम संस्कृतीनं समानतेचा विचार मांडला आणि पुरस्कारही केला असून हा समानतेचा विचार समाजात रुजायला हवा, असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी यावेळी केलं.

मुस्लीम समाजाचे प्रश्न आणि वास्तव तसंच साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद या विषयांवरील परिसंवाद काल या संमेलनात झाले.

****

धुळ्याचे माजी आमदार प्राचार्य सदाशिवअण्णा माळी यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. माळी यांचं परवा रात्री निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून १९७२ ते १९७८ या काळात कुसुंबा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

****

No comments: