Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 28 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
पूर्वोत्तर भारत देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जेव्हा जागतिक व्यापारात भारताचा मोठा वाटा होता, तेव्हा देशाच्या पूर्वेकडच्या भागाचं महत्त्वाचं योगदान होतं, असं सांगून पंतप्रधानांनी, ओडिशाशी व्यापारी संबंध मजबूत करण्यात आसियान देशांनी तयारी दर्शवली असल्याचं सांगितलं.
ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पुर्वोदय दृष्टीकोनाचं केंद्र तसंच भारताचं आघाडीचं गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशाने ओडिशा सरकारने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
****
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास १५ कोटी नागरीकांनी पवित्र संगमात स्नान केलं आहे. या मेळ्यात उद्या पौष महिन्यातल्या मौनी अमावस्येनिमित्त दुसरं शाही अमृत स्नान होणार आहे. यानिमित्त महाकुंभमेळा क्षेत्रात भाविकांचं आगमन सुरू आहे. भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सरकारने सात-स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून, महाकुंभ परिसराला नो-व्हीआयपी झोन घोषित करण्यात आलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. तसंच येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
****
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून एक हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून औरंगाबाद विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
****
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत या आजारासंदर्भात अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
परभणी इथं हिंदू - मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत शहा तुराबुल हक दर्ग्याचा ऊर्स दोन फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल याचा आढावा घेतला. १५ दिवस चालणार्या या उर्स मध्ये देशभरातून भाविक आणि व्यापारी मोठ्या संख्येने येतात. या काळात कायदा आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी सर्व धर्मीय शांतता कमिटीची बैठक देखील घेण्यात आली.
****
भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment