Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज शहीद दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातून महात्मा गांधीजींना तसंच देशासाठी प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. नवी दिल्लीत राजघाट या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली आहे. गांधीजींचे आदर्श देशवासियांना विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी, देशासाठी आपल्या प्रणांचं बलिदान दिलेल्या शूर वीरांना आदरांजली अर्पण केली आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या ३१ तारखेपासून सुरु होणार असून, शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
****
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौर्यावर असून, जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पूर्वी बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असून, चांगल्या कामाची स्पर्धा करा, कोणत्याही प्रकारचे वेडे वाकडे प्रकार सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.
****
येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि यासाठी राज्याचं गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर करण्यात येईल, असं आश्वासन, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पी एम आर डी ए सह सोलापूर जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनेतल्या तीन हजार ६६२ सदनिकांच्या विक्रीकरता संगणकीय सोडत काल एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नव्या धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृहं उभारली जातील, असं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्राला दिलेलं धान्य वितरणाचं लक्ष्य वाढवून आठ कोटी २० लाख टन करण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. गेल्या दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून देण्याबाबत राज्य शासनानं २०२१ साली केंद्र सरकारला प्रस्ताव दिलेला आहे. त्याला मान्यता द्यावी, अशी विनंती अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी काल केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. अन्न धान्य वितरण प्रणाली सुरळित करणं, ऑनलाईन वितरण प्रणालीतल्या समस्या दूर करणं, शिधा पत्रिका व्यवस्थापन प्रणाली संपूर्णत: सुरळीत चालू ठेवणं, अन्न महामंडळाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा, आदी मागण्या मुंडे यांनी केल्या. या सर्व यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही प्रल्हाद जोशी यांनी दिली.
****
राज्यातल्या गुइलेन बॅरे सिंड्रोम - जीबीएस आजाराची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात या आजाराची रुग्णसंख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नेमलेल्या उच्चस्तरीय पथकानं काल परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच, ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत बैठक घेतली. केंद्रीय पथकानं काल सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याचा स्रोतांची पाहणी केली. या पथकानं रुग्णसंख्या वाढण्याच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू केला आहे.
सांगली जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित रुग्ण तर एक रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आला आहे.
****
मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं सुरू केलेल्या उपोषणाची शासन दखल घेत नसल्याचा आरोप करत, लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयापुढे घोषणाबाजी करण्यात आली. पुढच्या दोन दिवसात शासनानं या उपोषणाची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
****
धुळे महापालिकेच्या कर वसुली पथकानं काल शहरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीवर जप्तीची कारवाई केली. ही जागा राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीची असून सुमारे ८५ लाख रुपये मालमत्ता कर थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
अहिल्यानगर मधल्या वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उद्घाटन काल पोपटराव पवार यांच्या हस्ते झालं. गादी आणि माती गटातील कुस्त्यांना काल सकाळी प्रारंभ झाला. या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी २० मल्ल सहभागी झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment