Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
· शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची ग्वाही.
· इगतपुरी इथं जिंदाल कंपनीत भीषण स्फोट, आगीत दोन महिलांचा मृत्यू तर १९
जखमी.
· बार्शी तालुक्यातल्या पांगरा इथं फटाक्यांच्या कारखान्यातल्या आगीमध्ये
सात जणांचा मृत्यू.
आणि
· शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन.
****
शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या हस्ते आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये
कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उदघाटन झालं, त्यावेळी शिंदे बोलत होते. ते
म्हणाले –
शेतकरी
जो आहे, हा समृद्ध झाला पाहिजे. त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. आणि आमचा उद्देश एवढाच
आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे. आणि म्हणून आमचं सरकार सातत्याने
यामध्ये काम करतंय. आपल्याला माहिती आहे, आम्ही गेल्या चार-पाच महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी
मोठ्या प्रमाणावर आम्ही निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना जे अतीवृष्टी, अवकाळी पाऊस
या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने केलेलं आहे.
कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांच्या संकल्पनेतून होत असलेला हा कृषी, क्रीडा
आणि सांस्कृतिक महोत्सव दहा दिवस चालणार आहे. यातून शेतकऱ्यांना उद्योजक बनण्याची प्रेरणा
मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या मुंढे गावाजवळ असलेल्या जिंदाल
पॉलिफिल्म कंपनीत आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास स्फोट झाल्यामुळं भीषण आग लागली.
यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून १९ लोकांना कंपनीतून बाहेर काढण्यात आलं आहे. यातल्या
सतरा जणांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी चार जणांचा
प्रकृती गंभीर आहे. रासायनिक टाकीचा स्फोट झाल्यानं ही दूर्घटना झाल्याची प्राथमिक
माहिती असून, नक्की कारण समजू शकलेलं नाही. महापालिका, एमआयडीसी, विविध नगरपालिका,
आणि खासगी कंपन्यांची आग विझवायला मदत सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्फोटाच्या
पार्श्वभूमीवर सिल्लोड दौऱ्यातली सभा रद्द करून तातडीनं इगतपुरीला रवाना झाले. त्यांनी
तिथं स्फोटाची माहिती घेतली. जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन चौकशी केली. दूर्घटनेत
अडकलेल्यांचे जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांना सर्व मदत केली जाईल,
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार तसंच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही
दूर्घटनास्थळाला भेट दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतले विरोधी पक्ष
नेते अजित पवार यांनी या दूर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या पांगरी इथं फटाक्याच्या कारखान्यात
आज दुपारी स्फोट होऊन आग लागली. त्यामुळे सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर दहा
कामगार जखमी झाले आहेत. या आगीत जखमी झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे. या कारखान्यात महिला कामगारांचा जास्तीत जास्त समावेश असल्याचं सांगण्यात
आलं आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं कामगारांना वाचवण्यात येत आहे. तसंच
जखमींना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटात कारखाना पूर्णपणे जळाला
असून आजुबाजूच्या परिसरात आग पसरली होती.
****
शेतकऱ्यांनो पत्रकारांना उत्पन्नाची खरी माहिती देऊ नका, नाही तर सरकार
त्यावर कर लावेल, असं नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आज पुणे जिल्हातल्या इंदापूर इथं शेतीची पाहणी केली,
शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी पवार बोलत होते.
****
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची दरवाढ करण्यात
आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला
नसल्याचं इंधन कंपनीनं सांगितलं आहे. व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलोच्या एलपीजी
सिलेंडरचा दर आता मुंबईत १ हजार ७२१ रुपये प्रति सिलेंडर असेल.
****
परदेशांतून आलेल्या पुणे आणि मुंबईतल्या आणखी दोन प्रवाशांना कोरोना विषाणू
संसर्ग झाल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळं ही संख्या आता सहा झाली आहे. राज्याचे
साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत राज्यात
१६४ कोरोना विषाणू संसर्ग रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी आज भीमा कोरेगाव इथं जाऊन तिथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन
केलं. भीमा कोरेगाव इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला
शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचं
भव्य स्मारक उभारलं पाहिजे, असं ते म्हणाले. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन
शासनानं संपादित करावी, अशी मागणीही आठवले यांनी यावेळी केली. शिवसेनेच्या नेत्या सुषमा
अंधारे यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं.
****
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं आज औरंगाबाद
इथल्या खाजगी रूग्णालयात निधन झालं. ते १०२ वर्षांचे होते. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार
तालु्क्यात गऊळ इथं त्यांचा जन्म झाला होता. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे
सदस्य राहिले. केशवराव धोंडगे यांनी पाच वेळा आमदार तर एक वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व
केलं. धोंडगे यांनी मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडले त्यामुळे त्यांना
मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ असंही म्हटलं जात होतं. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय
सहभागही घेतला होता.
****
रेल्वेमंडळाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनिलकुमार
लाहोटी यांनी आज पदभार स्वीकारला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लाहोटी
यांची रेल्वेमंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास
मान्यता दिली आहे. अनिलकुमार लाहोटी यांनी त्यांच्या ३६ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळात
त्यांनी मध्य, उत्तर, उत्तर मध्य, पश्चिम आणि पश्चिम मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डात
विविध पदांवर काम केलं आहे.
****
२०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरं होत आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून भारत सरकारनं सुचवल्यानुसार संयुक्त राष्ट्रानं हे
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष जाहीर केलं. शाश्वत शेतीमधलं भरड धान्यांचं महत्त्वपूर्ण
स्थान आणि त्यांच्या पौष्टिकतेचे फायदे आता जगभरात पोहोचू शकतील. जी-२० बैठका आणि विविध
प्रतिनिधींना भरड धान्यांचा अनुभव घेता यावा, यादृष्टीनं त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ,
भरड धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांशी आणि संघटनांशी चर्चा असे अनेक उपक्रम हाती घेण्यात
आले आहेत. यादृष्टीनं केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय आणि काही राज्य सरकारांनी
जानेवारी महिन्यात १५ कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
****
श्रोतेहो, आकाशवाणीच्या बातम्या तुम्ही पारंपरिक पद्धतीनं रेडिओ, मोबाइल
अॅप, यूट्युबच्या माध्यमातून आतापर्यंत ऐकतच आहात. यासोबतच आता पॉडकास्टच्या माध्यमातूनही
आकाशवाणीच्या बातम्या ऐकू शकता. सर्व प्रमुख पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर ‘आकाशवाणी मराठी
बातम्या’ या नावानं उपलब्ध असलेल्या चॅनलवर आकाशवाणीच्या मराठी बातम्या तुम्ही केव्हाही
ऐकू शकता.
****
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातल्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. २१ जानेवारी ही या
परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन किंवा संस्थेच्या
कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. या परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात
किंवा संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन परीक्षेचे मानद संचालक डॉ.अभिजित लिमये यांनी
केलं आहे.
****
चला घेऊ या आघाडी, स्वछ करूया वाघाडी, असं ब्रीद वाक्य समोर ठेऊन यवतमाळमध्ये
वाघाडी नदी सौंदर्यीकरणासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी महाश्रमदान करण्यात आलं. जिल्हाधिकारी
अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघाडी नदीच्या स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाला सकाळी
सात वाजता सुरुवात करण्यात आली. गेल्या सतरा आठवड्यांपासून सामाजिक कार्यकर्ते वाघाडीच्या
स्वच्छतेसाठी झटत आहेत.
****
आजपासून पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, मुंबई आणि नागपूर इथं महाराष्ट्र
मिनी ऑलिम्पिक स्पर्धा खेळवण्यात येत आहे. १२ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत
३९ क्रीडा प्रकारांचं आयोजन करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment