Tuesday, 28 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.01.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 January 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.

****

दरम्यान, ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे.

****

एक देश एक निवडणूक या अंतर्गत देशपातळीवर एकाचवेळी निवडणूक घेण्यावर भर दिला जात असून, तरुणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकशाहीमध्ये अशी चर्चा होण्याची गरज असून, तरुणांनी यात सहभागी व्हावं, असं ते म्हणाले.

****

देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वेमार्गांवर आधुनिक सिग्नलिंग प्रणाली बसवणं, काही धोकादायक ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालणं अशा कामांचाही रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाच्या कामांमध्ये समावेश करण्यात आलं आहे.

****

सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे सात लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेनं सर्वाधिक आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. गरज भासली तर केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदत वाढवून मागीतली जाईल, असं रावल यांनी सांगितलं.

****

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी काल पुण्यात जीबीएस या आजाराबाबत आढावा बैठक घेतली. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण मोठं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या आजारामागची कारणं शोधावीत, पाणीपुरवठा स्रोतांची, टँकरमधल्या पाण्याची तपासणी करावी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं तसंच अन्य सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश आबीटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जीबीएसच्या रुग्णांवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर इथं काल शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, मोहन जोशी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर इथं सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. गेले तीन दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात नाट्यदिंडी, विविध नाट्यप्रयोग, नृत्य गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

****

नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन निमगिरे यांनी केलं.

****

बुलडाणा इथं अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्रात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं लोकार्पण केंद्रीय आयुष,  आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगाना आवश्यक साहित्य जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते ४७  दिव्यांगांना तीन  लाख ५१  हजार रुपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं.

****

बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे.

****

No comments: