Monday, 2 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.01.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      नव्या वर्षाच्या स्वागताबरोबर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाला कालपासून प्रारंभ

·      शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील;सिल्लोड कृषी महोत्सवात मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

·      पुणे तसंच मुंबईत परदेशांतून आलेले दोन प्रवासी कोरोना बाधित

·      औरंगाबाद इथं येत्या पाच ते आठ जानेवारीदरम्यान ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं आयोजन

·      शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं काल औरंगाबाद इथं निधन

आणि

·      परभणी जिल्हा पोलिस दलातल्या ७५ रिक्त जागांकरता आज भरती प्रक्रिया

****

नव्या वर्षाच्या स्वागताबरोबर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाला कालपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून भारत सरकारनं सुचवल्यानुसार संयुक्त राष्ट्रानं २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. जी -२० बैठका आणि विविध देशांच्या प्रतिनिधींना भरड धान्यांचा अनुभव घेता यावा, यादृष्टीनं या धान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ, भरड धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांशी आणि संघटनांशी चर्चा असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या दृष्टीनं केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय आणि काही राज्य सरकारांनी जानेवारी महिन्यात १५ कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

****

शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं तसंच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचं राज्यस्तरीय उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी बोलताना ते म्हणाले:

‘‘शेतकरी जो आहे, हा समृद्‌ध झाला पाहिजे. त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. आणि आमचा उद्देश एवढाच आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे. आणि म्हणून आमचं सरकार सातत्याने यामध्ये काम करतंय. आपल्याला माहिती आहे, आम्ही गेल्या चार-पाच महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना जे अतीवृष्टी, अवकाळी पाऊस या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने केलेलं आहे.’’

कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांच्या संकल्पनेतून होत असलेला हा कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव दहा दिवस चालणार आहे. यातून शेतकऱ्यांना उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातल्या विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी माहिती जाणून घेतली, तसंच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगांचं कौतुकही केलं. वैदेही या रंगीत कापसाच्या प्रकाराचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले...

‘‘जलयुक्त शिवार योजना आहे, त्याची माहिती आहे. अवजारांची माहिती आहे. नवीन व्हरायटी ज्या आहेत, तेवढ्याच खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न. आम्ही कापूस आहे तिथे स्टॉलवर गेलो होतो. एक वैदेही व्हरायटी म्हणून आहे. आम्हाला त्यांनी जॅकेट दिलंय. जॅकेट म्हणजे त्याला डायिंग केलेलं नाही. कलर केलेलं नाही. हे नॅचरल कापूस आहे त्याच कलरचा. आणि अतिशय उत्कृष्ट जॅकेट बनवलंय. म्हणजे आपला शेतकरी अशा प्रकारचा मोठा उद्योजक बनू शकतो.’’

या प्रदर्शनात राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांनी सहभाग नोंदवला असून, सहाशे पेक्षा अधिक विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांचं सादरीकरण केलं जात असून, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथांचं सादरीकरणही केलं जात आहे. विविध विषयांवर ३२ चर्चासत्रंही होणार आहेत.

दहा दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवात सिल्लोड नगर परिषद आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं सर्वरोग निदान, उपचार आणि महारक्तदान शिबीर तसंच मोफत कृत्रीम भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार आहे. तसंच संगीत रजनी, लावणी, कीर्तन, कव्वाली, मुशायरा, तसंच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवात होणार असून, मराठी आणि हिंदी कलाकार, यात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात क्रिकेट स्पर्धांसह फुटबॉल, कुस्ती, शुटींग बॉल, कबड्डी तसंच राज्यस्तरीत शंकरपट स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.

****

नाशिक जिल्ह्यात जिंदाल कंपनी स्फोट प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सिल्लोडहून इगतपुरीला पोहोचत, जखमींची भेट घेऊन चौकशी केली तसंच या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काल या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून सतरा जखमींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसंच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही दुर्घटनास्थळाला भेट दिली.

****

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या पांगरी इथं फटाक्याच्या कारखान्यात काल दुपारी स्फोट होऊन आग लागली. यात सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर दहा कामगार जखमी झाले आहेत. कारखान्यात महिला कामगारांचा जास्तीत जास्त समावेश असल्याचं सांगण्यात आलं.  या स्फोटात कारखाना पूर्णपणे जळाला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपये वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नसल्याचं इंधन कंपनीनं सांगितलं आहे. व्यायावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर आता मुंबईत १ हजार ७२१ रुपये प्रति सिलेंडर इतका असेल.

****

परदेशांतून आलेल्या पुणे आणि मुंबईतल्या आणखी दोन प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ही संख्या आता सहा झाली आहे. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ही माहिती दिली. राज्यात सध्या १६४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

केंद्र सरकारने २०१६ मध्ये घेतलेल्या विमुद्रीकरण निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सरकार स्वतःहून कायदेशीर निविदांशी संबंधित कोणताही ठराव करू शकत नाही, हा निर्णय फक्त रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या मान्यतेच्या अधीन असून त्यांच्याच शिफारसीनुसार केला जाऊ शकतो असं, याचिकाकर्त्यांचे वकील पी चिदंबरम यांनी, आपल्या युक्तीवादात म्हटलं होतं.

****

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेला नड्डा मार्गदर्शन करणार आहेत.

****

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल भीमा कोरेगाव इथं जाऊन ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केलं. भीमा कोरेगाव इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात, त्यामुळे विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन संपादित करून भव्य स्मारक उभारण्याची मागणी आठवले यांनी यावेळी केली. वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही काल विजयस्तंभाला अभिवादन केलं.

****

औरंगाबाद इथं येत्या पाच ते आठ जानेवारीदरम्यान ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मासिआ यांच्या वतीनं, हे प्रदर्शन भरवण्यात येत असल्याचं, मासिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठवाडा आणि औरंगाबादसह ऑरिकचा औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी, ऑरिक सिटीत होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या एक्स्पो मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योग सहभागी होणार असून, विविध परिसंवादाचं आयोजन करण्यात आल्याचं जगताप यांनी सांगितलं.

****

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातल्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. २१ जानेवारी ही या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या परीक्षेचे अर्ज संस्थेच्या कार्यालयात किंवा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

****

विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं आजपासून संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

****

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं काल औरंगाबाद इथल्या खासगी रूग्णालयात निधन झालं, ते १०२ वर्षांचे होते. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालु्क्यात गऊळ इथं त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी पाच वेळा आमदार तर एक वेळा खासदार म्हणून जनतेचं प्रतिनिधित्व केलं. धोंडगे यांनी मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडले, त्यामुळे त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ, असंही म्हटलं जातं. शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटीची स्थापना करून धोंडगे यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलं. भटक्या समाजातल्या साहित्यिकांची मोट बांधून त्यांनी नांदेड जिल्ह्यात गुराखी गडावर साहित्य संमेलन भरवण्यास प्रारंभ केला. या साहित्य संमेलनामागची भूमिका धोंडगे यांनी एका मुलाखतीत या शब्दांत विशद केली होती...

धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त गेल्या वर्षी २४ ऑगस्टला मुंबईत विधानभवनात त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. त्यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेतही अर्ध्या तासाची चर्चा झाली होती. या चर्चेत सर्वपक्षीय नेत्यांनी धोंगडे यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणं केली होती.

धोंडगे यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी रस्त्यावरील लढा आणि विधीमंडळात त्याची समर्पक मांडणी यामुळे धोंडगे यांची भाषणं आजही मार्गदर्शक असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत दरारा असलेला 'मन्याडचा वाघ' हरपला, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असलेले संघर्षमय, प्रेरणादायी नेतृत्व हरवला अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

****

साहित्य क्षेत्रात साहित्य बाह्य घटकांचा हस्तक्षेप दूर होण्याची गरज वर्धा इथं नियोजित ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या वतीनं, काल चपळगांवकर यांचा औरंगाबाद इथं त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. वाङ्गमयीन प्रांतात उदारता असली पाहिजे असंही चपळगांवकर यांनी यावेळी आग्रहाने सांगितलं.

****

परभणी जिल्हा पोलिस दलातल्या ७५ रिक्त जागांकरता आज पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया होणार आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांनी ही माहिती दिली. या जागांसाठी चार हजार ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत. भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांच्या सोयीसाठी विविध ठिकाणाहून पोलिस मुख्यालयापर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, परभणी इथं स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन आजपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती रागसुधा यांनी दिली.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवी मंदीरात शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या काल तिसऱ्या दिवशी देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेले दागिने यावेळी देवीला घालण्यात आले होते.

****

नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या औषध निर्माणशास्त्र संकुलातर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेस एकूण ३०५ संशोधकांनी सहभाग नोंदवला असून, १८० संशोधनावर मौखिक तसंच भीतीपत्रिकाच्या माध्यमातून संशोधक सादरीकरण करणार आहेत.

****

No comments: