Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. संगमावर मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. संगमावर झालेल्या गर्दीत काही भाविक बॅरिकेड्स ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. महाकुंभमेळ्यात आजच्या मौनी अमावस्येच्या दिवशी अमृतस्नानासाठी भाविकांची फार मोठी गर्दी झाली असून, योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना, आपल्या जवळच्या गंगा घाटावरच स्नान करण्याचं आवाहन केलं आहे. सुरक्षित आणि सोयीस्कर स्नानासाठी अनेक घाट तयार करण्यात आले असून, या घाटांचा वापर करून, एकाच ठिकाणी मोठी गर्दी करणं भाविकांनी टाळावं, असं, त्यांनी सामाजिक माध्यमावरून पाठवलेल्या या संदेशात सांगितलं आहे.
दरम्यान, चेंगराचेंगरीच्या या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच सर्व जखमी लवकर बरे होण्याची प्रार्थना करत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. स्थानिक प्रशासन सर्व प्रकारची मदत करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.
या महाकुंभमेळ्यात आज सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे तीन कोटी भाविकांनी स्नान केलं, तर आतापर्यंत एकूण सुमारे तेवीस कोटी भाविकांनी अमृतस्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी जीएसएलव्ही एफ - 15 या शंभराव्या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एन व्ही एस झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या क्षेपणास्त्रानं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं आहे. एनव्हीएस झिरो टू हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आाहे, अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त केला.
****
प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप आज बिटींग द रिट्रिट कार्यक्रमानं नवी दिल्लीतील विजय चौक इथं होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्री याप्रसंगी उपस्थित राहतील. सेनादल, नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील बँड या समारंभात एकंदर ३० विविध प्रकारचं सादरीकरण करणार आहेत.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी ३१ तारखेपासून सुरु होणार आहे. शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी राज्यपालांचं आज सकाळी नांदेड इथं आगमन झालं. यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे उपस्थित होते.
****
अहिल्यानगर इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांतकुमार पाटील यांचं आज पहाटे आकस्मिक निधन झालं. डॉक्टर पाटील यांनी मुंबईच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालक पदाची तसंच तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती. डॉक्टर पाटील यांच्या आकस्मिक निधनामुळे कृषी विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, सहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
****
बीड जिल्हा ग्रंथालयात काल जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या शिरुर कासार इथं ११ आणि १२ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची यावेळी मस्के यांनी माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment