Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• ७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा-नवी दिल्लीत कर्तव्यपथावर सेना दलांसह चित्ररथांचं शानदार संचलन
• छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत-पालकमंत्री संजय शिरसाट यांचं ध्वजारोहणानंतर आवाहन
• लाडकी बहीण योजनेचा लाभ सक्तीने परत घेण्याबाबतच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सरकारकडून स्पष्ट
• नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या किवळा परिसरातल्या कोंबड्यांना 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव
आणि
• १९ वर्षांखालील महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल
****
७६वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा झाला. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपतींनी स्वीकारली. 'स्वर्णिम भारत - विकास आणि वारसा' ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती. देशाची तीनही सेना दलं, सीमा सुरक्षा तसंच तटरक्षक दल, सशस्त्र पोलीस दल, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, गृहरक्षक दल अशी अनेक पथकं संचलनात सहभागी झाली होती. देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे १६ विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे मिळून ३१ चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडोनेशियाच्या सेनादलांचं ३५२ जणांचं पथकही या संचलनात सहभागी झालं होतं.
****
प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत शिवाजी पार्क इथं झाला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राज्याची सर्वांगीण प्रगती आणि लोककल्याणासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांची राज्यपालांनी आपल्या भाषणातून माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन सरकारी कामकाज अधिक गतिमान करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला.
****
मराठवाड्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट यांनी, आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.
‘‘त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपले प्रजासत्ताक, आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाही मुल्याची जपवणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावत असतो. लोकशाही बळकट करत असतो. या संविधानाचे महतीही आपण घरोघरी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो.’’
यावेळी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, सहायक फौजदार एकनाथ गायकवाड, तुकाराम आव्हाळे, तसंच जीवन रक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर नासिर शेख, आणि हवलदार दादासाहेब पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
**
जालना इथं पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
**
परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना बोर्डीकर यांनी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं, त्या म्हणाल्या...
‘‘पालकमंत्री म्हणून माझ्यावरती दिलेली आहे, त्या जबाबदारीचं भान राखत जिल्हावासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रण केलेला आहे. चांगलं काम जिल्ह्यामध्ये उभ करणार. आणि जेवढ्याकाही केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करु.’’
**
लातूर इथं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया, असं आवाहन पालकमंत्री भोसले यांनी यावेळी केलं. ते म्हणाले...
‘‘आपल्या जिल्ह्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. संविधानाची शिकवण, स्वातंत्र्य लढ्याचे बळ आणि लोकशाहीची शक्ती याच्या आधारे आपण एक भारत, श्रेष्ठ भारत घडवू शकतो. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवुया.’’
**
नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक संजय जोशी आणि पोलीस हवालदार दिलीप राठोड यांचा सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
**
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागात पोलीस आणि अन्य विभागांचं पथसंचलन, विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी, देशभक्ती गीत गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सक्तीने परत घेण्यासंदर्भातल्या बातम्या चुकीच्या असल्याचं महिला आणि बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी स्पष्ट केलं आहे. या योजनेच्या काही लाभार्थी महिला, पात्रता निकषात बसत नसल्यानं, स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसंच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत कळवण्यात येत आहे, अशाच महिलांना लाभ देण्यात येत नसल्याचं, यादव यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा इथं कोंबड्यांमध्ये 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. २० जानेवारी रोजी अनेक कोंबड्या दगावल्याचं आढळून आल्याने पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबड्यांचे नमुने पुणे इथल्या राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि भोपाळ इथल्या कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्या नमुन्यांच्या तपासणीत 'बर्ड फ्लू' लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून लोहा तालुक्यातल्या किवळा परिघातला दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
****
यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल सराफ यांनी आनंद व्यक्त केला...
‘‘प्रतिक्रिया माझी आनंदाची आहे. महाराष्ट्रभूषण मिळालं आणि त्याची वरची पायरी म्हणजे पद्मश्री आहे. त्यामुळे आनंद हा माझा आणखी वाढलेला आहे, एक पायरी वरती चढल्यामुळे. हा जो एक पायरी वरती चढल्याचा जो प्रसंग आहे, तो तुम्ही लोकांनी माझ्यावर आणलेला आहे. माझ्या लोकांनी, माझ्या ऑडीयंसनी आणलेला आहे. त्यामुळे मला त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. Thank You Very Much म्हणून.’’
****
आयसीसी १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेशवर आठ खेळाडू राखून विजय मिळवत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. बांग्लादेशच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत अवघ्या ६४ धावा केल्या. भारताने आठव्या षटकात दोन गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं.
****
नाशिक इथं झालेल्या रणजी सामन्यात काल महाराष्ट्राने बडोद्याचा ४२९ धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या बळावर महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी ६१६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बडोद्याचा संघ अवघ्या १८७ धावाच करु शकला. पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा सौरभ नवले सामनावीर ठरला.
****
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल जिल्ह्यात विविध विभागांमार्फत होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. जनहित हा प्राधान्यक्रमाचा निकष असायला हवा त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा, असं त्यांनी सांगितलं. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामांचा देखील शिरसाट यांनी आढावा घेतला.
****
धाराशिव इथं जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते काल झाली. या बैठकीत २०२५-२६ साठी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्तावित आराखडा मांडण्यात आला. दरम्यान, महा आवास योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन सरनाईक यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल जालना ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योगाची आणि शेतीमालाची निर्यात आणि आयातीसह देशातंर्गत मालवाहतूक करण्यासाठी या ड्रायपोर्टची उभारणी करण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment