Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 01 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– ०१ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा
सहभाग वाढणं हे सृदृढ आणि बळकट न्यायव्यवस्थेचं द्योतक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचं प्रतिपादन
·
राजकोट पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ
महाविकास आघाडीचं आज मुंबईत आंदोलन
·
राष्ट्रीय पोषण सप्ताहाला देशभरात
सुरुवात
आणि
·
मराठवाड्यासह विदर्भात आज अनेक
ठिकाणी मुसळधार पाऊस, जलसाठ्यात
वाढ
****
विधी
आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून, भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक
आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्यायमूर्ती रविंद्र घुगे, राज्याचे महा अधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु ए. लक्ष्मीनाथ, खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह विधी आणि न्याय क्षेत्रातले
विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तम
न्याय व्यवस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रिया ही कायदेशीररित्या होण्याचा विश्वास असल्यामुळे
आपल्या देशात येण्यास गुंतवणूकदार उत्सूक असतात, त्याचंच फलित म्हणून आपण जगातली सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत
असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. न्यायदानाची प्रक्रिया ही अधिकाधिक तंत्रस्नेही आणि
लोकाभिमुख करण्यात आपण योग्यदिशेनं पावले टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोकणात
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण इथं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
पडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या
इतर नेत्यांनी हुतात्मा चौकात जमून सरकारचा निषेध केला. तिथून गेटवे ऑफ इंडियापर्यंत
मोर्चा काढून, या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्येही
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.
****
विरोधकांच्या
पायाखालची वाळू सरकली असून, त्यांना
पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली
असल्याचा दावा त्यांनी केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं
आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका केली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही
आज आंदोलन केलं. नाशिक इथं मुंबई-आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा इथल्या छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं.
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक हिताचं रक्षण होऊन त्या आर्थिक उन्नतीसाठी
सक्षम होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी व्यक्त केला आहे. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी इथं पवार यांच्या प्रमुख
उपस्थितीत जनसन्मान यात्रा काढण्यात आली, त्यानंतर ते बोलत होते. कोणाच्याही हक्काला आमचा विरोध नाही, आम्ही आरक्षणाचं रक्षण करणारे आहोत, मात्र विरोधकांनी आमच्यावर खोटा आरोप लावत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप पवार यांनी
यावेळी केला.
****
राज्यपाल
सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज देशातल्या ५० युवा नादस्वरम कलाकारांना शिष्यवृत्तीचे
धनादेश प्रदान करण्यात आले. मुंबईत झालेल्या नादस्वर उत्सव या कार्यक्रमात राज्यपालांच्या
हस्ते युवा आणि होतकरू नादस्वरम वादकांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान
करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध नादस्वर वादक शेषमपट्टी शिवलिंगम
यांना श्री षण्मुखानंद नादस्वरम चक्रवर्ती संगीत कला विभूषण जीवन गौरव पुरस्कार प्रदान
करण्यात आला. इलेक्ट्रॉनिक स्वरवाद्यांच्या वाढत्या प्रसारामुळे नादस्वरम हे ध्वनी
वाद्य हळुहळू विलुप्त होत आहे. या कलेचं जतन करण्याच्या हेतूनं दरवर्षी ५० नादस्वर
कलाकारांना चक्रवर्ती टी एन राजा रथिनम पिल्लई फेलोशिप देण्यात येते.
****
राष्ट्रीय
पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात झाली. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न
आणि पोषण मंडळातर्फे १९८२ पासून दरवर्षी एक ते सात सप्टेंबरदरम्यान हा सप्ताह साजरा
केला जातो. पोषण तसंच आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा याचा उद्देश
आहे. तसंच विविध वयोगटांच्या पोषणाच्या गरजांबाबतची माहिती नागरिकांना देणं, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पोषणाबद्दल शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या
माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम अधोरेखित करणं यावरही या सप्ताहादरम्यान भर दिला जातो.
पोषण
सप्ताहानिमित्त अकोला जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी केंद्रांवर विविध उपक्रम राबवण्यात
येणार आहेत. त्याचा शुभारंभ आज अंगणवाडी केंद्रांवर वृक्षारोपण करून करण्यात आला.
****
व्यावसायिक
गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर ही
माहिती देण्यात आली. याआधी गेल्या महिन्यात ८ रुपये ५० पैशांनी एलपीजी गॅसच्या किंमती
वाढवण्यात आल्या होत्या, तर
जुलैमध्ये गॅस सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले होते.
****
मराठवाड्यासह
विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
परभणी
जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले ओसांडून वाहत आहेत. मुद्गल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. झिरोफाटा
- पूर्णा दरम्यान माटेगाव पुलावरून पाणी आल्याने नांदेड - परभणी मार्ग बंद झाला, तसंच मलासोंना - दैठणा ओढ्यावरील पुलावर पाणी आल्यानं आठ गावांचा
संपर्क तुटला आहे. दैठणा गावात
अतिवृष्टमुळे घर कोसळलं, तर
जिंतूर तालुक्यातले ओढे ओसंडून वाहत असल्याने शेतात पाणी शिरल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. गंगाखेड तालुक्यातला मासोळी प्रकल्प पूर्णतः भरल्यानं कोणत्याही क्षणी पाणी
सोडण्यात येणार असल्याने आठ गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर यांनी सतर्कतेचा
इशारा दिला आहे.
हिंगोली
जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही
जोरदार पाऊस होत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं
कयाधू नदीसह अन्य नदी-नाल्यांना पूर आणि अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरलं आहे. सातत्यपूर्ण
पावसानं एकंदर जिल्हाभरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: हिंगोली शहरातल्या काही
व्यापारी पेठांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
बीड
शहराला पाणीपुरवठा करण्यासह परिसरात शेतीसिंचनासाठी प्रमुख जलसाठा असलेल्या पाली इथल्या
बिंदुसरा जलप्रकल्पाचा तलाव आता पूर्णपणे भरला आहे. आज याठिकाणी शेतकरी आणि स्थानिकांच्या
उपस्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं.
दरम्यान, बिंदुसरा प्रकल्पाच्या
सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं, नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा
इशारा दिला आहे.
नांदेडमध्ये
काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातले विष्णुपुरी आणि मानार हे दोन्ही
प्रकल्प पूर्ण भरले आहेत.
जालना
शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत
आहेत.
वाशिम
जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, खंडाळा घाट इथं दरड कोसळल्याने सकाळपासून वाशिम - पुसद मार्ग बंद आहे. मानोरा तालुक्यातल्या
इंजोरी इथल्या नदीला मोठा पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
यवतमाळ
च्या महागाव, उमरखेड, पुसद, दिग्रस
तालुक्याला अतिपावसाचा तडाखा बसला असून, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. तसंच जिल्ह्यातल्या नदी नाल्यांना पूर आला आहे.
****
पॅरिस
पॅरालिम्पिक स्पर्धेत आज बॅडमिंडनमध्ये महिलांच्या एसयू - पाच प्रकारात भारताच्या मनीषा
रामदास हीनं उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. उपान्त्य फेरीत तीचा सामना भारताच्याच टी
मुरुगेशन सोबत होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतलं भारताचं एक पदक निश्चित झालं आहे.
पुरुष एकेरीतही एस एल पाच - प्रकारात उपान्त्य फेरीचा सामना भारताच्या सुकांत कदम आणि
सुहास यतिराज यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत भारत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह २२व्या स्थानावर आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या परंडा इथले भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची राष्ट्रकुल
संसदीय मंडळामार्फत “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारासाठी, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारासाठी
निवड झाली आहे. परवा तीन तारखेला मुंबईत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या
पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात विविध मुद्यांवरून
सुरू असलेली आंदोलनं, राजकीय
सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं
हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जमावबंदीचे आदेश १२ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार
आहेत.
****
राज्यासह
देशभरात पडणाऱ्या पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. आज लिंगमपल्ली इथून मुंबईकडे
येणारी देवगिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. परिणामी उद्या मुंबईहून लिंगमपल्लीला
येणारी ही गाडी रद्द झाली आहे. तसंच उद्या दोन सप्टेंबरला काकीनाडा पोर्ट - साईनगर
शिर्डी ही गाडी, तसंच परवा तीन सप्टेंबरला शिर्डी
- काकीनाडा ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
उद्या
नरसापूर इथून सुटणारी नरसापूर- नगरसोल या गाडीचे खम्माम ते काझीपेट दरम्यानचे सर्व
थांबे रद्द करण्यात आले असून, ही
गाडी विजयवाड्याहून गुंटूर, पागीडीपल्ली
मार्गाने सिकंदराबादला जाणार आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या धारूर किल्ल्यातल्या आधी तीन आणि नंतर आता चौथी भिंत पडल्यानं इथल्या
इतिहासप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुरातत्त्व विभागाच्या पथकाकडून लवकरच पाहणी
करण्यात येणार असून, किल्ल्यातील
आवश्यक त्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव तात्काळ पाठवला जाईल, अशी माहिती पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक नितीन चौरे यांनी दिली
आहे.
****
No comments:
Post a Comment