Tuesday, 28 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.01.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 January 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०

****

गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. 

सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे पाच संशयित-लातूर इथल्या रुग्णांचा समावेश-आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन. 

राज्यसरकारतर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. 

आणि

महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा स्कॉटलंडवर १५० धावांनी दणदणीत विजय.

****

गुईलेन बॅरे सिंड्रोम-जीबीएसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकार शक्ती कमी झाल्याने तसंच दूषित पाणी आणि न शिजवलेले मांस खाल्यामुळे हा आजार होतो, त्यामुळे अशाप्रकारचं अन्न टाळावं आणि पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. 


दरम्यान, जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजाणी करावी. तसेच या रुग्णांची दैनंदिन अद्ययावत माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाला सादर करावी, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या. या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विभागानं आवश्यक औषध पुरवठा आणि साधनसामुग्री उपलब्ध करून घेण्याचे निर्देशही मुश्रीफ यांनी दिले. या आजाराची सामान्य लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असं आवाहनही मुश्रीफ यांनी केलं.

****

सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. या आजारावर औषधोपचारासाठी जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्र्यांच्या परवानगीने दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. नागरिकांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तातडीनं उपाय योजना राबवाव्या अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शासकीय योजनांच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नसेल तर या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात अशी टीका पटोले यांनी केली. 

दरम्यान, एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे, १५ टक्के भाडे वाढ करून सरकार जनतेला लुटत असल्याची टीका पटोले यांनी केली.    

****

एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आजही राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

नाशिक शहरातील ठक्कर बाजार बस स्थानकावर माजी आमदार वसंत गिते, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, यांच्या उपस्थितीत सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. 

धुळे बस स्थानकावर आज सकाळी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ बसस्थानकावरही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. 

****

चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, आणि संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. सिने टी व्ही संघटनेचे पदाधिकारी मनोज जोशी आणि जॉनी लिव्हर यांच्यासह अनेक कलाकारांनी आज मंत्रालयात फुंडकर यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन सादर केलं, त्यानंतर फुंडकर यांनी हे निर्देश दिले.

****

राज्यसरकार यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावर्षी मुंबई इथं तीन दिवसांचा पहिला चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येईल, याबाबतच्या तारखा आणि नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील, असं शेलार यांनी सांगितलं. 

दरम्यान, साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. 

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून १ हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून छत्रपती संभाजीनगर विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे. 

****

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात उद्या मौनी अमावस्येला तिसरं शाही स्नान होत आहे. यासाठी भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सरकारने सात-स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून महाकुंभ परिसराला नो-व्हीआयपी झोन घोषित करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भाविक आणि यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. 

****

क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारताने स्कॉटलंडवर १५० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत फक्त ५८ धावांतच सर्वबाद झाला. भारताकडून आयुषी शुक्लाने ४ बळी घेतले, तर वैष्णवी शर्मा आणि गोंगादी त्रिशाने प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याआधी, भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत फक्त एक बळी गमावून २०८ धावा केल्या. भारताकडून गोंगादी त्रिशाने ५९ चेंडूत सर्वाधिक ११० धावा केल्या. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे. 

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा २०२५-२६ या वर्षासाठी १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा नाबार्ड मार्फत तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या आराखड्याचे प्रकाशन केलं. कृषी पत क्षेत्रात शेतमाल उत्पादन, देखभाल आणि विपणन, कृषी कर्ज आणि संलग्न उपक्रमांसाठी ४ हजार २६७ कोटी रुपये, कृषी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी २३९ कोटी रुपये आणि पूरक क्षेत्रविकासात सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी ८ हजार १० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. 

****

बीड जिल्ह्यात आज सकाळी ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतील ठेवीदारांनी रस्ता रोको आंदोलन केलं. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसेच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या मागण्यांसाठी ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी पाच फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. 

****

नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातील नागापूर इथल्या विविध विकासकामांचे लोकार्पण खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येक कुटूंबास ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी कचरापेटीचे वाटप करण्यात आलं. यावेळी सुंदर माझे अंगण अभियानातंर्गत उत्कृष्ट कुटूंबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

****

परभणी इथं नियोजित हजरत शहा तुराबुल हक ऊर्सच्या तयारीचा आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी आढावा घेतला. हा ऊर्स दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या ऊर्समध्ये देशभरातून भाविक आणि व्यापारी मोठ्या संख्येनं येतात. कायदा आणि सुरक्षेच्या अनुषंगानं सर्वधर्मीय शांतता समितीची बैठकही घेण्यात आली.

****

संदर्भित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. ते आज या योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. स्वस्त धान्य दुकानं, आपलं सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र आदी ठिकाणी या योजनेची नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणीसाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना स्वामी यांनी यावेळी दिल्या. 

****

बीड जिल्हा ग्रंथालयात आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हयातील शिरुर कासार ११ आणि १२ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची यावेळी मस्के यांनी माहिती दिली. 

****


No comments: