Friday, 31 January 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.01.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 January 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.

****

देशाचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आपलं सरकार अभूतपूर्व वेगानं काम करत असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. संसदेच्या आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या संसदेला संबोधित करत होत्या.

यावेळी सरकारच्या, सर्व क्षेत्रांतल्या विविध विकास योजनांचा उल्लेख करत, प्रधानमंत्री आवास योजनेचा कालावधी वाढवून, देशातल्या अजून तीन कोटी कुटुंबांना नवी घरं बांधून देण्याचा निर्णय झाल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. युवकांचं शिक्षण आणि रोजगारनिर्मिती याकडे सरकार विशेष लक्ष देत असल्याचं सांगत, देशातल्या आघाडीच्या पाचशे कंपन्यांमधून एक कोटी युवकांना इंटर्नशिप्स देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एक देश एक निवडणूक, महिला सक्षमीकरण, ई - गव्हर्नन्स, विमान वाहतूक क्षेत्रातली प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा अवलंब आदी विषयांवर राष्ट्रपतींनी भाष्य केलं.

प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं.

दरम्यान, आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज संसदेच्या सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

****

अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचं सांगितलं. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शंभर वर्षं पूर्ण करताना भारत विकसित देश झालेला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वर्षीच्या अर्थसंकल्पामुळे देशात ऊर्जा आणि आकांक्षांचा संचार होईल, असं सांगत पंतप्रधानांनी, देशाला विकसित राष्ट्र बनण्यात संसदेच्या सगळ्या सदस्यांनी आपापलं योगदान द्यावं, असं आवाहन केलं.

****

पुणे इथं आज तिसर्या विश्व मराठी संमलेनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम सुरु असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यावेळी उपस्थित आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना यावेळी विश्व मराठी संमेलनाचा साहित्यभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

तत्पूर्वी, बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसंध्या, आदी कार्यक्रम होणार आहेत.

****

राज्यात रब्बी हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे ११७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगामातल्या पिकांप्रमाणेच रब्बी हंगामातल्या धान्य उत्पादनातही वाढ होणार असल्याचा कृषी आयुक्तालयाचा प्राथमिक अंदाज आहे. रब्बी हंगामात हरभरा हे प्रमुख पीक झालं असून, त्याखालोखाल गहू, मका या पिकांचा पेराही सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. खरीप हंगामात झालेला मुबलक पाऊस, धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा, भूगर्भातील चांगली पाणी पातळी यामुळे पेरणी क्षेत्रात भरीव वाढ झाली असं पुणे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परराज्यातल्या लाभार्थ्यांनी बोगस लॉगिन आयडी तयार करून तब्बल एक हजार १७१ अर्ज दाखल केले असल्याचं समोर आलं आहे. हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधले असल्याचं पोलीस, महसूल आणि महिला बाल विकास विभागाने केलेल्या तपासात आढळलं आहे. संबंधित अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आला आहे. यातले २२ अर्ज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचं आढळलं असून, त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

लातूर इथं प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालं. दिव्याशा केंद्र सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांना आवश्यक सहायक उपकरणे देण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु राहणार असल्याचं भोसले यावेळी म्हणाले.

****

१९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान उपांत्य फेरीचा सामना होत आहे. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

****

No comments: