Sunday, 2 February 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 02 February 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वसंत पंचमी आणि सरस्वती पुजनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. शिक्षण आणि ज्ञानाशी संबंधित हा आनंदाचा प्रसंग देशातील सर्व नागरिकांना आनंद, समृद्धी आणि ज्ञान घेऊन येवो, अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मू यांनी सामाजिक माध्यमावरच्या एका शुभेच्छा संदेशात व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनीही सामाजिक माध्यमावर देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

                                  ****

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या संध्याकाळी संपणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत. दिल्लीतील ७० सदस्यांच्या विधानसभेसाठी येत्या बुधवारी पाच तारखेला मतदान होणार आहे; तर आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

दरम्यान, सर्व पक्षांचे नेते त्यांच्या उमेदवारांच्या बाजूने प्रचारफेरी आणि प्रचार सभा करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरके पुरम इथं आज जाहीर सभा होणार आहे, तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राजेंद्र नगर, चांदणी चौक आणि लक्ष्मी नगर इथं सभा घेणार आहेत. काँग्रेस नेते अजय माकन आज दिल्लीत पत्रकार परिषद घेणार असून सत्ताधारी आम आदमी पक्षाचा प्रचारही जोमाने सुरु आहे.

****

२०२५-२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी २ लाख ५५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी ३ हजार ४४५ कोटी रुपये महसुलावर आणि २ लाख ५२ हजार कोटी रुपये भांडवली खर्चावर खर्च केले जातील. अशाप्रकारे, रेल्वे अर्थसंकल्पात एकंदर २ लाख ५५ हजार ४४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

                                 ****

गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची राज्यातील एकंदर रुग्णसंख्या १४९ इतकी झाली आहे. यापैकी २८ रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. तर, आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आजारानं नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही शिरकाव केला आहे.

                                 ****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी बारा वाजता ते जिल्ह्यातील हदगाव इथल्या श्रीकृष्ण देवउखळाई मंदिर नवपर्व आणि कलशारोहण सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. मंदिर परिसरातील कार्यक्रमानंतर ते पुन्हा हेलिकॉप्टरने नागपूरला जाणार आहेत. 

                                 ****

राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी, यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. काल नाशिक इथं कोकाटे यांचा सर्वपक्षीय नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आता ड्रोनद्वारे शेती तर रोबोटद्वारे औषध फवारणी केली जात आहे. शेतीत एआय तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकर बैठक घेतली जाणार असल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.

                                 ****

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचं अंमली पदार्थ जप्त केलं. याचं बाजार मूल्य अंदाजे १६ कोटी ४९ लाख रुपये इतकं आहे. पॅरिसमार्गे मुंबईला येणाऱ्या या प्रवाशाची अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे १७० कॅप्सूल जप्त करण्यात आले, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

                                 ****

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांची काल नक्षलवाद्यांनी गळा दाबून हत्या केल्याचं वृत्त आहे. मडावी हे भामरागड तालुक्यातल्या कियर इथले रहिवासी होते. २०१७ ते २०१९ अशी अडीच वर्षे ते भामरागड पंचायत समितीचे सभापती होते. सध्या ते उपसभापती म्हणून कार्यरत होते. घटनास्थळी नक्षलवाद्यांचं एक पत्रक सापडलं असून, त्यात सुखराम मडावी हे पोलिस खबरी होते. त्यांनी ठिकठिकाणी पोलिस मदत केंद्र उघडण्यास आणि लोहखाणीला समर्थन देणारं काम केले, म्हणून त्याची हत्या केल्याचा मजकूर आहे.


                                 ****

लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरीय पथकं गठीत करण्यात आली आहेत. सोयाबीन खरेदी केंद्रांवर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केल्या होत्या, त्यानुसार, ही कार्यवाही करण्यात आली.

                                 **** 

जालना इथं महानगरपालिका आणि पतंजली योग शिबीर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपासून योग प्राणायाम शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलावर सकाळी सहा ते साडेसात या वेळेत पाच दिवसीय हे शिबीर होणार आहे, या योग शिबीराचा लाभ घेण्याचं आवाहन जालना महापालिकेनं केलं आहे. 

                                 **** 

महिलांचा १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात होणार आहे.  मलेशियातल्या क्वालालंपूर इथं हा सामना दुपारी १२ वाजता सुरु होईल. भारतानं उपांत्य फेरीत इंग्लंडचा नऊ खेळाडू राखून पराभव केला. तर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

                                 ****

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी मुंबईत खेळला जाणार आहे. या मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

                               ****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...