Monday, 27 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.01.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 27 January 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करणार आहेत. दिल्लीत जनरल करिअप्पा परेड मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याची यावर्षीची संकल्पना ‘युवा शक्ती - विकसित भारत’ ही आहे. यावेळी ८०० हून अधिक कॅडेट्सकडून, राष्ट्र उभारणीसाठी एनसीसीची वचनबद्धता दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात १८ मित्र देशांतले १४४ कॅडेट्स सहभागी होणार आहेत.

****

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होत आहे. हा कायदा लागू करणारं देशातलं हे पहिलंच राज्य असून, यासंदर्भातल्या सर्व नियमांची अंमलबजावणी, अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आणि इतर तयारी पूर्ण झाली असल्याचं मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी स्पष्ट केलं आहे. समान नागरी कायद्यासंदर्भातल्या एका संकेतस्थळाचं अनावरणही आज त्यांच्या हस्ते होणार आहे. जात, धर्म आणि लिंगाधारित नागरी कायदे तसंच लग्न, घटस्फोट, वारसाहक्क आदी अधिकार सर्वांना समान असावेत यासाठी हा कायदा महत्वाचा असल्याचं, धामी यांनी सांगितलं.

****

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले आहेत. त्रिवेणीसंगमावर स्नान केल्यानंतर ते पुरी आणि द्वारका इथल्या शंकराचार्यांची तसंच इतर संतांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, परवा २९ तारखेला मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होण्याची शक्याता लक्षात घेऊन महाकुंभ मेळा क्षेत्र वाहनविरहित क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसंच जास्त गर्दी होणार नाही याची खात्री करण्यासाठी एकात्मिक नियंत्रण आणि सूचना केंद्र सक्रिय करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जास्त गर्दी असलेल्या भागात जलद प्रतिसाद पथकं तैनात करण्यात आली आहेत.

****

उद्योगमंत्री  तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर इथल्या १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचं काल उद्घाटन झालं. महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पोहोचवण्यासाठी राज्यातल्या गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांचा माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असे सामंत यावेळी म्हणाले.

आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यावेळी उपस्थित होते.

****

राज्य शासनामार्फत लातूर जिल्हा प्रशासनातल्या विविध विभागांना ४२ चारचाकी वाहनं काल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. तसंच जिल्हा क्रीडा संकुल इथं प्रजासत्ताक दिनी आयोजित या कार्यक्रमामध्ये पोलीस विभागाच्या अभया सुरक्षित प्रवास योजनेंतर्गत क्यूआर कोड बसवलेल्या वाहनांना पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. लातूर शहरातल्या महिला, बालक आणि वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित, कोणतीही भीती न बाळगता प्रवास करता यावा, यासाठी पोलीस प्रशासनाने अभया सुरक्षित प्रवास योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे प्रवाशांना ऑटो रिक्षावर, सिटी बसमध्ये लावण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन करून तत्काळ पोलीस मदत मागवता येईल.

दरम्यान, लातूर इथं काल जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

आर्थिक उदारीकरणानंतरही शिक्षणाचं क्षेत्र दुर्लक्षितच होतं, मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं यात हेतूपूर्वक हस्तक्षेप करून शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयीकरण आणि व्यापक लोकशाहीकरण केलं, असं मत राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉकटर शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं कुसगाव इथं आयोजित प्राचार्य आणि संचालकांच्या निवासी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. राष्ट्रनिर्मितीमध्ये प्राचार्य, संचालक आणि शिक्षकांची संस्थात्मक जबाबदारी आणि व्यक्तिगत पातळीवरची सिद्धता ही खूप महत्त्वाची असल्याचं सांगत शिक्षणसंस्था, शिक्षक आणि प्राचार्य हे परिवर्तनाचा दुवा असल्याचं, देवळाणकर म्हणाले.

****

हिंगोली जिल्ह्यात काल रात्री झालेल्या दोन वेगेवगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले. वसमत-मालेगाव मार्गावर कन्हेरगाव फाट्याजवळ दुचाकीचा अपघात होऊन दोन जण ठार झाले. दुचाकीवरील दोघेजण नांदेडहून परभणीकडे जात होते. 

अन्य एका अपघातात कळमनुरी तालुक्यात शेवाळा कालव्याच्या पुलावर नियंत्रण सुटल्याने दुचाकीवरील तरुणाचा कालव्यात पडून मृत्यू झाला.

****

खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धांच्या पहिल्या टप्प्याची आज सांगता होत आहे. भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांनी पुरूषांच्या आईस हॉकीमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलं. आज अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकून, पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...