Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 June
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
सर्व प्रकारच्या वीजदरात
आगामी पाच वर्षात टप्प्याटप्यानं कपात करण्याचा विद्युत नियामक आयोगाचा आदेश
·
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या
टप्प्यातल्या विकासकामांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
·
आणीबाणी जाहीर करण्याच्या
घटनेला पन्नास वर्ष पूर्ण-आणीबाणी देशासाठी काळा अध्याय, पंतप्रधानांचं
प्रतिपादन
·
भारतीय अंतराळवीर शुभांशू
शुक्लांची ऐतिहासिक अंतराळ भरारी, चार अंतराळवीर १४ दिवसांसाठी अवकाशात
झेपावले
·
आगामी शैक्षणिक वर्षापासून
सीबीएसईच्या १० वीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार
आणि
·
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आज सातारा जिल्ह्यात नीरानदीत स्नान
****
राज्यातल्या घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक
अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश महाराष्ट्र
विद्युत नियामक आयोगाने दिला आहे. वीज ग्राहकांसाठीचे वीज दर ठरवण्यासाठी
महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देतांना, आयोगाने काल हे आदेश
दिले. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के
अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना
प्रोत्साहन ही या आदेशाची वैशिष्ट्यं असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
आयोगाच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आभार मानले आहेत. या आदेशाचा लाभ घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक
ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात
म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातल्या
विकासकामांना मंजुरी देण्यात आली. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या
मार्गाच्या मेट्रो प्रकल्पास तीन हजार ६२६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या
निर्णयामुळे पुण्याची वाहतूक कोंडी सोडवायला मदत मिळेल, तसंच
शहराच्या विकासाला चालना मिळेल, असं पुण्याचे पालकमंत्री अजित पवार
यांनी म्हटलं आहे.
****
देशात आणीबाणी जाहीर करण्याच्या घटनेला काल पन्नास वर्ष
पूर्ण झाली. देशभरात यानिमित्त संविधान हत्या दिवस पाळण्यात आला. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आणीबाणी हा देशासाठी काळा अध्याय असल्याचं म्हटलं आहे.
आणीबाणीविरुद्धच्या लढाईत ठामपणे उभे राहिलेल्यांना त्यांनी अभिवादन केलं.
****
राज्यातही काल मुंबईसह ठिकठिकाणी संविधान हत्या दिनाचे
कार्यक्रम घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत,
२५ जून १९७५ हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी सगळ्यात काळा दिवस
असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तो दिवस कायम लक्षात राहण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. संविधान हत्या दिनानिमित्त मुंबईत राजभवन झालेल्या
कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. त्या
काळात लोकशाहीच्या सेनानींनी दिलेल्या लढ्यामुळे भारताची राज्यघटना आणि लोकशाही
वाचली. आता भारताची लोकशाही इतकी प्रगल्भ आहे, की कुणीही कितीही प्रयत्न केला, तरी
ती संपवू शकणार नाही, असा
विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतांना, आणीबाणीच्या काळात देशाच्या लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात
भारतीयांचा संघर्ष कायमच आपल्यासाठी प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरेल, अशी
भावना व्यक्त केली.
****
मराठवाड्यातही संविधान हत्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम
घेण्यात आले.
बीड जिल्ह्यात आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या ५७
जणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी असलेले सन्मान पत्र
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आलं.
आणीबाणीचा काळ हा भारतीय लोकशाहीसाठी काळा अध्याय होता, अशा प्रतिक्रिया यावेळी आणीबाणीत कारावास भोगलेल्या नागरिकांनी व्यक्त
केल्या.
बाईट - पंजाब म्हस्के,सत्यनारायण लोहिया
नांदेड जिल्ह्यात आणीबाणीत सहभागी असलेल्या संघर्षयात्रींना
काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं
सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते या
संघर्षयात्रींचा सन्मान करण्यात आला.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणी काळातल्या
छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
हिंगोली इथंही शिवाजीराव देशमुख सभागृहात दोन दिवसीय
चित्रमय प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. हिंगोली
जिल्ह्यात आणीबाणीविरोधातल्या लढ्यात योगदान दिलेले मान्यवर आणि त्यांच्या
वारसांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते काल मुख्यमंत्र्यांच्या
स्वाक्षरीचं सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं.
विभागात ठिकठिकाणी काल या संघर्षयात्रींचे गौरव सोहळे पार
पडले.
धाराशिव इथं झालेल्या अशा
सोहळ्यात, आणीबाणीत
कारावास भोगलेले मुरलीधर मुगळीकर यांनी आपल्या भावना या
शब्दात व्यक्त केल्या.
बाईट
- मुरलीधर मुगळीकर
****
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार
अंतराळवीरांना घेऊन नासाचं ॲक्सिओम चार हे यान काल अंतराळात झेपावलं. राष्ट्रपती
द्रोपदी मुर्मू,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशू शुक्ला यांच्यासह
सर्व अंतराळवीरांना शुभेच्छा दिल्या. शुक्ला यांनी काल अंतराळातून जय हिंद, जय
भारत असा संदेश पाठवला.
****
आगामी शैक्षणिक वर्षापासून सीबीएसईच्या १० वीच्या परीक्षा
वर्षातून दोन वेळा होणार आहेत. पहिली परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होईल, ही
परीक्षा देणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. या परीक्षेचा निकाल एप्रिल महिन्यात
जाहीर होईल. या निकालानंतर कुठल्याही तीन विषयातल्या गुणांमध्ये सुधारणा करायची
असेल तर विद्यार्थ्यांना मे महिन्यात होणारी परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेचा
निकाल जून महिन्यात जाहीर होईल. दोन्ही परीक्षांमधून संबंधित तीन विषयांत
विद्यार्थ्याला अधिक मिळालेले गुण अंतिम गुण म्हणून गृहीत धरले जातील असं
सीबीएसईनं कळवलं आहे.
****
शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ, सिगारेट
विक्री होत असल्याच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय. जी.
खोब्रागडे यांच्या पीठानं,
हे असंच चालू राहिलं, तर तरुण विद्यार्थी
व्यसनाधीन होतील,
असा इशारा देऊन, यासंदर्भात जनहित याचिका
दाखल करून घ्यायचे निर्देश दिले.
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या राज्य विधानसभा
निवडणुकीच्या कामकाजात गंभीर विसंगती असल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च
न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज
दुपारी नीरानदी स्नानानंतर सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल, लोणंद
इथला एक दिवसाचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा उद्या शुक्रवारी तरडगावकडे मार्गस्थ
होणार आहे. याच मार्गावर चांदोबांचा लिंब इथं या पालखी सोहळ्यातलं पहिलं उभं रिंगण
पार पडणार आहे.
****
नशाबंदी दिन आज पाळला जात आहे. यासंदर्भात राज्य नशाबंदी
मंडळाचे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय संघटक बिस्मिल्ला सय्यद यांनी नागरिकांना
व्यसनांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
बाईट
- बिस्मिल्ला सय्यद
****
धाराशिव इथं ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस मुक्ता
लोखंडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने काल ९५ हजार रुपये लाच घेतांना रंगेहात
पकडलं. एका प्रकरणात सहकार्यासाठी त्यांनी तक्रादाराकडून लाच मागितली होती. लोखंडे
यांनी पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्यासाठी ही लाच घेतल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या
‘अहिल्यानगर-बीड-परळी’ रेल्वेच्या कामाला गती देण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment