Saturday, 28 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

देशातील पहिल्या संविधान प्रास्ताविका केंद्र - कॉन्स्टीट्युशन प्रीॲम्बल पार्कचं लोकार्पण आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर इथं करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही गवई यांच्या हस्ते याप्रसंगी झालं. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी विभाग - स्कूल ऑफ लॉ इथं हे पार्क उभारण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह तर मान्यवर उपस्थित होते.

संविधानाची ओळख सर्वसामान्य नागरिकांना होवून त्यातील, मूल्य रुजवण्यासाठी या पार्कच्या मध्यभागी डॉक्टर आंबेडकर यांची संविधान हातात धरलेली प्रतिमा आहे. भारतीय संविधान, आम्ही लोक, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आदी दहा मुल्यांची भित्तिचित्र या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ असलेल्या राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय यांच्या प्रतिकृती आणि अशोक स्तंभ देखील तयार करण्यात आला आहे. दोन एकर परिसरातील या पार्कचं भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं महान जैन संत आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या शताब्दी समारंभाचं उद्घाटन केलं. याप्रसंगी विशेष स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचंही प्रकाशन करण्यात आलं. उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, तरुणांना भारतीय परंपरांशी जोडण्यात महान जैन ऋषींचे मोलाचे योगदान होते. भारत देश हा जगातील सर्वात प्राचिन संस्कृती लाभलेला देश असून अहिंसेचा मार्ग संपूर्ण जगाला दाखवण्याचं काम देशानं केलं आहे, असं मोदी म्हणाले.

आचार्य विद्यानंद जी महाराजांच्या १०० व्या जयंतीनिमित्त भगवान महावीर अहिंसा भारती ट्रस्टच्या सहकार्याने सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभराच्या राष्ट्रीय श्रद्धांजली विधीची औपचारिक सुरुवात या कार्यक्रमातून झाली. वर्षभर चालणाऱ्या या समारंभात देशभरात सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचा समावेश असेल. आचार्य विद्यानंदजी महाराजांनी भारतातील प्राचीन जैन मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आणि विशेषतः प्राकृत, जैन तत्वज्ञान आणि शास्त्रीय भाषांमध्ये शिक्षणासाठी काम केलं.

****

मन की बात कार्यक्रमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीची सर्व केंद्र आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून उद्या सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम थेट प्रसारीत होईल.

****

नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सांडपाण्याचे शास्त्रशुध्द व्यवस्थापन करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून ७५ लाख रुपये निधी मंजूर केला जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांनी दिली.

अत्यंत आवश्यक अशा पर्यावरण रक्षण आणि सार्वजनिक आरोग्याच्या खबरदारीसाठी प्रकल्प प्रभावीपणे उपयुक्त ठरणार आहे.

****

विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या कौंडण्यपुर इथं वर्धा नदीला २११ मीटरची साडी-चोळी अर्पण करण्याचा सोहळा संपन्न झाला. भगवान श्रीकृष्णाचे सासर अर्थात माता रुक्मिणीचं माहेर म्हणून या भागाची पौराणिक ख्याती आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून ही अखंड साडी वर्धा नदीला अर्पण करण्यात आली. असंख्य वारकरी - भाविक याप्रसंगी उपस्थित होते. या सोहळ्यात टाळ मृदंगाचा गजरात विठ्ठल-रुक्मिणी रथयात्रा काढण्यात आली.

****

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महास्ट्राइड या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अग्रेसर बनवणा-या  प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उदघाटन आज नागपूर इथं होणार आहे. शहरातील भारतीय व्यवस्थापन संस्था-आय.आय.एम. इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पल्पात  राज्याची अर्थवयवस्था साडेतीन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या विकासावर चर्चेसाठी ही परिषद होत आहे. यापार्श्वभूमीवर बावीसशे कोटींहून अधिक रकमेच्या महास्ट्राईड प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीवर यावेळी विचारमंथन होणार आहे.

****

भारत आणि इंग्लंच्या महिला क्रिकेट संघांदरम्यानची टी-२० मालिका आजपासून सुरू होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही संघांदरम्याचा पहिला सामना आज नॉटिंगहम मधील टेंटब्रिज इथे होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर आगामी पाच सामन्यांच्या मालिकेद्वारे इंग्लंडमध्ये खेळण्याच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचं आव्हान असेल. दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे.

****

No comments: