Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी ई कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणं आवश्यक असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. ई कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सुमारे १७ प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात. यामध्ये सोने, चांदी, तांबे आणि निकेल यांचाही समावेश आहे. यामुळे ई - कचऱ्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. जगभरात पेटंट फाइलिंगमध्ये भारताचं ७वं स्थान आहे, आणि ट्रेडमार्कमध्ये ५वं स्थान आहे. गेल्या पाच वर्षांत पेटंट्सची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
देशातल्या पाणथळ जागांची संख्या आता ७५ झाली असून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक समुदायांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. २०१४ मध्ये देशभरात अशी केवळ २४ पाणथळ स्थळं होती. या पाणथळ जागा आपल्या नैसर्गिक सामर्थ्याचं उदाहरण असल्याचं ते म्हणाले. प्रजासत्त्ताक दिनाच्या औचित्यानं सादर झालेल्या दिमाखदार पथसंचलनाचा उल्लेख करत त्यांनी पद्म पुरस्कार प्राप्त विदुषींचं मन की बातच्या माध्यमातून अभिनंदन केलं. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश, ही लोकशाहीची जननी आहे, याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे असं पंतप्रधान म्हणाले.
योगविद्येचा संबंध आरोग्याशी आहे आणि भरड धान्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे निरोगी जीवनासाठी सर्वांनी अधिकाधिक प्रमाणात योग आणि भरड धान्यांचा जीवन शैलीत अंगीकार करावा असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्हीबाबतचा निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्य प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांपासून तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स, सीरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली. जगभरातील भारतीय मोहिमा सुद्धा त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी, आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे, असं ते म्हणाले.
मन की बात चा हा या वर्षातला पहिला आणि यंदाचा ९७ वा भाग होता.
***
नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणाऱ्या उद्यान उत्सव २०२३चं उदघाटन आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते होणार आहे. या उद्यानात ट्यूलिप फुलांची १२ जाती नागरिकांना पाहायला मिळणार आहेत. ३१ जानेवारी ते २६ मार्च पर्यंत सोमवार वगळता सामान्य नागरिकांसाठी हे उद्यान खुलं राहील तर २८ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत काही विशेष श्रेणीतल्या नागरिकांसाठी हे उद्यान खुलं करण्यात येणार आहे. फुलांविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी उद्यानात क्यूआर कोड ठेण्यात आला आहे. या उद्यानाला अमृत उद्यान असं नाव देण्यात आलं आहे.
***
संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्त्याहत्तराव्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांचं आज भारतात आगमन झालं. ते भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पदग्रहण केल्यानंतर त्यांची ही पहिली विदेशी द्विपक्षीय यात्रा आहे.
या दौऱ्या दरम्यान साबा कोरोसी, विदेशमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी परस्पर हितासंबंधी मुख्य बहुपक्षीय आणि प्रांतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. जलव्यवस्थापना संदर्भात भारतात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि सातत्यानं विकासाची उद्दिष्टं साध्य करण्यातला भारताचा अनुभव लक्षात घेऊन, कोरोसी नीती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसंच भारताच्या जी २० अध्यक्षीय दलाशी देखील चर्चा करणार आहेत.
***
सोलापूर जिल्ह्यात पाटकुल गावाजवळ उजनी जलाशयाचा डावा कालवा आज फुटला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं आसपासच्या शेतीचं मोठं नुकसान झालं असून लाखो लिटर पाणीही वाहून जात आहे. कालवा फुटल्यानं काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचंही मोठं नुकसान झालं असून इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या आहेत. उभ्या ऊसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यानं ऊस शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. १४०० दशलक्ष इतकी क्षमता असलेल्या या कालव्यातून केवळ १२०० दशलक्ष पाणी सोडण्यात आलं होतं.
//***********//
No comments:
Post a Comment