Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 25 September 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २५ सप्टेंबर २०२४
सायंकाळी ६.१०
****
· पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर;विविध
विकास प्रकल्पांसह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं राष्ट्रार्पण
· बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून
शंका व्यक्त
· ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं उपोषण स्थगित
आणि
· मराठवाड्यात जायकवाडीसह तेरणा, ईसापूर आणि मांजरा धरणातून विसर्ग
सुरू
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
त्यांच्या हस्ते देशभरातल्या २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं
भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते
स्वारगेट सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. तसंच स्वारगेट -कात्रज मेट्रोची पायाभरणी करतील.
भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं भूमिपूजनही पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे. याशिवाय तीन परम रुद्र संगणकांचं लोकार्पण, ट्रक चालकांसाठी महामार्गालगत सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज एक हजार विश्रामगृहांचं
लोकार्पण,
देशभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी पाचशे चार्जिंग स्टेशन्स तसंच
२० एलपीजी स्टेशन्स आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या
हस्ते उद्या राष्ट्रार्पण होणार आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेअंतर्गत सुमारे
सात हजार ८५५ एकर क्षेत्रावरच्या तीन टप्प्यातल्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं
सहा हजार चारशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. मराठवाड्याचं आर्थिक केंद्र होण्याची क्षमता
या प्रकल्पात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
शेंद्रा इथल्या ऑरिक सभागृहात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण पाहण्याची व्यवस्था करण्यात
आली आहे,
प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे यांनी ही माहिती दिली.
****
दरम्यान, केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया
उपक्रमाला आज १० वर्ष पूर्ण झाली, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. या उपक्रमामुळे विविध क्षेत्रातली निर्यात वाढली, उत्पादन क्षमतेचा विकास होऊन अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं
आहे.
****
महाराष्ट्रातल्या वाढवण तसंच ग्रेट निकोबार बेटावरच्या गालाथी
खाडी इथं नवीन बंदरं विकसित करण्यात येत आहेत. केंद्रीय बंदरविकास, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ही माहिती दिली. देशातल्या
बंदरांची एकूण माल हाताळणी क्षमता येत्या ५ वर्षात दुप्पट होणार असल्याचा विश्वासही
सोनोवाल यांनी वर्तवला.
****
जनतेला परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यासाठी गेल्या दहा वर्षात
मजबूत पायाभूत आराखडा निर्माण केल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि
कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत अखिल
भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स च्या एकोणसत्तराव्या स्थापना दिन समारंभात बोलत होते.
वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या जागा वाढवणं आणि प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयं
सुरू करणं,
अशी पावलं सरकारने उचलल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.
****
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या औचित्यानं आज मुंबईत
मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड महापालिका
कार्यालयातही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आलं.
****
बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या चकमकीबद्दल मुंबई
उच्च न्यायालयानं शंका व्यक्त केली आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या
मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं मत, न्यायमूर्ती
रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं व्यक्त केलं आहे.
या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी
ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं यावेळी बजावलं.
****
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात
आंतरवाली सराटी इथं गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी उपोषण
स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. आता उपोषण करून नाही तर सत्तेत बसून आरक्षण मिळवू, असं जरांगे यांनी म्हटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा
देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात डोंगरगाव पूल इथे नागरिकांनी आज कयाधू नदीपात्रात उतरून
आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, या मागणीचं निवेदन यावेळी नायब तहसीलदार आणि तलाठ्यांना देण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या शेतकरी आणि महिला बचत गटांसाठी प्रत्येक
तालुक्यात सुक्ष्म प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या प्रमुख पिकांच्या
कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करून पीक मूल्य साखळी विकसित करणं, हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातून सोळा बचतगटांची निवड
करण्यात आली असून, या बचतगटांनी प्रक्रिया उद्योग उभारणी केल्यानंतर
त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महा अभियानाला चांगला प्रतिसाद
मिळत आहे. आज गंगाखेड तालुक्यात दैठणा गावातल्या अंगणवाड्यांनी मिळून पोषण आहार मेळावा घेतला. या मेळाव्यात मोड आलेली
कडधान्यं,
पालेभाज्या, फळं यापासून बनवलेल्या विविध
पाककृतींची मांडणी करण्यात आली होती. यावेळी गरोदर माता तसंच बालकांच्या आहाराविषयी
मार्गदर्शन करण्यात आलं.
****
भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यानं कसोटी क्रिकेटच्या टॉप टेन मानांकन यादीत पुनरागमन केलं असून, तो आता या यादीत भारताच्याच यशस्वी जैस्वालसोबत पाचव्या स्थानावर आला आहे. भारतीय
कर्णधार रोहित शर्मानं पाच स्थानांच्या घसरणीनंतरही या यादीत स्थान राखलं असून, तो दहाव्या क्रमांकावर आहे.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे
१४ दरवाजे अर्धा फूट तर चार दरवाजे एक फूट उघडण्यात आले असून, धरणातून अकरा हजार ५२८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात
येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं
आहे.
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा
धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग
सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं
आवाहन प्रशासनानं केलं आहे.
या पार्श्वभूमीवर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी
आज मांजरा नदीवरच्या नागझरी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, तसंच उपाययोजनांचा आढावा घेतला.
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणाचे तीन वक्र दरवाजे उघडून
पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त
भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या
गावातल्या नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर
नियंत्रण कक्षानं केलं आहे.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी
ऑरेंज अलर्ट,
तर परभणी, नांदेड, हिंगोली,
बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दीपक बनसोडे
या सैनिकाला वीरमरण आलं. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या पळसखेड नागो या गावचे रहिवासी होते.
त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात
येणार आहेत.
****
ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या मधुरा जसराज यांचं आज मुंबईत राहत्या
घरी निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार
करण्यात येत आहेत. मधुरा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्या कन्या
तर दिवंगत शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी होत.
****
मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरनारी,
वीरपिता, वीरमाता आणि वयोवृद्ध सैनिकांकरता
परवा सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयानं आयोजित केलेल्या या मेळाव्यातून निवृत्तीवेतन तसंच स्पर्श
योजनेसंबंधित सगळ्या अडचणींचं निरसन करण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या
छावणी परिसरातल्या सर्वत्रा सभागृहात होणाऱ्या या मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी धाराशिव
जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिक्षकांनी मोर्चा काढला. जिल्हा परिषदेसह विविध खाजगी
शिक्षण संस्थांतील शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.
****
No comments:
Post a Comment