Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 01 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०१ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
गेल्या
२४ तासांत देशभरात २६५ नवे कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळले. सध्या देशभरात २ हजार
७०६ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आणि रुग्ण बरे होण्याचा देशातला दर ९८
पूर्णांक ८ दशांश टक्के आहे. गेल्या २४ तासात ६४ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण
झालं असून आतापर्यंत २२० कोटी १० लाखांहून अधिक लसीकरण झालं असल्याचं केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
देशातल्या
विविध विमानतळांवर २ टक्के कोविड चाचणी करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत ५ हजार ६६६ प्रवाशांचे
नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये परदेशातून आलेले एकूण ५३ जण कोरोनाविषाणू संसर्ग
बाधीत आढळले आहेत. उड्डाण करणाऱ्या सुमारे १ हजार ७१६ प्रवाशांचंनिरीक्षण करण्यात आलं. भारतात चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर
आणि थायलंड इथून येणाऱ्या प्रवाशांना आजपासून कोरोना विषयक नकारात्मक अहवाल बंधनकारक
करण्यात आला आहे.
****
कोविड
संकटाचा सामना करण्यासाठी देशभरातल्या विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी
तसंच कोविडसंबंधीच्या उपाययोजना सुनिश्चित करण्यासाठी केंद्रशासनानं काल पंतप्रधानांचे
प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक समीक्षा बैठक घेतली. या
बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत कोविड प्रादुर्भाव
रोखण्यासाठी दिशा निर्देश दिले होते.
****
दिल्ली
आणि आसपासच्या परिसरात काल रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप झाला, तेव्हा
लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं या भूकंपाची तीव्रता
३ पूर्णांक इतकी असल्याचं सांगितलं. भूकंपाचा
केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर इथं होता या
धक्क्यांमुळं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
****
देशाच्या
वायव्य भागात आजपासून पुन्हा थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र
विभागाने वर्तवली आहे. येत्या ४ ते ५ दिवसात पंजाब, हरयाणा, चंडीगढ, दिल्ली, उत्तर
प्रदेश आणि उत्तर राजस्थानात या लाटेचा प्रभाव जाणवेल. या काळात या भागात दाट धुकं
असेल असाही अंदाज आहे.
****
अलमट्टी
धरणाची उंची वाढवल्यास त्याचे परिणाम काय होतील याचा अभ्यास केल्याशिवाय उंची वाढवणं
योग्य होणार नसल्यानं आपण याबाबत कर्नाटक सरकारशी बोलणार असल्याचं कोल्हापूरचे पालकमंत्री
दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. कर्नाटक सरकार या बाबत योग्य तो निर्णय घेईल, याची आपल्याला
खात्री असल्याचंही त्यांनी काल कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना नमुद केलं. सातत्यानं
येणाऱ्या महापुराचा सामना करण्यासाठी गतवर्षी प्रमाणे पॅटर्न राबवून पुराचा धोका टाळला
जाईल असं ते म्हणाले. पंचगंगा नदी प्रदूषण
मुक्ती बाबत कालबद्ध कार्यक्रम राबवणं अत्यंत गरजेचं आहे. याबाबत सरकार गांभीर्यानं
विचार करत आहे. २०२५ पर्यंत पंचगंगा नदी निश्चित प्रदूषणमुक्त होईल याचीदेखील खात्री
असल्याचं मंत्री केसरकर म्हणाले.
****
आजची
नांदेड ते निझामाबाद विशेष रेल्वेगाडी तसंच
उद्या सुटणारी निझामाबाद ते नांदेड विशेष ही
रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागानं ही माहिती दिली आहे.
****
वैनगंगा-नळगंगा
नदीजोड प्रकल्पात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश केल्याबद्दल भगीरथ पाणी परिषदेचे
अध्यक्ष अभिजित जोशी धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आभार मानलं
आहे. या अंतर्गत विदर्भात सुमारे पावणे सहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणाऱ्या या
प्रकल्पातलं अतिरिक्त पाणी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यापर्यंत नेण्यात येणार आहे.
****
नंदुरबार
मधल्या श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी नव वर्षाचं स्वागत सामुहीक सुर्यनमस्कारानं
केलं. या शाळेच्या प्रांगणात सहाशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत सूर्यनमस्कार
घातले. गेली अनेक वर्षे या शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक हा आदर्श उपक्रम राबवत आहेत.
****
नाशिक
इथलं श्री त्र्यंबकेश्वर मंदिर येत्या ५ तारखेपासून आठ दिवस बंद राहणार आहे. त्र्यंबकेश्वर
मंदिरातल्या श्री महादेवाच्या पिंडीला वज्रलेप तसंच शिवलिंगाच्या संवर्धन आणि देखभाल
दुरुस्तीच्या कारणासाठी ५ ते १२ जानेवारी दरम्यान मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची
माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. भारतीय पुरातत्व खात्यामार्फत संवर्धन, देखभाल आणि
दुरुस्तीचं हे काम करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment