Wednesday, 25 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024 रोजीचे दुपारी : 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 September 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय अर्थव्यवस्था २०३० पर्यंत सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याकडे अग्रेसर असल्याचं निरीक्षण, अमेरिकेतल्या गोल्डमन सॅक्स या जागतिक ब्रोकरेज कंपनीनं नोंदवलं आहे. सक्षम सकल घरगुती उत्पादन आणि सकारात्मक गुंतवणूकदार यामुळे भारताचं उत्पन्न स्थिरगती राखून आहे आणि ही गती २०३० पर्यंत कायम राहील, असं या कंपनीनं म्हटलं आहे. मूडीज ॲनलिटिक्स या दुसऱ्या अशाच कंपनीनं, २०२५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सात पूर्णांक एक टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

****

अपघात घडवून आणण्यासाठी रेल्वे रुळांवर अडथळे निर्माण करण्याच्या घटनांची रेल्वेनं गंभीर दखल घेतली असून अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन दक्ष आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालय यासंदर्भात सर्व राज्य सरकारांच्या निरंतर संपर्कात आहे. राज्यांचे पोलीस महासंचालक, गृह सचिव, तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयए यांनाही या घटना टाळण्याच्या अनुषंगानं दक्ष राहण्याच्या सूचना दिल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. कोणीही अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशारा वैष्णव यांनी दिला.

****

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ते आज नाशिक इथं उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहा यांनी काल नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

****

राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. सध्या धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.

****

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क रहावं, कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये, तसंच कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पवना धरणही शंभर टक्के क्षमतेने भरलं आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

****

राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. बळीराजाला सुखी, समृद्ध करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढवणं गरजेचं असून, प्रगती पथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.

यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या निम्न खैरी, रामनगर, दिंडेगाव लघू पाटबंधारे प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला आहे. करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली

****

No comments: