Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 27 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगन्नाथ पुरी रथयात्रेच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा
दिल्या आहेत. भव्य रथांवर विराजमान भगवान बलभद्र, भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि चक्रराज सुदर्शन यांच्या मूर्तींचं
दर्शन घेऊन लाखो भाविकांना दिव्य अनुभव मिळेल, असं राष्ट्रपतींनी आपल्या सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे. तर, श्रद्धा आणि भक्तीनं भरलेला हा पवित्र उत्सव सर्वांच्या जीवनात
आनंद, शांतता, समृद्धी, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, असं पंतप्रधान आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रात्री
उशिरा नवी दिल्लीत पोहोचलं. आतापर्यंत १९ विशेष उड्डाणांद्वारे एकूण ४ हजार ४१५ भारतीय
नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल
यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. इराणमधून मायदेशी परतलेल्या
३ हजार ५९७ आणि इस्रायलमधून आलेल्या ८१८ व्यक्तींचा यात समावेश असल्याचं जयस्वाल यांनी
सांगितलं. भारतीय नागरिकांव्यतिरिक्त ९ नेपाळी, ४ श्रीलंकेचे आणि एका भारतीय नागरिकाच्या इराणी पत्नीचा समावेश आहे.
****
महसूल गुप्तचर संचालनालयाने
मुंबईतील न्हावा शेवा बंदरात सुमारे ९ कोटी रुपये किमतीच्या १ हजार ११५ मेट्रिक टन
पाकिस्तानी वस्तूंसह ३९ कंटेनर जप्त केले आहेत. या कंटेनर्सना काल दुबईमार्गे समुद्री
मार्गाने अवैधरीत्या भारतात पाठवण्यात आले होते. हे कंटेनर पाकिस्तानी असल्याची माहिती
लपवून ते संयुक्त अरब अमिरातचे असल्याचे दाखवले जात होते. तिसऱ्या देशांमधून, पाकिस्तानी वस्तूंची दुबईमार्गे होणारी बेकायदेशीर आयात थांबवण्यासाठी
महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट सुरू केले आहे. या कारवाईदरम्यान
आयात करणाऱ्या कंपनीच्या एका भागीदाराला अटक करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, केंद्र सरकारनं २ मे पासून पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर संपूर्ण बंदी घातली आहे.
****
‘महसूल अधिकाऱ्यांच्या हस्तपुस्तिका’
च्या दोन खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल विधान भवनात
झालं. ही पुस्तिका राज्य प्रशासनासाठी एक अभूतपूर्व आणि महत्त्वपूर्ण पाऊल असून पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘कर्मयोगी भारत’ या उपक्रमाला बळ
देणारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. महसूलमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थिती होते.
****
हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यात
शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात आहे. आगामी शौर्यदिनी दोन्ही राज्यांच्या
मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास
खारगे यांनी दिली. शौर्य स्मारक प्रकल्पासाठी ७ एकर जागा उपलब्ध आहे. अतिरिक्त ९ एकर
जागेच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असं खारगे यांनी सांगितलं.
****
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल
सिलेक्शन - आयबीपीएस द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये उमेदवाराच्या पडताळणीसाठी
आधार प्रमाणीकरणाचा वापर करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत
येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत, आयबीपीएस आता त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि भरती
प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी ऐच्छिक आधार प्रमाणीकरणाचा वापर करू
शकते, असं म्हटलं आहे. या उपक्रमामुळे परीक्षा प्रक्रियेतल्या
अन्य गैरप्रकारांना आळा बसणार असून त्यामुळे सुशासनाला चालना मिळेल आणि बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील भरती प्रक्रियेची नैतिकता
आणि पारदर्शकता बळकट होईल, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता
विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. थोड्याच
वेळात उद्योजकांशी चर्चा केल्यानतंर कांचनवाडी इथं होणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय
रोजगार मेळाव्यात ते उपस्थित राहणार आहेत. मंगलप्रभात लोढा दुपारी जनसंवाद कार्यक्रमाला
संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी लोढा यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास विभाग
आणि संस्था व्यवस्थापन समितीची आढावा बैठक होणार आहे.
****
महिला हॉकी इंडिया मास्टर्स
करंडक स्पर्धेची अंतिम लढत आज ओडिशा आणि पंजाब यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं होणार
हा सामना दुपारी २ वाजता होणार आहे. दरम्यान, पुरुषांच्या अंतिम फेरीत यजमान तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यात आज ४ वाजता चेन्नई
इथंच अंतिम सामना होणार आहे.
****
हवामान
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी
पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे.
****
No comments:
Post a Comment