Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 30 June 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२५ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला
आजपासून मुंबईत सुरुवात झाली. विधानभवनात आगमन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी मंत्रिमंडळातील इतर सदस्य तसच
विधिमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेचे
सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेत
त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
आजच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या
कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला मंत्र्यांचा
परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अर्थमंत्री
अजित पवार यांनी पुरवणी मागण्या सभागृहासमोर ठेवल्या. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या
विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी केली. सदस्य अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय
मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि
समाधान आवताडे यांची तालिका सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध खात्याच्या
मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली.
विख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ.
जयंत नारळीकर, मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम, समाजसेविका डॉ. श्रध्दा
टापरे आणि माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध राहून तो संमत केला.
त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विधानपरिषदेतही शोकप्रस्ताव संमत
झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त
व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या
आज विधिमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या
पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी,
महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी
निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच
दुर्बल, वंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार
आहे.
****
विधीमंडळ कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भाषेच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
केली. त्यानंतर या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार
आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित
पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
****
पशुंची सेवा ही आपली नैतिक जबाबदारी
असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या रायबरेली
इथं भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या.
पशुवैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांनी आपल्या प्रशिक्षण आणि उद्दिष्टांप्रती निष्ठावान
राहवं, पशूंना
योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी ग्रामीण भागात आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात
यावं, असं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं, त्या म्हणाल्या...
बाईट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
****
वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार
यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान
मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असल्यानं कुमार यांची नियुक्ती करण्यात
आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदीहून
पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या
धर्मपुरी इथं दाखल झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं स्वागत करून माऊलीच्या
पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं. लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांची याप्रसंगी
उपस्थिती होती.
****
मुसळधार पावसामुळं तात्पुरती स्थगित
केलेली चार धाम यात्रा आज पुन्हा सुरु झाली. दरम्यान, यात्रा मार्गावरच्या वाहनांच्या हालचालींवर
नियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून
सुरू असलेल्या सततच्या पावसामुळं प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. डोंगराळ
भागात भूस्खलनामुळं शंभरहून अधिक मार्ग बंद झाले आहेत. गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय
महामार्गांसह अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
****
No comments:
Post a Comment