Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज शहीद दिन म्हणून पाळण्यात येत आहे. देशभरातून महात्मा गांधीजींना तसंच देशासाठी प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. नवी दिल्लीत राजघाट या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तिनही सेना दलांचे प्रमुख यांनी राजघाट इथं महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींना सामाजिक संदेशाच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. गांधीजींचे आदर्श देशवासियांना विकसित भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात, असं त्यांनी म्हटलं आहे. शहीद दिनानिमित्त पंतप्रधानांनी, देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या शूर वीरांना आदरांजली अर्पण केली आहे.
****
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त दक्षिण मुंबईतल्या महात्मा गांधी स्मारक असलेल्या ‘मणिभवन’ला भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली आणि प्रार्थना सभेत सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी, सर्वांना जात, पंथ आणि धर्म यांच्या मतभेदापलीकडे जाण्याचे आवाहन केलं. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा आणि सदाचाराच्या विचारांचं पालन करावं, असं ते म्हणाले.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या ३१ तारखेपासून सुरु होणार असून, शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील.
****
वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याचा आणि सुधारित विधेयकाचा अहवाल संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपुर्द केला. संयुक्त संसदीय समितीनं वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला आणि सुधारित विधेयकाला बहुमतानं मान्यता दिली आहे.
****
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौर्यावर असून, जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत होत आहे. तत्पूर्वी बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असून, चांगल्या कामाची स्पर्धा करा, कोणत्याही प्रकारचे वेडे वाकडे प्रकार सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.
****
तिसरं विश्व मराठी संमलेन उद्यापासून पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात सुरु होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता संमेलनाचं उद्धाटन होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रेनंतर, उद्घाटन समारंभ होईल. तीन दिवस चालणार्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसंध्या, आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
हिंगोली इथं आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पर विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. शहरातल्या गांधी चौकातून काढण्यात आलेल्या या रॅलीला जिल्हा रुग्णालयाचे डॉ. मंगेश टेहरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. आजपासून ते १५ फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचं घर मिळवून देण्याच्या दृष्टीनं यंत्रणेनं काम करावं, यातही जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्यानं लाभ द्यावा, अशा सूचना ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्याला वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट मिळाल्याचं सांगत, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मान्यता देऊन घरकुल बांधकाम तत्परतेनं सुरू करावं, असे निर्देश त्यांनी दिले.
****
वीजबिलाच्या थकबाकीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातल्या सात जणांवर महावितरणतर्फे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृतपणे वीजपुरवठा जोडल्यास प्राणांतिक अपघाताचाही धोका असल्यामुळेसुद्धा वीजपुरवठा अनधिकृतरीत्या जोडू नये, असं आवाहन महावितरणने केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्याला नवीन पंचवीस बसेस मिळाल्या आहेत.त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला या जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. या बसेस अत्याधुनिक सोयींनी युक्त असून सुलभ आणि आरामदायी आसनं आणि आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज आहेत. इंधन कार्यक्षमतेवर भर देऊन या बसेस पर्यावरणपूरकही बनवण्यात आल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment