Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
• अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं केंद्र सरकारचं आवाहन.
• वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर.
• बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच.
• मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित-मात्र मुंबईत आंदोलनाचा इशारा.
आणि
• स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना प्रदान.
****
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली, या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विविध पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
****
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आज आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला. या विधेयकासंबंधी १४ सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत.
****
नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे भव्य संमेलन होत असून ते यशस्वी व्हावं, अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या.
****
राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत चालू बांधकाम प्रकल्पांना गती देऊन, निर्धारित वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मुंबईत मंत्रालयात यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. राज्यातील विविध नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच, असं पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले...
चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती इथ येऊन गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विंडमीलच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई, बीड रेल्वे पण सुरु करता येते का? का तर तुमचा मुंबईशी पण,पुण्याशी पण संपर्क कसा राहील.
दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातील ५३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहनही पवार यांनी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन तयार करण्याचे निर्देश शिरसाट यांनी दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या एक हजार ३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.
दरम्यान, लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील तालुक्यांना सम- समान निधी मंजूर करावा आणि निधी मंजूर करतांना तालुक्यांमध्ये असमान भूमिका ठेवू नये, अशी सूचना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या बैठकीत केली.
****
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं, मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण समाज मुंबईत धडकेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. आज जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदींनी जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. जरांगे यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं.
जरांगे यांनी, सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई-हैद्राबाद-सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं, आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत, राज्य सरकारला पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिली, मात्र या मुदतीतही मागण्या मान्य न झाल्यास, मुंबईकडे कूच करणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे. गांधीजींची पुण्यतिथी आज देशभर हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येते. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनीही समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसंच संरक्षणदल प्रमुखही यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्त्याहत्तराव्या बलिदान दिनानिमित्त आज मुंबईतल्या मणीभवन इथं भेट दिली. महात्मा गांधींजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी प्रार्थनासभेत भाग घेतला. आकाशवाणी मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आज हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
****
हिंगोली इथं आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पर विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. जिल्ह्यात आजपासून ते १५ फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ शेतीनिष्ठ शेतकरी कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना आज प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विद्यापीठाने देशमुख यांना या पुरस्काराने सन्मानित करून समस्त शेतकऱ्यांचा आणि शेतात कष्ट करणाऱ्यांचा सन्मान केला, अशी भावना बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
****
पाचव्या आवृत्तीचं हेरगिरी करणारं विमान भारतात तयार होत आहे. यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि सुटे भाग तयार करण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग-डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत यांनी दिली आहे. डीआरडीओ आणि इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हान्स मटेरियल अँड प्रोसेस इंजिनिअरिंग या संस्थेच्या वतीने आज पुण्यात नवीन तंत्रज्ञान आणि सुटे भाग यावर आधारित राष्ट्रीय परिसंवादात कामत बोलत होते. बुलेट प्रूफ जॅकेट निर्मिती हा पण देशासाठी महत्त्वाचा विषय आहे. या साठी लागणारा कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागतो. त्यासाठी आवश्यक सूत आणि कापडाची निर्मिती देशांतर्गत होणं गरजेचं असल्याचं मत कामत यांनी व्यक्त केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या वरळी इथं पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे. असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केल.
****
बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. आज रात्री १२ वाजेपासून ते २ फेब्रुवारी २०२५च्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.
****
No comments:
Post a Comment