Sunday, 1 September 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०१ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 01 September 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०१ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता

*********

नवी दिल्ली इथं जिल्हास्तरीय न्यायपालिका विषयक दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा नवा झेंडा आणि विशेष चिन्हाचंही अनावरण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं आयोजित ही परिषद कालपासून दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं सुरु आहे.

                                    ****
महाविकास आघाडीतर्फे आज
, ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया या परिसरादरम्यान सुरु असलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते सहभागी झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांतिचौकात हे आंदोलन सुरु आहे.

****

दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत डिजीटल भारत निधी नावानं ओळखल्या जाणाऱ्या नियमांपैकी पहिला नियम अमलात आला असून, त्यासंदर्भात केंद्र सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. पुर्वीच्या युनिव्हर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड ऐवजी हा नियम लागू होणार आहे. या अधिसूचनेनुसार, डिजीटल भारत निधीमधून योजना आणि प्रकल्प कार्यान्वयनासाठी निधी दिला जाईल. अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, डिजीटल भारत निधीमधून अल्पसंख्याक गटांना दूरसंचार सेवांमध्ये उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं विविध योजना, प्रकल्पांना निधी देण्यात येणार आहे.

****

फ्रान्समध्ये होणाऱ्या जागतिक कौशल्य २०२४ या स्पर्धेमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तरुणांची तुकडी येत्या सहा सप्टेंबरला रवाना होणार आहे. ६१ प्रकारच्या विविध कौशल्यांमध्ये ही स्पर्धा होणार असून त्यासाठी ६० स्पर्धकांचा गट भारताचं प्रतिनिधित्व करेल. दिल्लीत आयोजित भारत कौशल्य राष्ट्रीय स्पर्धेतून यासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

****

हर घर दुर्गा अभियानांतर्गत आता राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचं प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असणार आहेत. या अभियानात विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असं आवाहन कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आहे.

****

धनगर समाजाच्या  आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या नऊ सप्टेंबरपासून पंढरपूर इथं राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. सकल धनगर समाज संघटनेचे समन्वयक अमोल कारंडे यांनी काल ही घोषणा केली. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावं, ही या समाजाची प्रमुख मागणी आहे.

                                    ****

रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणामुळे नांदेड ते मनमाड डेमू रेल्वेगाडी आजपासून येत्या ३० तारखेपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे. या महिनाभरात ही गाडी पूर्णा इथून सुटेल आणि  पूर्णा ते मनमाड अशी धावेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी मनमाड ते पूर्णा अशी धावणार आहे.  

****

सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सरासरीच्या १०९ टक्के पाऊस या काळात देशात होऊ शकतो. त्याचवेळी महाराष्ट्रासह काही भागात तपमान सरासरीपेक्षा जास्त असेल.

****

नांदेड जिल्ह्यात काल रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील विष्णुपुरी आणि मानार हे दोन्ही मोठे प्रकल्प तुडूंब भरले आहेत. तर सध्या सुरू असलेल्या पावसामुळे  इतर लघु आणि मध्यम प्रकल्पातही चांगला जलसाठा झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५६ पूर्णांक १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १३६ पूर्णांक ८० मिलीमीटर पाऊस किनवट तालुक्यात तर सर्वात कमी ६६ पूर्णांक ५० मिलीमीटर पाऊस भोकर नोंदवण्यात आला आहे.

****

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...