Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
• प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा नवी दिल्लीत बिटींग द रिट्रिट कार्यक्रमानं समारोप.
• प्रयागराज इथं महाकुंभात मौनी अमावस्येच्या पर्वणीवर चार कोटींहून जास्त भाविकांचं पवित्र स्नान.
• वक्फ सुधारणा विधेयकाचा मसुदा तसंच सुधारित विधेयकाला संयुक्त संसदीय समितीची मान्यता.
• जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी नव्या अभ्यासक्रमांची गरज राज्यपालांकडून व्यक्त.
आणि
• लोककला आणि लोकवाद्य शिक्षणासाठी राज्यशासनाकडून विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर.
****
प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा आज बिटींग द रिट्रिट कार्यक्रमानं समारोप होत आहे. नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते. सेनादल, नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील बँड या समारंभात एकंदर ३० विविध प्रकारचं सादरीकरण करण्यात आलं.
दरम्यान प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्तम चित्ररथाचा पुरस्कार उत्तरप्रदेशच्या चित्ररथाने जिंकला आहे.
****
प्रयागराज इथल्या महाकुंभात मौनी अमावस्येच्या दिवशी आज दुपारपर्यंत चार कोटींहून जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलं असून दुपारनंतरही भाविकांची स्नानासाठी रीघ सुरू होती. जगातल्या सर्वात मोठ्या या धार्मिक सोहळ्यात तेरा जानेवारीपासून आतापर्यंत चोवीस कोटींहून जास्त भाविकांनी अमृतस्नान केलं आहे.
महाकुंभातली भाविकांची गर्दी आता नियंत्रणात असून साधू महंतांचं स्नान सुरु झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आज मौनी अमावस्येच्या पर्वणीनिमित्त स्नानासाठी आलेल्या भाविकांनी आखाडा मार्गावर लावलेली फाटकं ओलांडण्याचा प्रयत्न केला, त्यात अनेक लोक जखमी झाले, जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी हलवल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांची नक्की संख्या समजू शकली नाही मात्र सुमारे २५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असल्याचं हिंदुस्थान समाचारने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच गृहमंत्री अमित शाह यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं असून, आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, मौनी अमावस्येच्या औचित्यानं आज नाशिकच्या रामकुंड परिसरातही भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. प्रयागराज इथल्या कुंभ पर्वणीची संधी साधता न आलेल्या भाविकांनी नाशिकमध्ये दक्षिण गंगा स्नान केलं.
पैठण इथंही गोदावरी नदीपात्रात स्नानासाठी भाविक दाखल झाले होते, पाटबंधारे विभागाच्या वतीनं या पर्वणीसाठी जायकवाडी धरणातून सुमारे एकवीसशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं.
****
संयुक्त संसदीय समितीनं वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला आणि सुधारित विधेयकाला बहुमतानं मान्यता दिली आहे. समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर उद्या सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, विरोधी पक्षातल्या सदस्यांनी या अहवालावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. हा अहवाल घाईघाईत स्वीकारल्याचं मत द्रमुकचे नेते डी राजा यांनी व्यक्त केलं असून, तृणमूल काँग्रसचे कल्याण बॅनर्जी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी अहवालाच्या विरोधात मतदान केलं आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज मोहिमेला आज मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या मोहिमेसाठी चोवीस खनिजं निश्चित केली असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेतून बॅटरी आणि सौर पॅनेल्ससारख्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या लिथियम, कोबाल्ट आणि निकेल यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या खनन आणि इतर प्रक्रियांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.
ऊस आणि ऊसाच्या मळीपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलच्या दरांनाही आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. इंधनामध्ये इथेनॉलचं मिश्रण करण्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला असून, एक लाख तेरा हजार कोटी रुपये मूल्याचं परकीय चलन वाचल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. इथेनॉल उत्पादनातून देशभरातल्या शेतकऱ्यांनाही मागच्या हंगामात चाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक प्राप्ती झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी ३१ तारखेपासून सुरु होणार आहे. शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
****
राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे विहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. आतापर्यंत राज्यातील एक हजार १५७ शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, उर्वरित ३३२ शासकीय इमारतींवर हे प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावेत, असं पवार यांनी सांगितलं.
****
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी नव्या अभ्यासक्रमांची गरज असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात ते आज बोलत होते. विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाईम कमी करत आपल्यातल्या क्षमतांचा विकास करावा, असं आवाहन त्यांनी केलं. विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या, परभणी इथल्या बी. रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा हरहरे हिला राज्यपालांच्या हस्ते नांदेड चान्सलर सुवर्ण पदकानं यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
लोककला आणि लोकवाद्य शिक्षणासाठी राज्यशासनानं विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं ही घोषणा केली, ते म्हणाले...
महाराष्ट्रातील लोककला, लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या, आर्थिक टंचाईमुळे ती संधी दुर्दैवाने त्यांची गमावु नये, पहिल्यांदा अशी एक शिष्यवृत्ती योजना वर्षाला २४ विद्यार्थ्यांना, लोककला आणि लोकवाद्य यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिना अशा प्रकारची शिष्यवृत्ती आज आम्ही घोषित करत आहोत. योजनेचे निकष काय असेल, फॉर्म कसे असतील, योजनेला नाव काय असेल या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये घोषित करु.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेचा आज समारोप होणार आहे. राष्ट्रवादी विचारधारेचा राजकीय प्रवास या विषयावर विधीज्ञ आशिष शेलार या व्याख्यानमालेचं समारोपाचं पुष्प गुंफणार आहेत.
****
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ सचिन मिराज यानं कांस्यपदक जिंकलं तर महिलांच्या व्यक्तिगत ट्रायथलॉन स्पर्धेत डॉली पाटीलनं सुवर्ण आणि मानसी मोहितेनं रजत पदक जिंकलं. पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदकांसह पहिल्या स्थानावर आहे.
****
दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दुग्धव्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत सावे बोलत होते. या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक तसंच राज्यातल्या दुग्धशाळांमधल्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली
****
निवृत्ती वेतन लागू नसलेले माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी वृद्धावस्था निवृत्तीवेतन योजना सुरू असून, पात्र व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज करावेत, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी ०२४० २३ ७० ३१३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असं या कार्यालयानं म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आज बीड जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह गुन्हे आढावा बैठक घेतली. या वेळी बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांच्या आकडेवारीची माहिती घेत, यातले उघडकीला न आलेले गुन्हे उघड करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
****
No comments:
Post a Comment