Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 27 June 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै
या कालावधीत
·
शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ संपवण्यास
मदत-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
अॅक्सिओम-फोर क्रू ला घेऊन स्पेसएक्स ड्रॅगन यान आंतरराष्ट्रीय
अंतराळ स्थानकात दाखल, शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय
·
न्यायाधीशांनी न्यायाच्या चौकटीत राहत सामाजिक भान ठेवून
दिलेला न्याय अधिक महत्वाचा-सरन्यायाधीशांचं प्रतिपादन
आणि
·
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात
स्वागत, अंबाजोगाईत काल रंगला चार पालख्यांचा अश्व रिंगण सोहळा
****
राज्य विधिमंडळाचं
पावसाळी अधिवेशन येत्या ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. विधानभवनात
काल झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधान
परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह इतर खात्याचे मंत्री
आणि विधीमंडळ सदस्य यावेळी उपस्थित होते.
****
एक महामार्ग
अर्थव्यवस्थेची अनेक दालनं उघडी करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत केलं आहे. शक्तीपीठ महामार्गामुळं मराठवाड्यातला दुष्काळ
संपवण्यास मदत होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महामार्गाच्या
प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर पाचशे ते एक हजार शेततळी तयार करण्यात येणार असल्याची
माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली, ते म्हणाले...
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
युवकांच्या
उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारनं तयार केलेलं जनसुरक्षा विधेयक विधीमंडळ अधिवेशनात
मांडलं जाणार आहे. देशाच्या संविधानाला झुगारणाऱ्या घातक नक्षल विचारांना पायबंद बसावा
यादृष्टीनं जनसुरक्षा विधेयक हे एक महत्वाचं पाऊल ठरणार असल्याचं मत, यासंदर्भातल्या
समितीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं. विधेयकासंदर्भात
अंतिम विचार विनिमय करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. तब्बल
तेरा हजार सूचना, सुधारणांचा समावेश, उद्दिष्ट्य
आणि उद्देशांवर अभ्यास करून विधेयक तयार झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
राज्यात
आतापर्यंत २३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात ३३ लाख ५९ हजार ८१ हेक्टर जमिनीवर
पेरण्या झाल्या असल्याचं, कृषी विभागाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं. छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यात सहा लाख ५७ हजार १९९ हेक्टरवर, तर लातूर जिल्ह्यात
नऊ लाख चार हजार २०२ हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत
१९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या.
****
भारतीय
हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह अॅक्सिओम-फोर क्रू ला
घेऊन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान काल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलं. शुभांशू
शुक्ला हे अंतराळ स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय आहेत.
विज्ञान
आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, शुभांशू शुक्ला
आणि अॅक्सिओम-फोर मिशन टीमचं, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर
यशस्वीरित्या डॉकिंग केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. या मोहिमेअंतर्गत जीवशास्त्राशी
संबंधित, कोणत्याही अधिवासाची क्षमता, सूक्ष्म-गुरुत्वाकर्षण
आणि अंतराळातील मानवी शरीरविज्ञानावर होणारे विविध परिणाम यांचा शोध घेण्याचं काम भारतावर
सोपवण्यात आलं असून, याचा जगभरातल्या भविष्यातल्या सर्व मोहिमांवर
महत्त्वपूर्ण परिणाम होईल, असं सिंग म्हणाले,
बाईट – जितेंद्र सिंग, विज्ञान
आणि तंत्रज्ञान मंत्री
****
राष्ट्रपतींनी
जाहीर केलेले पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस
पदक तसंच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते
८३ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना काल प्रदान करण्यात आले. यामध्ये मराठवाड्यातल्या
सहा जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक प्रदान करण्यात आले. यात छत्रपती संभाजीनगर
इथले सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक संतोष जोशी आणि सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक व्यंकट
केंद्रे यांचा समावेश आहे. धाराशिव इथले सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक सूर्यकांत आनंदे,
परभणी इथले पोलिस उपनिरिक्षक जमीलोद्दीन मोईलोद्दीन जागीरदार,
बीड इथले पोलीस उपनिरिक्षक संतोष वजुरकर आणि लातूर इथले सेवानिवृत्त
पोलीस उपनिरिक्षक गुलाम मेहबुबा गुलाम हैदर गल्लेकाटू यांचा देखील यावेळी गौरव करण्यात
आला.
****
न्यायाधीशांनी
न्यायाच्या चौकटीत राहत सामाजिक भान ठेवून दिलेला न्याय अधिक महत्वाचा असतो, न्यायाधीशांनी
घटनात्मक मूल्यांची बांधिलकी ठेवली तर न्यायदान सुकर होतं असं प्रतिपादन सरन्यायाधीश
भूषण गवई यांनी केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातर्फे छत्रपती संभाजीनगर
इथं सरन्यायाधीश भूषण गवई यांचा काल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च
न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता,
न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
आषाढी वारीसाठी
पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं काल सातारा जिल्ह्यात प्रवेश
केला. “माऊली माऊली” च्या गजरात पालखीचं जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी
दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी माऊलींच्या पादुकांना निरा
नदी पात्रात पारंपरिक पद्धतीने स्नान घालण्यात आलं. पालखी आज लोणंदचा मुक्लाम आटोपून
पुढे मार्गस्थ होणार आहे.
संत श्री
गजानन महाराजांची पालखी काल धाराशिव शहरात पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात भाविकांनी
रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. ही पालखी आज तुळजापूर मार्गे पंढरपूरकडे
प्रस्थान करणार आहे.
****
अंबाजोगाई
शहरात हिंगोली जिल्ह्यातील नरसीचे संत नामदेव यांची पालखी, अंबाजोगाईतील
महसूल विभागाची पालखी, संत मोहनानंद महाराज यांची पालखी,
चारोधाम हनुमान पायी पालखी या चार पालख्यांचा एकत्रिरित्या रिंगण सोहळा
काल उत्साहात पार पडला. अश्वरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
वारकऱ्यांचे विविध मैदानी खेळ, महिलांच्या फुगड्या, बाल वारकऱ्यांची झालेली दिंडी स्पर्धा हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरलं.
****
थोर समाजसुधारक, छत्रपती राजर्षी
शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. छत्रपती
संभाजीनगर आणि नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं समता दिंडी
काढण्यात आली.
परभणी इथं
निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी तर धाराशिव इथं जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केलं.
****
धाराशिव
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४० टक्क्यांनी वाढ करण्याच्या उद्देशाने सुरू
करण्यात आलेल्या “तुळजाई कृषी महसूल-वाढ अभियान अर्थात तारा” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या
अंमलबजावणीस आता गती मिळत आहे. उस्मानाबादी शेळीचा या महत्वपूर्ण प्रकल्पात समावेश
करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ग्रँड थॉरटन इंटरनॅशनल या जागतिक ख्याती असलेल्या
संस्थेची अधिकृत सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षण
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी काल अंतरवाली सराटी इथं आंदोलनकर्ते
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आरक्षणासंदर्भात सरकारने एक ऑगस्ट पर्यंत मागण्या
मान्य न केल्यास २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मराठा
समाजाच्या सर्व न्याय्य मागण्यांचं निवेदन योग्य त्या पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न
आपण करू, असं आश्वासन खासदार सोनवणे यांनी यावेळी दिलं.
****
बीड जिल्हा
पोलीस दलाकडून गुन्हे प्रतिबंधासाठी "समाधान फोर्टीएट" ही योजना सुरू करण्यात
आली आहे. याअंतर्गत पोलीस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्ह्यांवर ४८ तासांच्या आत त्वरित
प्रतिसाद देऊन तक्रारदाराचं समाधान करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत
यांनी दिले आहेत. ही योजना समाजातले किरकोळ वाद वेळेत सोडवून संभाव्य गंभीर गुन्ह्यांना
प्रतिबंध घालण्याचं कार्य करेल, नागरिकांमध्ये पोलीस दलावरील विश्वास
वाढवण्यासही ही योजना मोलाची ठरेल, असं काँवत यांनी म्हटलं आहे.
****
हिंगोलीत
अवैध मद्य वाहतुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना एका
पोलिस हवालदारासह होमगार्डला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दोघांविरुद्ध हिंगोली
ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
हवामान
छत्रपती
संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात काल पावसाची संततधार सुरु होती. जालना जिल्ह्यातही काल
सकाळपासून सूर्यदर्शन झालं नाही. जिल्ह्यातल्या सर्वच भागात पावसाची संततधार सुरूच
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेडमध्ये ३९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
झाली.
येत्या
दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी
तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं
वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment