Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 28 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८
जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
वायुसेनेची
तीन लढाऊ विमानं आज कोसळली. सुखोई ३० आणि मिराज २००० ही दोन विमानं मध्यप्रदेशातल्या
मुरैना जिल्ह्यातल्या कोलारस या ग्रामीण भागात सरावा दरम्यान अपघातग्रस्त झाली. ग्वालियर
इथल्या वायुसेनेच्या प्रशिक्षण केंद्राच्या या विमानांचे दोन वैमानिक सुरक्षित असून
एकाचा तपास सुरु आहे. अन्य एका अपघातात राजस्थानमधल्या भरतपूर इथल्या पिंगोर रेल्वे
स्थानकाजवळ भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळलं. या लढाऊ विमानानं आग्र्याहून उड्डाण
केलं होतं. यातल्या वैमानिकानं आपली सुटका करुन घेतली किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट
झालं नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
जैव
तंत्रज्ञान विभागानं केवळ दोन वर्षांत मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत झायकोव्ह डी, कॉर्बवॅक्स,
जेमकोव्हॅक आणि इनोव्हॅक या चार स्वदेशी लसी विकसित केल्या असल्याचं विज्ञान आणि प्रौद्योगिकी
मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज नवी दिल्लीत
वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी सिंग बोलत होते. देशात कोवॅक्सिन या लसीच्या
निर्मितीत वाढ करण्यात आली असून, भविष्यात लसींच्या विकासात, आवश्यक प्रारुप आराखडाही
तयार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नवी
दिल्लीत सुरू असलेल्या तिसऱ्या `इंटरपोल यंग ग्लोबल पुलिस लीडर्स` या कार्यक्रमाला
इंटरपोलचे महासचिव जुर्गन स्टॉक यांनी आज आभासी पद्धतीनं संबोधित केलं. जागतिक सहकार्याला
प्रोत्साहन देण्यासाठी एका निष्पक्ष अभियानासह पोलीस दलांच्या परस्पर संयोजनाच्या माध्यमातून
कठोर कार्य करण्याच्या आवश्यकतेवर स्टॉक यांनी यावेळी भर दिला. तर, इंटरपोल यंग ग्लोबल पुलिस लीडर्स प्रोग्राम जगभरातल्या
युवा पोलीस कर्मचाऱ्यांसह सामान्य युवावर्गाला देखील प्रेरणा देणारा मंच असल्याचं
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी यावेळी सांगितलं.
या कार्यक्रमात ४४ देशांमधले ५९ प्रतिनिधी सहभाग घेत आहेत.
****
आगामी
निवडणुकांबाबत आपली वंचित बहुजन आघाडी सोबत कोणतीही चर्चा झालेली नसून या बाबतची भूमिकाही
स्पष्ट झालेली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं
आहे. कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संदर्भात माहिती दिली. उद्धव ठाकरे
यांच्या शिवसेने सोबत आपण आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहोत,
असं त्यांनी नमुद केलं. देशात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर
गदा आणली जात असल्याची टीका त्यांनी केली. विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी आपल्यासह
अनेक ज्येष्ठ नेते काम करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर आपण आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊ
इच्छितो, पण काही राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती अनुकूल नाही, असंही पवार यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे इथल्या किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधून आभासी पद्धतीनं काल उपस्थित
होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी याच शाळेतून शिक्षण घेतलं असून आपल्या आठवणी जागवतानाच
मुख्यमंत्र्यांनी, परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ताण घेऊन
नका असा सल्ला दिला. शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात
आहेत असं सांगतानाच विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशानं
खचून जाऊ नका, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
उस्मानाबाद
मधल्या विवेकानंद संस्कार केंद्र कन्याकुमारीतर्फे आज रथसप्तमीनिमित्त शहरातल्या सहा शाळांमधल्या ७५५ विद्यार्थ्यांनी
सामूहिक सूर्यनमस्कार घातले. सूर्यनमस्काराचं महत्त्व यावेळी विशद करण्यात आलं. संक्रमण
काळातल्या रथसप्तमी सणानिमित्त प्रकटणारं सूर्याचं तेज स्वामी विवेकानंदांच्या ज्ञानतेजाप्रमाणं
विद्यार्थ्यांनी आत्मसात करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****
ऑस्ट्रेलियाई
खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीची अंतिम लढत कजाकिस्तानची एलेना राईबाकिना आणि
बेलारुसच्या आर्यना सबालेंका यांच्यादरम्यान होत आहे. बावीसावी क्रमवारी प्राप्त राईबाकिनानं
दोन वेळच्या विजेत्या विक्टोरिया अजारेंकावर उपांत्य फेरीमध्ये मात करुन अंतिम फेरीत
प्रवेश केला आहे.
//**********//
No comments:
Post a Comment