Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 January 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• एनसीसीने नवयुवकांना राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा तसंच शिस्तपालनाचं महत्त्व पटवून दिल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार
• देशातल्या पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
• एसटी भाडेवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन
• बीड जिल्ह्यातल्या आठवले टोळीच्या सहा जणांविरोधात मकोका नुसार कारवाई
• गुलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल
आणि
• क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह, अर्शदीपसिंग आणि स्मृती मानधनाला आयसीसीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
****
एनसीसीने कायमच नवयुवकांना राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा दिली आणि शिस्तपालनाचं महत्त्व पटवून दिल्याचे गौरवोद्गार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्यात ते काल बोलत होते. गेल्या काही वर्षात एनसीसी कॅडेटच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले...
‘‘एनसीसी ने हर समय नौजवानो को राष्ट्रनिर्माण कि प्रेरणा दी और उन्हे अनुशासन का महत्व समझाया। १७० से ज्यादा बॉर्डर तालुका और करीब करीब 100 पोस्टल तालुका मे एनसीसी पहोच चुकी है। 2014 मे एनसीसी कॅडेट की संख्या करीब करीब चौदा लाख थी, आज ये संख्या बीस लाख तक पहूच गयी है। मै तीनो सेनाओं को भी बधाई दूंगा आपने इन युवा एनसीसी कॅडेट को विशेष रूप से ट्रेंड करने का जिम्मा उठाया।’’
या कार्यक्रमात ८०० हून अधिक कॅडेट्सनी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सर्वोत्कृष्ट कॅडेटसना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात १८ मित्र देशांतले १४४ कॅडेट्स सहभागी झाले आहेत.
****
माहिती आणि प्रसारण मंत्री आश्विनी वैष्णव आणि केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी काल नवी दिल्ली इथं ‘वेव्ज बाजार’, ‘वा उस्ताद चॅलेंज आणि वेव्ज पुरस्कार’चा प्रारंभ केला. ‘वेव्ज २०२५’ चा एक भाग म्हणून ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज सिजन- वन’ साठी जागतिक सहभागाच्या निमंत्रणाचाही यावेळी प्रारंभ करण्यात आला.
****
देशातल्या पहिल्याच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अर्थात फिरत्या न्यायवैद्यक वाहनांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. नव्या भारतीय साक्ष कायद्याच्या निकषांनुसार पुरावे जमा करण्यासाठी न्यायवैद्यक वाहनांचं लोकार्पण करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले...
‘‘महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. की ज्या राज्याने त्याला अनुकुल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनस तयार केलेल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्याठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये एक सायंटिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेनिक एक्सपर्टचा दर्जा आहे ज्यांचे सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे. आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही इव्हीडन्स आहे, तो इव्हीडन्स ते जमा करतील, त्यामुळे अतिशय सबळ आणि साईंटीक पुरावा हा आपल्याकडे याठिकाणी राहील.’’
राज्यात एकूण २५६ फिरती न्यायवैद्यक वाहनं तयार करण्यात येत असून, त्यातल्या २१ वाहनांचं लोकार्पण काल करण्यात आलं. या वाहनांमुळे गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात गुणात्मक वाढ होणार असल्यानं, गुन्हेगार सुटण्याचं प्रमाण कमी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
दुध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची सातत्यानं तपासणी, आणि रिअल टाईम मॉनिटिरिंगसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दिव्यांग कल्याण विभाग, क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचाही त्यांनी आढावा घेतला.
****
राज्य परिवहन महामंडळ-एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर इथं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
‘‘एसटी हे सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं साधन आहे या महाराष्ट्रात आणि तिची भाडेवाढ हा अन्याय आहे. एसटी फायद्यात आहे अशा प्रकारचं मागच्या काळात एसटी महामंडळाने जाहीर केलं होतं. फायद्यात असताना भाडेवाढ कशासाठी हा आमचा प्रश्न आहे. शिवसेनेनं पूर्ण मराठवाडा राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे.’’
हिंगोली जिल्ह्यातही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं, जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे जिल्हाभरातली वाहतूक विस्कळीत झाली होती. नांदेड इथं मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलकांनी बस अडवून ठेवल्या आणि घोषणाबाजी केली.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याकडे मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळलं तर पुढची दोन वर्षं परीक्षेला बसायला बंदी घालण्यात येणार असल्याचं, सीबीएसईकडून सांगण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आठवले टोळीच्या सहा जणांविरोधात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा-मकोका नुसार गुन्हा दाखल झाला आहे. १३ डिसेंबरला विश्वास डोंगरे यांच्यावर गोळीबार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. संघटित गुन्हेगारी करणाऱ्या इतर टोळ्यांवरही मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.
****
वाघांची शिकार करणाऱ्या कुख्यात बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला काल चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली. मध्यप्रदेशातल्या या टोळीने २०१३ ते २०१५ दरम्यान विदर्भात किमान १९ वाघांची शिकार केल्याचा संशय आहे.
****
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या सात सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे. दरम्यान पुण्यात या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०१ वर पोहोचली आहे. याप्रकरणी २५ हजारांहून अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली आहे.
****
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला नाशिक इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचा, पहिला लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांना जाहीर झाला आहे. येत्या सहा फेब्रुवारील लता दीदींच्या तिसऱ्या स्मृतीदिनी पुण्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे २०२४ वर्षाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार काल जाहीर झाले. जसप्रीत बुमराहला सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज, महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मनधनाला एकदिवसीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्शदीप सिंगला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात येणार आहे. पुरुषांच्या क्रिकेटमधे एकदिवसीय आणि टी ट्वेंटी प्रकारातला सर्वोत्कृष्ट संघाचा मान भारतीय संघानं पटकावला आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघानी रंगवास्तू ही एकांकिका काल सादर केली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात परवा ३० जानेवारी पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
****
दुसरं अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं एक आणि दोन फेब्रुवारीला होणार आहे. या संमेलनात गझलगंधर्व सुधाकर कदम यांना गझल साधना पुरस्कार देण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, आणि ११ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. संमेलनात १७ मुशायरे आणि एक परिचर्चा सत्र होणार आहे.
****
धाराशिव तालुक्यातल्या पळसप इथं येत्या दोन फेब्रुवारी रोजी दहावं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या साहित्य संमेलनात संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मूल्ये या विषयावर परिसंवाद तसंच कथाकथन, कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमेलनाला साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे.
****
हिंगोली इथं आजपासून दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रंथदिंडीने महोत्सवाचा शुभारंभ होईल, या दिंडीमध्ये विद्यार्थी तसंच भजनी मंडळं विविध लोककला सादर करणार आहेत.
****
परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणी ते मुंबई पायी मोर्चा काल छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाला. हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment