Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
• एनसीसीने नवयुवकांना राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा तसंच शिस्तपालनाचं महत्त्व पटवून दिल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार.
• देशातल्या पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण.
• गुलेन बॅरी सिंड्रोममुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल.
• कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर.
आणि
• क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधनाला आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार.
****
एनसीसीने कायमच नवयुवकांना राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा दिली आणि शिस्तपालनाचं महत्त्व पटवून दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्यात ते बोलत होते. गेल्या काही वर्षात एनसीसी कॅडेटच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले...
एनसीसीने भी हर समय भारत के नौजवानो को राष्ट्रनिर्माण कि प्रेरणा दी और उन्हे अनुशासन का महत्व समझाया। मुझे संतोष है, की बीते सालो मे एनसीसी के दायरे और दायित्व दोनोको बढाने के लिये सरकारने बहुत काम किया है। एनसीसी मे रिफॉम का परिणाम हम कॅडेट के संख्या मे भी देख रहे है। 2014 मे एनसीसी कॅडेट की संख्या करीब करीब चौदा लाख थी, आज ये संख्या बीस लाख तक पहूच गयी है।
यावर्षीची संकल्पना ‘युवा शक्ती - विकसित भारत’ ही आहे. यावेळी ८०० हून अधिक कॅडेट्सकडून, राष्ट्र उभारणीसाठी एनसीसीची वचनबद्धता दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सर्वोत्कृष्ट कॅडेटसना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात १८ मित्र देशांतले १४४ कॅडेट्स सहभागी झाले आहेत.
****
देशातल्या पहिल्याच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अर्थात फिरत्या न्यायवैद्यक वाहनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. राज्यात एकूण २५६ फिरती न्यायवैद्यक वाहनं तयार करण्यात येत असून त्यातील २१ वाहनांचं लोकार्पण आज करण्यात आले. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या भारतीय साक्ष कायद्यानुसार एखाद्या गुन्ह्यातील पुराव्यांची न्यायवैद्यक पद्धतीने साक्ष तसेच पुरावे गोळा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निकषांनुसार पुरावे जमा करण्यासाठी न्यायवैद्यक वाहनांचे लोकार्पण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले...
महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. की ज्या राज्याने त्याला अनुकुल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनस तयार केलेल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्याठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये एक सायंटिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेनिक एक्सपर्टचा दर्जा आहे ज्यांचे सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे. आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही इव्हीडन्स आहे, तो इव्हीडन्स ते जमा करतील, त्यामुळे अतिशय सबळ आणि साईंटीक पुरावा हा आपल्याकडे याठिकाणी राहील.
या वाहनांमुळे गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात गुणात्मक वाढ होणार आहे. तसंच, सबळ पुरावे नसल्याने किंवा पुराव्यांसोबत छेडछाड झाल्यामुळे गुन्हेगार सुटण्याचे प्रमाणही या वाहनांमुळे कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
****
राज्य परिवहन महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या असल्याचं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. २०२९ साली या २५ हजार बसेस आणि ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३० हजार नवीन बसचा ताफा एसटीकडे असेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
****
पुण्यातल्या महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन तसंच रहिवाशांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.
****
राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या ६ हजारांहून अधिक महाविद्यालयांत “संविधान गौरव महोत्सवा” अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणं आणि नागरिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं पालन करण्यासाठी प्रेरित करणं, हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचं पाटील यांनी सांगितलं
****
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या ७ सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०१ झाली आहे. त्यातले ८१ पुणे महापालिका क्षेत्रात, १४ पिंपरी चिंचवड भागात, तर ६ इतर जिल्ह्यांमधले आहेत. याप्रकरणी २५ हजारांहून अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली आहे.
****
उत्तराखंड मध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू झाला. जात, धर्म आणि लिंगाधारित नागरी कायदे तसंच विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आदी अधिकार सर्वांना समान असावेत यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितलं. डेहराडून इथं या कायद्यासंबंधीचे नियम आणि इतर माहिती देणाऱ्या पोर्टलचं उद्घाटन धामी यांनी केलं. हा कायदा लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. लवकरच देशभरात समान नागरी कायदा लागू होईल, असा विश्वास धामी यांनी व्यक्त केला.
****
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड दिला जाणारा प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ लेखक, साहित्यिक कुमार केतकर, कुसुमाग्रज फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला नाशिक इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या ‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. संगीत सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाणार असल्याचं रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितलं. येत्या ६ फेब्रुवारीला लता दीदींच्या तिसऱ्या स्मृतीदिनी पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार राहुल देशपांडे यांना प्रदान केला जाणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या २०२४ वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांना जाहीर झाला आहे. जसप्रीत बुमराहला सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज तर महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मानधनाला एकदिवसीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात येणार आहे. जसप्रीत बुमराहनं गेल्या वर्षात सर्वाधिक ७१ बळी टिपले. तर, स्मृती मानधानाने चार शतकी आणि तीन अर्धशतकी खेळी करत ७४७ धावा केल्या आहेत.
****
दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं १ आणि २ फेब्रुवारीला होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ. संदीप गुप्ते यांच्या हस्ते होईल तर समारोप ख्यातनाम उर्दू मराठी गझलकार डॉ. गणेश गायकवाड यांच्या उपस्थित होणार आहे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष दगडू लोमटे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. संमेलनात गझल साधना पुरस्कार गझलगंधर्व सुधाकर कदम यांना देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, आणि ११ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. संमेलनात १७ मुशायरे आणि एक परिचर्चा सत्र होणार आहे.
****
धाराशिव तालुक्यातील पळसप इथं येत्या दोन फेब्रुवारी रोजी दहावं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने आयोजित या साहित्य संमेलनात संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मूल्ये या विषयावर परिसंवाद होणार आहे यासोबतच कथाकथन, कवी संमेलनाचं आयोजनही करण्यात आलं आहे. संमेलनाला साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन या संमेलनाचे आयोजक मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे.
****
हिंगोली इथं उद्या २८ तारखेपासून दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते ग्रंथदिंडीने महोत्सवाचा शुभारंभ होईल, या दिंडीमध्ये विद्यार्थी तसंच भजनी मंडळं विविध लोककला सादर करणार आहेत.
****
एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं, जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे जिल्हाभरातील वाहतूक ठप्प झाली होती. भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकर्त्यांनी दिला.
****
परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणी ते मुंबई पायी मोर्चा आज छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाला. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment