Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 September
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· शालेय बालकांच्या सुरक्षेबाबत
केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वं सर्व राज्यांनी लागू करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे
निर्देश
· तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०५
कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी
· केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
यांनी छत्रपती संभाजीनगर इथं घेतली भाजपची आढावा बैठक
आणि
· मराठवाड्यात जोरदार पाऊस, जायकवाडी आणि तेरणा धरणातून विसर्ग
सविस्तर बातम्या
शाळांमधल्या
बालकांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वं लागू करण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं सर्व राज्यं आणी केंद्रशासित प्रदेशांना
दिले आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी
समन्वय साधावा, आणि मार्गदर्शक
तत्त्वांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावं, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यातल्या बदलापूरसह
काही शाळांमध्ये अलीकडेच बालकांच्या लैंगिक प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, 'बचपन बचाओ आंदोलन' या स्वयंसेवी संस्थेनं सर्वोच्च
न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावरच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना
आणि न्यायमूर्ती एन कोटीस्वर सिंह यांच्या पीठानं हा निर्णय दिला. केंद्र सरकारने आपल्या
मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रती, सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्याचे निर्देशही न्यायालयानं
दिले आहेत.
****
राज्यातल्या
विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे ३०५ कोटी ६३ लाख रुपयांच्या आराखड्यांना राज्यस्तरीय
शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली
काल ही बैठक झाली. यात श्री क्षेत्र पंढरपूर इथला दर्शन मंडप तसंच दर्शन रांग या सुविधेसाठी
१२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात भगूर इथं स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क, जळगाव जिल्ह्यात अंमळनेर इथल्या मंगळग्रह देवस्थानचा
विकास आराखडा, अमरावती
जिल्ह्यात दर्यापूर इथं संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या ऋणमोचन क्षेत्राचा विकास
आराखडा, बीड
जिल्ह्यात श्री क्षेत्र गहिनीनाथगड विकास आराखडा, तसंच दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणारे हुतात्मा
तुकाराम ओंबळे यांच्या मूळगावी सातारा जिल्ह्यात केंडबे इथं स्मारक उभारण्यास, या बैठकीत मान्यता देण्यात
आली. या सर्व कामांसाठी निधीच्या तरतुदीलाही शिखर बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुणे
महानगर विकास प्राधिकरणाच्या तीन हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पालाही या बैठकीत
मान्यता
देण्यात आली.
****
आगामी
विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प, भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल पक्षाच्या पदाधिकारी
संवाद बैठकीत ते बोलत होते. विभागातले पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल
अमित शहा, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली. यासंदर्भात
लवकरच घोषणा केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहारंशी बोलताना सांगितलं.
****
राज्य
मार्ग परिवहन महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणारे
चालक आणि वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार
आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीच्या उत्पन्नाचं उद्दिष्ट देऊन, ते पूर्ण करुन अतिरिक्त
उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना, उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन
भत्ता म्हणून सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात
आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.
****
मराठा
आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी
इथं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. काल त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मराठा
समाजबांधवांनी धुळे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. दरम्यान, अंतरवाली सराटी इथं ओबीसी
आंदोलनकर्ते मंगेश ससाणे, बाबासाहेब बटुळे, संतोष विरकर, बाळासाहेब दखणे, शरद राठोड, विठ्ठल तळेकर यांचं १८ सप्टेंबरपासून उपोषण सुरु
आहे. जरांगे यांच्या मागणीवर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राजरत्न आंबेडकर यांनी आपली
भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ससाणे यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन
देत आहोत
****
मराठवाड्यात
अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली.
परभणी
जिल्ह्यात काल विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातही
काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
जालना
शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. जाफ्राबाद तालुक्यातल्या
सोनगिरी इथं शेतात सोयाबीन सोंगणीचं काम करत असलेल्या गीताबाई मोळवंडे या महिलेचा अंगावर
वीज कोसळून मृत्यू झाला.
अंबड
तालुक्यातल्या काटखेडा इथं वीज कोसळून एक गाय दगावली.
धाराशिव
जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या माकणी इथला निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
असून, धरणाचे
चार दरवाजे काल उघडण्यात आले. धरणातून सध्या एक हजार ५३० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा
विसर्ग सुरु आहे.
धाराशिव
आणि लातूर जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना महसूल मंडळाच्या वतीने गावात दवंडी देऊन
सावधानतेचा इशारा देण्यात आला.
बीड
जिल्ह्यातलं मांजरा धरण ९० टक्क्यांहून अधिक भरलं आहे. आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी
धरणातून पाणी सोडण्यात येईल असं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरणही साडे ९९ टक्क्यांहून अधिक भरलं आहे.
धरणातून गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा
विसर्ग सुरु आहे.
****
दरम्यान, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी
आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात सोयाबीन काढणी करतांना पावसामुळे पिकांचं
नुकसान होणार नाही, याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी, तसंच पशुधन सुरक्षित स्थळी
बांधण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केलं
आहे.
****
तुळजापूर
इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. काल सायंकाळच्या
अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. नऊ दिवसांची
मंचकी निद्रा संपवून तीन ऑक्टोबरला घटस्थापनेच्या पहाटे देवी तुळजाभवानी सिंहासनावर
विराजमान होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरपालिका आणि देवगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता
ही सेवा या स्वच्छता पंधरवड्यानिमित्तानं काल मानवी साखळी करत विद्यार्थ्यांना
एकतेचा संदेश देण्यात आला. तेराशे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
****
परभणी
इथं राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेला कालपासून प्रारंभ झाला. खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
यावेळी उपस्थित होते. उद्या २६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातल्या
३६ जिल्ह्यातल्या ५४ संघांचे ४७० खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
गडचिरोली
जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातल्या नारायणपूर जिल्ह्यात पोलिसांसोबत
झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी मारले गेले. यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश
मडावी याचाही समावेश आहे. त्याच्यावर २५ लाख रुपयांचं बक्षीस होतं.
****
जागतिक
पर्यटन दिनानिमित्त परवा २७ सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात तेर इथं हेरिटेज वॉकचं
आयोजन करण्यात आलं आहे
****
No comments:
Post a Comment