Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• गुईलेन बॅरे सिंड्रोम-जी बी एस च्या रुग्णांवर उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
• सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे पाच संशयित-लातूर इथल्या रुग्णांचा समावेश-आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन
• सफाई कामगारांच्या वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची सूचना
• छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी टोयाटो कंपनीचं सहकार्य
आणि
• अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ
****
गुईलेन बॅरे सिंड्रोम - जी बी एस च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. काल मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेण्यात आला. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकार शक्ती कमी झाल्याने तसंच दूषित पाणी आणि न शिजवलेलं अन्न किंवा कच्चं मांस खाल्यामुळे हा आजार होतो, त्यामुळे अशा प्रकारचं अन्न टाळावं आणि पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.
या आजाराची सामान्य लक्षणं आढळल्यास नागरिकांनी तत्काळ सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली. काल पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, नागरिकांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं.
**
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले होते. तपासणी अहवालात एका रुग्णाला हा संसर्ग नसल्याचं स्पष्ट झालं असून, दुसऱ्या रुग्णाचा अहवाल येणं बाकी आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उदय मोहिते पाटील यांनी केलं आहे.
**
कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा आणि ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं.
****
सफाई कामगारांच्या वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यातल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या आठ जानेवारीला या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. याआधी खंडपीठाने वाल्मिकी, मेहतर, भंगी, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या समुदायातल्या व्यक्ती वगळता इतर सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिली होती, ती आता उठवण्यात आली आहे.
****
राज्यात सोयाबीन खरेदीसाठी आणखी सात दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, लातूर जिल्ह्यासाठी २० हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टाला मंजुरी देण्यात आल्याचं रावल यांनी सांगितलं. सोयाबीन खरेदी केंद्रांची मुदत परवा ३१ जानेवारीला संपत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात टोयाटो कंपनी विकास कामात सहकार्य करणार आहे. कंपनीचे भारतातले मुख्य कार्यकारी उपाध्यक्ष सुदीप गुलाटी यांनी काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांची भेट घेऊन चर्चा केली. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून अंगणवाडी तसंच शाळांमध्ये पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्यात २१ हजार ५५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून १ हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून छत्रपती संभाजीनगर विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
****
प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्येला दुसरं शाही स्नान होत आहे. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती अटल आखाड्यांनी पहाटे अमृत स्नान केलं. १३ आखाड्यांना स्नान करण्यासाठी क्रम ठरवून देण्यात आला आहे. भाविकांनी विशिष्ट घाटाचा आग्रह न धरता, उपलब्ध घाटांवर स्नान करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दरम्यान, मौनी अमावस्येनिमित्त रेल्वे विभागातर्फे अतिरिक्त ६० विशेष रेल्वे चालवण्यात येत आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी ही माहिती दिली.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोनं आज शंभरावं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन आज सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी, जीएसएलव्ही एफ - 15 या क्षेपणास्त्राद्वारे एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह अवकाशात झेपावला. दूरसंचार आणि हवामानाच्या अचूक अंदाज देण्यासाठी हा उपग्रह काम करणार आहे.
****
राष्ट्रीय क्रीडा महोत्सवातून एक भारत श्रेष्ठ भारताचं सुंदर चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर काल ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर इथं झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
****
क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या आयसीसी १९ वर्षांखालील महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, काल झालेल्या सामन्यात भारताने स्कॉटलंडवर १५० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत फक्त ५८ धावांतच सर्वबाद झाला.
****
भारत आणि इंग्लंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान इंग्लंडने काल भारताचा २६ धावांनी पराभव केला, मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहे.
****
अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात होत आहे. दोन फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी सात ते ११ आणि दुपारी चार ते नऊ या वेळात या स्पर्धा होणार असल्याची माहिती, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष भुजबळ यांनी दिली. माती आणि गादी या दोन्ही प्रकारांमध्ये या स्पर्धा होणार असून राज्यभरातून ८६० मल्लं यात सहभागी होत आहेत.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसंच सहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
****
बीड इथं ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतल्या ठेवीदारांनी काल रास्ता रोको आंदोलन केलं. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसंच ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या नागापूर इथल्या विविध विकासकामांचं लोकार्पण खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी सुंदर माझे अंगण अभियानातंर्गत उत्कृष्ट कुटुंबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
****
जालना शहरात छत्रपती संभाजीनगर मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने झालेल्या अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. सनराईज हॉटेल टी पॉइंट समोर काल रात्री हा अपघात झाला. मृत कामगार बदनापूर तालुक्यातल्या कवडगाव इथले रहीवाशी होते.
****
परभणी इथं नियोजित हजरत शहा तुराबुल हक ऊर्सच्या तयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी काल आढावा घेतला. हा ऊर्स दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
****
राष्ट्रभक्ती चेतवण्याचं काम वंदे मातरम या मंत्राने केल्याचं, स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेत त्या काल बोलत होत्या. आज या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांचं व्याख्यान होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात सगरोळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आजपासून तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी क्षेत्रातल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभागी होण्याचं आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आलं आहे.
दरम्यान, लोहा तालुक्यात गुराखी गडावर भरलेल्या गुराखी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. दहा विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले. या संमेलनाचं हे तिसावं वर्ष आहे.
****
कुंभ मेळ्यातल्या शाही स्नान पर्वणीच्या निमित्तानं पैठण इथं गोदावरी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
No comments:
Post a Comment