Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 September
2024
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
· मराठवाड्यासह
राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा
८७ टक्क्यांवर
· मराठवाड्यातल्या
सगळ्या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, नांदेड-बीड-हिंगोली जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना
सतकर्तेचा इशारा
· राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
· विधी
आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं हे सृदृढ आणि बळकट न्यायव्यवस्थेचं
द्योतक - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन
आणि
· पॅरिस
पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पटकावली सात पदकं, महिला बॅडमिंटन
स्पर्धेत आज सुवर्णपदकाची संधी
****
मराठवाडा, विदर्भासह
राज्यात अनेक अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह
जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातलं
जायकवाडी धरण ८५ टक्के भरलं असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्यानं आवक वाढणार
आहे. धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्यानं, नदीकाठावरील
गावातल्या नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे. वैजापूर
आणि गंगापूरसाठी नांदुर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्यात आलं.
परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळै
ओढे, नाले ओसांडून वाहत आहेत. मुद्गल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. झिरोफाटा
- पूर्णा दरम्यान माटेगाव पुलावरून पाणी आल्यानं नांदेड - परभणी मार्ग बंद झाला असून,
मलासोंना - दैठणा ओढ्यावरील पुलावर पाणी आल्यानं आठ गावांचा संपर्क तुटला आहे. दैठणा
गावात अतिवृष्टमुळे घर कोसळलं, तर जिंतूर तालुक्यातले ओढे ओसंडून वाहत असल्याने
शेतात पाणी शिरलं आहे. गंगाखेड तालुक्यातला मासोळी प्रकल्प पूर्ण भरला असून,
उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल सलग
दुस-या दिवशीही जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वादळी
वाऱ्यासह पाऊस झाल्यानं कयाधू नदीसह अन्य नदी- नाल्यांना पूर आणि अनेक
भागांत घरांमध्ये पाणी शिरलं आहे. विशेषत: हिंगोली शहरातल्या काही व्यापारी
पेठांमध्ये पाणी साचल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर
धरणाचे १४ दरवाजे उघडून २७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात
येत आहे. त्यामुळं पूर्णा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता असून, नदी काठच्या गावांना
सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड शहरासह जिल्ह्यात काल
दिवसभर पावसाने सर्वदुर हजेरी लावली असून नदी, नाले वाहू लागले आहेत. बिंदुसरा
जलप्रकल्पाचा तलाव पूर्णपणे भरला असून, काल याठिकाणी शेतकरी आणि
स्थानिकांच्या उपस्थितीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. जिल्ह्यातले
१४३ मध्यम आणि ३६ लघू प्रकल्प तुडुंब भरले आहेत. बिंदुसरा प्रकल्पाच्या
सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं,
नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सावधांतेचा इशारा
दिला आहे. परळी-बीड महामार्गावरील पांगरी इथला पर्यायी पूल पाण्याखाली गेल्यानं, या मार्गावरुन
जाणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर
वाढला असून, आपत्कालीन स्थितीत त्वरित मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याचं आवाहन
खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. जलाशय आणि नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी
सावध राहण्याची सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातही
मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातल्या गोदावरी, मांजरा, पैनगंगा, आसना, लेंडी, सीता
या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात बचावकार्यासाठी स्थानिक पथकांसह राष्ट्रीय
आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे
शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं, अनेक घरांची पडझड झाली, तर १२ जनावरे दगावल्याचं वृत्त
आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन जिल्हाधिकारी
अभिजीत राऊत यांनी केलं आहे. सध्या सुरु असलेला पाऊस थांबताच अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. मंठा तालुक्यातल्या पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी, माळतोंडी, देवठाणा या गावांना
पुराचा फटका बसला आहे. पांगरी खुर्द गावातला पाझर तलाव पूर्ण भरल्यानं नागरीकांना सुरक्षित स्थळी
हलवण्यात आलं आहे. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी, रामसगाव, शेवता, बानेगाव, लिंगसेवाडी, सौंदलगाव, मंगरूळ याठिकाणी जोरदार
पाऊस झाला. त्यामुळे या भागातले नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
धाराशिव जिल्ह्यात काल दिवसभर
पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची शक्यता
वर्तवली जात आहे. जिल्ह्यातले ४० सिंचन प्रकल्प पूर्ण भरले आहेत. मात्र
उमरगा, लोहारा तालुक्यात अद्याप एकही मध्यम प्रकल्प भरलेला नाही.
लातूर शहरासह जिल्ह्यातह पावसाचा
जोर वाढला आहे. शेती पिकांसाठी हा उपयुक्त मानला जात आहे. नागरीकांनी विशेषत: शेतकर्यांनी
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने
केलं आहे.
****
येत्या दोन दिवसात
राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जना
आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्यातल्या
सर्व जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. आज कोल्हापूर
मधल्या वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला त्या
उपस्थित राहतील. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या
दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी
वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहतील. तर चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं
बुद्ध विहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र
सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थींच्या
मेळाव्याला देखील त्या संबोधित करतील.
****
विधी आणि न्याय क्षेत्रात
महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून, भारतीय न्याय व्यवस्था
अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी
विद्यापिठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन काल फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. उत्तम न्याय व्यवस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रिया ही कायदेशीररित्या होण्याचा
विश्वास असल्यामुळे आपल्या देशात येण्यास गुंतवणूकदार उत्सूक असतात,
त्याचंच फलित म्हणून आपण जगातली सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असल्याचं
फडणवीस यावेळी म्हणाले. न्यायदानाची प्रक्रिया ही अधिकाधिक तंत्रस्नेही आणि
लोकाभिमुख करण्यात आपण योग्यदिशेनं पावले टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या
मालवण इथं राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेच्या
निषेधार्थ महाविकास आघाडीनं काल मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष
खासदार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास
आघाडीच्या इतर नेत्यांनी हुतात्मा चौकात जमून सरकारचा निषेध केला. नांदेडमध्येही
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात
आलं.
****
विरोधकांच्या पायाखालची
वाळू सरकली असून, त्यांना पराभव दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. तर छत्रपती
संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी, महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका केली.
दरम्यान, महाविकास
आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानेही काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलन
केलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक
स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच कायम आहे. निषाद कुमार यानं उंच उडी स्पर्धेत
रौप्य पदक पटकावलं, तर महिलांच्या दोनशे मीटर स्पर्धेत प्रीती पालनं
कांस्य पदक जिंकलं. या पदकामुळं भारताची पदकसंख्या सात झाली आहे. आज महिला
बॅडमिंटन स्पर्धेत तुलसीमती मुरुगसेन सुवर्णपदकासाठी, तर मनीषा रामदास
कांस्यपदकासाठी खेळणार आहे.
****
बैल पोळा आज साजरा होत
आहे. बळीराजाच्या कष्टात मोलाची साथ देणा-या बैलांप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली
जाते. आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांना सजवून त्यांचं पुजन करण्यात येतं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या
परंडा इथले भाजपचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची राष्ट्रकुल
संसदीय मंडळामार्फत “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारासाठी, तर मराठवाडा
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कारासाठी
निवड झाली आहे. उद्या मुंबईत राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
राज्यासह देशभरात पडणाऱ्या
पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काल लिंगमपल्ली
इथून मुंबईकडे येणारी देवगिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली होती, परिणामी
आज मुंबईहून लिंगमपल्लीला येणारी ही गाडी रद्द झाली आहे. त्याचबरोबर आज मुंबई - सिकंदराबाद
देवगिरी एक्स्प्रेस, नांदेड - संबलपुर एक्स्प्रेस, तिरुपती-आदिलाबाद
कृष्णा एक्स्प्रेस, काकीनाडा - साईनगर
शिर्डी तर उद्या तीन तारखेला आदिलाबाद-तिरुपती कृष्णा एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा
एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
आज नरसापूर इथून सुटणारी नरसापूर- नगरसोल
या गाडीचे खम्माम ते काझीपेट दरम्यानचे सर्व थांबे रद्द करण्यात आले असून, ही गाडी
विजयवाड्याहून गुंटूर, पागीडीपल्ली मार्गाने सिकंदराबादला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment