Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 September
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु
असून, जलसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग
सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिरसरात
आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी
धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. आज सकाळी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात
आले असून, ९ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात
येत आहे. आवक पाहून पाण्याचा विसर्ग कमी - अधिक करण्यात येईल, नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा
विभागाने केलं आहे.
****
लातूर-धाराशिव सीमेवर असलेल्या निम्न
तेरणा प्रकल्पात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या १४ वक्र
दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं
केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातही पाऊस सुरु असून, इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे
आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५
घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या
खडकवासला धरणसाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पावना
धरणही शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.
****
नाशिक शहरातही काल मुसळधार पाऊस
झाला. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू - काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला
यांच्यासह २३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन टप्प्यात ही निवडणूक होत असून, मतमोजणी आठ ऑक्टोबरला होणार आहे.
****
राज्यात वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी
‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते काल मुंबईत या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. सहज आणि सुलभ व्यवसायाच्या
माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातल्या सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि
यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित
करण्यात आली आहे. राज्याच्या नवीन एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून
लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन अधिक रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन
प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या
निम्न खैरी, रामनगर,
दिंडेगाव लघू पाटबंधारे
प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.
****
ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था
घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल ८५ कोटी ८८ लाख रुपये किंमतीच्या स्थावर
मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि
बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा, आणि भूखंडाचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी ९५ कोटी
रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तांवर जप्ती किंवा टाच आणली आहे.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी
अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं
सुरू केली आहे. याप्रकरणी सीआयडीच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलिस स्थानकाला भेट
दिली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र
विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेमध्ये
कोल्हापूर जिल्ह्यातले अशोक ठाणेकर हे अराखीव
आणि मागासवर्गवारीतून राज्यात प्रथम, तर नांदेड जिल्ह्यातल्या अश्विनी गायकवाड या महिला वर्गवारीतून
राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या
माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला आहे.
करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच
राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
ते काल धाराशिव इथं ऊस उत्पादक शेतकरी स्नेह संवाद मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, तेरणा साखर कारखाना परिसरातल्या साखर कारखान्यापेक्षा ५१ रुपये
अधिकचा दर देणार असल्याचं आश्वासनही सावंत यांनी दिलं.
****
जालना शहरातल्या मुलचंद भगवानदास
या रेडीमेड कापड विक्री दालनाचे संचालक अलकेश बगडिया यांनी काल स्वत:च्या घरात डोक्यात
गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नसल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment