Sunday, 1 September 2024

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2024

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.

****

·      महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रीय करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त

·      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ

·      छत्रपती संभाजीनगरला मुबलक पेयजल पुरवठा केला जाईल - गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची ग्वाही

·      जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषक आहार सप्ताहाचं उद्घाटन  

आणि

·      पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम, नेमबाज रुबिना फ्रान्सिसनं जिंकलं कांस्य पदक

****

महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे आणखी सक्रीय करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. काल नवी दिल्लीत जिल्हास्तरीय न्यायपालिकेच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित या परिषदेत, एका नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचंही अनावरण करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचा ७५ वर्षांचा प्रवास लोकशाहीची जननी म्हणून भारताचा गौरव वृद्धिंगत करतो, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आपल्या संबोधनात, या परिषदेमुळे जिल्हास्तरीय न्यायपालिका आणि इतरांमध्ये संवादाला वाव मिळेल, असं मत व्यक्त केलं. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी, ई-न्यायालय उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी सात हजार २०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली. या परिषदेचा आज समारोप होत आहे.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला काल नागपूर इथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या योजनेत लाभार्थी बहिणींची संख्या एक कोटी साठ लाखापर्यंत पोहोचली असून, ही संख्या अडीच कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ही संख्या तीन कोटीपर्यंत पोहोचली तरी बहिणींना मदत देण्यासाठी त्यांचे भाऊ सक्षम असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक कोटी सात लाख बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार २२५ कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात एक हजार ५६२ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

****

द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याचा कृषीमालाच्या यादीत समावेशाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या द्राक्ष बागायतदारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बेदाण्यावरील पाच टक्के वस्तू आणि सेवा कर रद्द व्हावा यासाठी पूर्वप्रक्रिया पूर्ण करुन केंद्रीय जीएसटी परिषदेला पत्र लिहिणं, यासारखे अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

****

राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा, 'विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’, २५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. यानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये, तसंच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अंतिम मतदार यादीमध्ये राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची संख्या वाढल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनानं सात हजार १० बॅलेट युनीट, तीन हजार ९२२ कंट्रोल युनीट, तर चार हजार २३१ व्ही व्ही पॅट यंत्र सज्ज केली आहेत. जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी ही यंत्रं वापरली जाणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २७ लाख ५१ हजार ६३८ मतदार आहेत.

लातूर जिल्ह्यातही सर्व तहसील कार्यालय तसंच उपविभागीय अधिकारी कार्यालयातही मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात २० लाख १६ हजार ९९० मतदारांचा समावेश आहे.

****

छत्रपती संभाजीनगरला येत्या मार्च - एप्रिलपर्यंत मुबलक पेयजल पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही, राज्याचे गृहनिर्माण तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं राजीव गांधी क्रीडांगणावर बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचं भूमिपूजन सावे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे संकुल उभारण्यासाठी राज्य सरकारने एक कोटी २० लाख रुपये मंजूर केले आहेत. तीन महिन्यांत ते उभारलं जाईल, तसंच गरवारे क्रीडा संकुला जवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारलं जाणार असल्याची माहिती सावे यांनी दिली.

****

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित राष्ट्रीय पोषक आहार सप्ताहाचं उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांच्या हस्ते काल झालं. औषधी घेण्यापेक्षा सकस संतुलित पोषक आहार, नियमित व्यायाम, योगा, आणि सकारात्मक आचार विचार यामुळे आरोग्य वृद्धींगत होतं, त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जीवनसत्व युक्त आहार घ्यावा असं आवाहन डॉ. गाडेकर यांनी यावेळी केलं.

****

राष्ट्रीय पोषण अभियान तसंच आहारात भरड धान्यांचा समावेश या विषयावर धाराशिव इथं भरलेल्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचा आज समारोप होत आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयाकडून हिमोग्लबिन, रक्तदाब, रक्तशर्करा, एचआयव्ही आदी तपासण्या करण्यात आल्या. महिला बचत गटांकडून भरड धान्य पाककृती स्पर्धा, तर भारत विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.

****

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एयर पिस्तूल प्रकारात भारताच्या रुबिना फ्रान्सिसनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं आणि नेमबाजीतलं चौथं पदक आहे. बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांनी आपापल्या एकेरीच्या गटात विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानं भारताचं या खेळात किमान एक पदक निश्चित झालं आहे. तिरंदाजीत महिलांच्या कंपाऊंड प्रकारात सरिता देवी उपांत्य फेरीत पोहोचली आहे.

****

भारतीय संविधानात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे, मात्र संविधानाचा गाभा बदलता येत नाही, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास सकट यांनी म्हटलं आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काल छत्रपती संभाजीनगर इथं विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने "सामाजिक संवाद मेळावा" घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अनुसूचित जाती - जमातीचं आरक्षण बंद करता येत नाही, याबाबत होणारा खोटा प्रचार हाणून पाडला पाहिजे, असं आवाहन अंबादास सकट यांनी केलं. या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, आरक्षण, सामाजिक न्याय आदी विषयांवर चर्चा झाली.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांनी काल अटक वॉरंट जारी केलं आहे. १६ वर्षांपूर्वी २००८ मध्ये निलंगा इथं मनसे कार्यकर्त्यांनी महामंडळाच्या बसगाडीची जाळपोळ केली होती, याप्रकरणी चिथावणीखोर भाषण केल्यामुळे राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयानं पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

****

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल नांदेड इथं आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधला. जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा निहाय तयारीचा आढावा घेऊन त्यांनी, महाविकास आघाडी जो उमेदवार ठरवेल, त्याचं काम करण्याचे निर्देशही पदाधिकाऱ्यांना दिले.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे वर्ग एक ते चार संवर्गातले एकूण ३० अधिकारी तसंच कर्मचारी काल नियत वयोमानाने सेवनिवृत्त झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते या सर्वांना सेरोमोनियल कॅप, शाल, पुष्पगुच्छ, आणि सेवा प्रमाणपत्र देऊन निरोप देण्यात आला. सामान्य भविष्य निर्वाह निधीचे धनादेशही यावेळी सर्वांना प्रदान करण्यात आले.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रातले भारतीय अभियांत्रिकी प्रसारण सेवेतले अधिकारी सुरेश बोचरे काल सेवानिवृत्त झाले. बोचरे यांनी ३८ वर्षांच्या शासकीय कार्यकाळात जालना दूरदर्शन, आकाशवाणी नागपूर, छिंदवाडा, दर्यापूर, उच्च शक्ती प्रक्षेपण केंद्र छत्रपती संभाजीनगर, आकाशवाणी बीड याठिकाणी जबाबदारी सांभाळली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं प्रत्येक पानटपरी धारकाला एक कचरापेटी तसंच थुंकीपात्र पानटपरी जवळ ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या नियमाचं पालन न करणाऱ्या पानटपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

****

No comments: