Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 25 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ एप्रिल
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात
सहभागी होण्यासाठी आणि भारत सरकार आणि जनतेच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या व्हॅटिकन सिटी दौऱ्यावर रवाना झाल्या. राष्ट्रपती
मुर्मू व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटरच्या बॅसिलिका इथं पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर
पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. उद्या त्या जगभरातल्या मान्यवरांसह पोप यांच्या
अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होतील. यामुळे देशभरात उद्या दुखवटा पाळण्यात येणार
आहे. पोप फ्रान्सिस यांचं २१ एप्रिलला व्हॅटिकनच्या कासा सांता मार्टा इथल्या त्यांच्या
निवासस्थानी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं.
****
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
आज श्रीनगरला जाऊन तिथल्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. यावेळी जम्मू काश्मीरमध्ये
तैनात असलेले अधिकारी द्विवेदी यांना नियंत्रण रेषा आणि काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या
दहशतवादविरोधी अभियानांची माहिती देतील. लष्कर प्रमुखांच्या दौऱ्यादरम्यान १५ व्या
कॉर्प्स कमांडर आणि राष्ट्रीय रायफल्सचे इतर फॉर्मेशन कमांडर्स उपस्थित राहतील.
****
पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंध
असलेल्या लष्कर - ए - तैय्यबाच्या तीन दहशदवाद्यांची माहिती देणाऱ्यांना एकूण ६० लाख
रुपयांचं बक्षीस पोलिसांनी जाहीर केलं आहे. या दहशतवाद्यांवर प्रत्येकी वीस लाखांचं
इनाम पोलिसांनी ठेवलं आहे. पोलिसांनी तिन्ही संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रं जारी केली
आहेत.
****
जम्मू काश्मीरमधल्या बांदीपोरा
इथं आज सुरक्षा बलाचे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. या क्षेत्रात दहशतवादी
असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा बलानं परिसराला घेराव घालून शोधमोहिम राबवण्यास
सुरुवात केली, त्यावेळी ही चकमक झाली.
****
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर
महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. २३२ पर्यटकांना
घेऊन इंडिगोचं तिसरं विशेष विमान आज दुपारी श्रीनगर इथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत
पोहोचेल. सुमारे ५०० पर्यटक आतापर्यंत परतले आहेत.
दरम्यान, या पर्यटकांना मुंबईहुन पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी
पाठवण्याचं नियोजन राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी ने केलं आहे. पर्यटकांना धीर
देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे
अध्यक्ष प्रताप सरनाईक काल विमानतळावर उपस्थित होते.
****
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ
नांदेडमध्ये आज सर्वपक्षीय जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. काल भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद यांच्यासह इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने
जिल्हाधिकारी कार्यालसमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. खासदार अशोक चव्हाण यावेळी उपस्थित
होते.
****
भारतीय नौदलाच्या आय एन एस सुरत
या क्षेपणास्त्र विनाशकानं काल समुद्रातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात यश मिळवलं. यामुळे
भारताच्या संरक्षण सामर्थ्यात भर पडल्याचं नौदलानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं
आहे.
****
राज्यातल्या सहकारी गृहनिर्माण
संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण
दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती
स्थापन करण्यात आली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी
मंजूर नवीन पाणी पुरवठा योजनेची, पैठणच्या जायकवाडी
इथल्या जॅकवेल आणि ३९ किलोमीटर पाईपलाईनची विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
यांनी काल पाहणी केली. शहराच्या पाणी पुरवठा निमित्त नव्याने होत असलेल्या या योजनेची
संपूर्ण माहिती घेण्यासाठी तसंच अद्यापपर्यंत झालेल्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून
घेऊन प्रशासनाला येणाऱ्या अडचणीची माहिती घेण्यासाठी ही पाहणी केल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
सर्वसामान्यांचं जीवन सुकर होण्यासह
त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा, तसंच शासनाच्या शंभर दिवस आराखड्यातल्या सात कलमी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी
करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. ते
काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र
दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचाही त्यांनी आढावा घेतला. पोलिस आयुक्तालयाच्या
देवगिरी मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात दोन कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
पथकानं काल रंगेहाथ अटक केली. निवृत्त सफाई कर्मचारी महिलेची सातव्या वेतन आयोगाच्या
फरकाची सुमारे साडे तीन लाखाहून अधिक रक्कम मिळवून देण्यासाठी या दोघांनी लाच मागितली
होती.
****
नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी
इन्डोअर स्टेडियमवर आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू होत आहे. तीन
दिवस म्हणजे २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २१ आशियाई देशांमधले १७० हून अधिक
योगपटू सहभागी होणार आहेत. योगासनांचा जागतिक पातळीवर स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून
प्रसार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
No comments:
Post a Comment