Thursday, 5 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

प्रत्येक नागरिकाच्या मनात जलजागरुकतेची ज्योत पेवणं अनिवार्य झालं असून, त्यासाठी अभिनव पद्धती शोधण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भोपाळ इथं पहिल्या दोन दिवसीय अखिल भारतीय जल परिषदेचं उद्घाटन आज झालं, त्यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित केलं. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी जल जीवन अभियान हे राज्याच्या विकासाचे प्रमुख मापदंड असून, नागरीक, सामाजिक संघटनांनी जलसंधारणाशी संबंधित मोहिमांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पाणी बचतीसाठी केंद्र सरकारने अटल भूजल संरक्षण योजना सुरु केली असून, या योजनेला आणखी व्यापक करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले.

जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित या परिषदेची संकल्पना "वॉटर व्हिजन@2047"अशी आहे. राज्यांच्या विविध जल भागधारकांकडून याबद्दल माहिती गोळा करणं, हे या दोन दिवसीय परिषदेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे.

***

केंद्र सरकारने अहमद अहंगेर उर्फ अबू उस्मान अल काश्मीरी याला दहशतवादी घोषित केलं आहे. त्याचे अलकायदा आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंध असून, गेल्या दोन दशकांपासून जम्मू काश्मीरमध्ये त्याचा शोध सुरु आहे. अबू उस्मान अल काश्मीरी हा भारतात इस्लामिक स्टेटच्या कारवाया पुन्हा सुरु करण्याची योजना आखत असल्याचं निदर्शनास आल्यानं, त्याला दहशतवादी घोषित करण्यात आलं.

***

औरंगाबाद इथं आयोजित ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मासिआ यांच्या वतीनं आयोजित हा महोत्सव, शेंद्रा इथल्या ऑरिक सिटीत येत्या आठ तारखेपर्यंत चालणार आहे. मराठवाडा आणि औरंगाबादसह ऑरिकचा औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी, या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

***

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी उस्मानाबाद जिल्ह्या तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथं मराठवाडा मुक्ती संग्रामातले हुतात्मा सैनिक बचिंतरसिंग यांना अभिवादन केलं. तत्पूर्वी त्यांनी उस्मानाबाद शहरातल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. त्यानंतर भटक्या विमुक्त समाजातल्या नागरिकांशी केंद्र सरकारच्या विविध योजना संदर्भात आणि सवलतींविषयी चर्चा केली.

***

महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या विविध विकासकामांमध्ये किंवा कारवायांमध्ये अडथळा निर्माण करणार्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. काल औरंगाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी, काही नागरिकांकडून पालिकेच्या कामांना जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या विरोधावर प्रशासकीय भूमिका मांडली. क्रांतीचौका जवळील रमानगर इथं कचरा डेपो हो आहे, सं सांगत विविध पक्ष, संघटनाकडून आंदोलन करण्यात आलं. त्यावर चौधरी यांनी या ठिकाणी कचरा साठवणार नसून तो फक्त ट्रान्सप्लांट असल्याचं स्पष्ट केलं.

***

औरंगाबाद महानगरपालिकेतल्या सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानदा कुलकर्णी यांचं आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, त्या ६८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

***

अहमदनगर इथल्या शब्दगंध साहित्यिक परिषदेचे २०२१ यावर्षीचे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. औरंगाबादच्या हबीब भंडारे यांना 'जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता', या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

***

विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यासाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्याची माहिती, औरंगाबाद विभागाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

***

रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने काल रस्ता सुरक्षा हेल्मेट रॅली काढण्यात आली. यावेळी न्यायाधीश डी.डी. माने यांनी रस्ता सुरक्षा आणि हेल्मेटचं महत्व याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

***

भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पुण्यात खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत परवा मुंबईत झालेला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.

//***********//

 

No comments: