Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 28 June 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जून २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
शेतकऱ्यांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरु करण्याचा राज्यसरकारचा
निर्णय-कृषी विकासाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी शासन कटीबद्ध-मंत्री
मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही
·
राज्यात पाच हजार सीएम श्री आदर्श शाळा विकसित करणार-मंत्री
दादा भुसे यांची माहिती
आणि
·
छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं फुटबॉल क्रीडासंकुल उभारण्याचा
वक्फ मंडळाचा निर्णय
****
शेतकऱ्यांच्या
शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण
परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पुणे इथं कापूस, हळद आणि
मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी
हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी भविष्यात त्यांच्या उत्पादनांच्या
किंमतीत चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. हेजिंगबाबत माहिती देणारा हा संक्षिप्त
वृत्तांत...
‘‘बाह्यसंकटांपासून
संरक्षणासाठी असलेलं साधन म्हणजे हेज. शेतमालाच्या किमतीत संभाव्य कपातीमुळे
निर्माण होणारी जोखीम कमी करणं, हा ‘हेजिंग डेस्कचा
मुख्य उद्देश आहे. जागतिक बँकेच्या सल्ल्यानुसार आणि प्रकल्प अंमलबजावणी
आराखड्यानुसार शेतकरी तसंच शेतकरी
उत्पादक कंपन्यांनी शेतमालाच्या किंमतीतील जोखीम कमी करण्यासाठी वायदे बाजारात
सहभागी व्हावं आणि त्यांना याबाबत मार्गदर्शन तसंच
प्रशिक्षण देण्यासाठी हा ‘हेजिंग डेस्क’ सुरु करण्यात
आला आहे.’’
हर्षवर्धन दीक्षित, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
या हेजिंग
डेस्कअंतर्गत शेतकऱ्यांना सुरक्षा साधने आणि धोरणांबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
त्यासोबतच पिकाची सद्यस्थिती, भविष्यकालीन अंदाज आणि धोरणविषयक उपाय
सुचवले जाणार आहेत. हा उपक्रम कृषी क्षेत्रात विकासाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
प्लास्टर
ऑफ पॅरिस-पीओपीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा
मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले आहेत. पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात
न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यशासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून
अहवाल मागवला होता. या अहवालाचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
उद्योगांना
आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि उपलब्ध प्रशिक्षण यातील तफावत दूर करत कुशल मनुष्यबळ उपलब्ध
करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात
लोढा यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उद्योजकांशी संवाद या कार्यक्रमात ते काल
बोलत होते. शासनाच्या ४२७ आणि खाजगी ५५० औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधे उद्योगांच्या
गरजेनुसार प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं उद्घाटनही लोढा यांच्या हस्ते
झालं. राज्यात छोटे छोटे रोजगार मेळावे घेण्यावर सरकार भर देणार असल्याचं,
लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले...
बाईट
- मंत्री मंगलप्रभात लोढा
****
६१व्या
राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची
काल सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून
कबीर खंदारे आणि त्रिशा ठोसर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरम्यान, या पुरस्कारांच्या
प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर झाली आहेत. आत्मपॅम्प्लेट, जिप्सी,
नाळ २, रौंदळ, तेरवं,
जग्गु आणि ज्युलिएट, भेरा, आशा, झिम्मा २, अलिबाबा आणि चाळीशीतले
चोर या दहा चित्रपटांना विविध श्रेणीत नामांकनं मिळाली आहेत.
**
दरम्यान, राज्याच्या
शैक्षणिक धोरणात फक्त मराठी भाषा सक्तीची असून, हिंदी भाषा ऐच्छिक
आणि पर्यायी भाषा असल्याचं, मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केलं
आहे. वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. ते म्हणाले...
बाईट
- मंत्री आशिष शेलार
****
राज्यात, केंद्र सरकारच्या
पीएम श्री शाळा योजनेप्रमाणेच सीएम श्री आदर्श शाळा योजना राबवून पाच हजार शाळा विकसित
करण्यात येणार आहेत, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
यांनी ही माहिती दिली. काल छत्रपती संभाजनगर इथं, शालेय शिक्षण
आणि क्रीडा विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. दहा हजार शिक्षक भरतीची
प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही भुसे यांनी दिली. ते म्हणाले...
बाईट
- मंत्री दादा भुसे
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या
सर्व केंद्रांवरुन आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन मन की बात कार्यक्रम प्रसारित
केला जात आहे.
****
ओडिशात
जगन्नाथ पुरी इथल्या प्रसिद्ध रथयात्रेला कालपासून प्रारंभ झाला. या रथयात्रेसाठी लाखो
भाविक पुरी नगरीत दाखल झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रथयात्रेनिमित्त
सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, देशभरात विविध
ठिकाणी काल रथयात्रा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथंही शहर परिसरातून निघालेल्या
रथयात्रेला भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
****
आषाढी वारीसाठी
पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात
कालच्या तरडगावच्या मुक्कामानंतर फलटणकडे मार्गस्थ होत आहेत. दरम्यान, काल लोणंदच्या मुक्कानंतर दुपारी चांदोबाचा
लिंब इथं सोहळ्यातलं उभं रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं.
दरम्यान, संत एकनाथ
महाराज यांची आषाढी वारी आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पालखी सोहळ्याचं
आज तिसरं रिंगण होणार आहे.
****
हॉकी इंडिया
मास्टर्स चषक स्पर्धेत पुरुष गटात तमिळनाडू संघ अजिंक्य ठरला आहे. काल चेन्नईत झालेल्या
या स्पर्धेच्या अंतिम लढतीत तमिळनाडूने महाराष्ट्र संघाचा पाच विरुद्ध शून्य असा पराभव
केला. तमिळनाडूच्या संघाने प्रारंभापासून सामन्यावर वर्चस्व मिळवलं, त्यामुळे
महाराष्ट्र संघाला या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत
महिलांच्या गटात ओडिशानं पंजाबवर १-० अशी मात करत विजेतेपद पटकावलं.
****
महाराष्ट्र
राज्य वक्फ मंडळाने छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं फुटबॉल क्रीडासंकुल उभारण्याचा
निर्णय घेतला आहे. मंडळाचे अध्यक्ष समीर गुलाम नबी काझी यांनी काल पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. यासाठी केंद्रासह राज्य शासनाच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडून चारशे
कोटी रुपयांचा संयुक्त निधीही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं काझी यांनी सांगितलं.
छत्रपती
संभाजीनगर इथं आमखास मैदानावर फुटबॉल क्रीडा संकुलासह इनडोअर स्टेडियमही उभारलं जाणार
आहे. दरम्यान,मंडळातर्फे राज्यातील १४३ वक्फ संस्था ताब्यात घेऊन विकसित केल्या
जाणार असल्याची माहिती समीर काझी यांनी दिली.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर विधानसभा मतदारसंघात विकासकामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार
झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर
इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोट्यवधी रुपयांची कामं कागदोपत्री पूर्ण झाल्याचं
दाखवण्यात आलं, मात्र, प्रत्यक्षात अनेक
ठिकाणी काम सुरूही झालेलं नाही, याकडे बंब यांनी लक्ष वेधलं,
ते म्हणाले...
बाईट
- आमदार प्रशांत बंब
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
शहर आणि जिल्ह्यात विद्युत सेवा देणाऱ्या संस्था बिलासाठी काम करतात, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते
छत्रपती संभाजीनगर इथं काल पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, रोहित्र दुरुस्ती
आणि वाहतुकीच्या खर्चाचा भार संबंधित एजन्सी किंवा महावितरणकडेच आहे, त्यामुळे नादुरुस्त किंवा दुरुस्त रोहित्रांच्या
वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी कंत्राटदाराशी किंवा कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नये,
असं आवाहन वीज महावितरणने केलं आहे.
****
हवामान
छत्रपती
संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात काल काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येत्या दोन
दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
आहे. हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment