Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· सामुहिक निर्धारातून होतं परिवर्तन- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, मन की बातमध्ये केला पाटोदा ग्रामपंचायतीच्या कार्याचा गौरव
· देशवासीयांनी बौद्ध स्थळांना भेट देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
· प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठांची - सरन्यायाधीश भूषण
गवई
आणि
· पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीचा
बहिष्कार
****
लहान-लहान सवयी जेव्हा सामुहिक निर्धाराचं रूप घेतात तेव्हा
फार मोठं परिवर्तन घडणं निश्चित असतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे तेविसाव्या भागात आज ते
बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा गावानं
स्वच्छतेसाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी या संदर्भात गौरवपूर्ण उल्लेख
केला. ते म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोक-सहभागाच्या ताकदीच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना
करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
आणीबाणी लादण्याच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबद्दल ते बोलत होते. यासंदर्भात
मोरारजी देसाई आणि अटल बिहारी वाजपेयी या माजी पंतप्रधानांनी आणीबाणीच्या निषेधात
केलेल्या भाषणांचा अंश ही त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. आंतरराष्ट्रीय योग
दिनानिमित्त यावर्षी विशाखापट्टणम इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमासह, देश आणि परदेशात विविध ठिकाणी झालेल्या अभिनव उपक्रमांचा तसंच त्यातल्या
अभूतपूर्व लोकसहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. जगातल्या मोठमोठ्या
शहरांमधे झालेल्या योग दिन सोहळ्याच्या छायाचित्रांमध्ये शांतता, स्थैर्य आणि संतुलनाचं दर्शन घडल्याचं मत त्यांनी मांडलं. भगवान बुद्धांचे
पवित्र अवशेष विविध देशातल्या जनतेच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले असून त्याकरता
व्हिएतनाम,
थायलंड आणि मंगोलिया इथल्या नागरिकांनी आभाराचे संदेश
आपल्याला पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांनी आपापल्या राज्यातल्या बौद्ध
स्थळांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. दीर्घ काळानंतर सुरू झालेली कैलास
मानसरोवर यात्रा, जुलैमध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा, आगामी श्रावण महिना, भगवान जगन्नाथ रथयात्रा
याचा त्यांनी भक्तिभावाने उल्लेख केला. या यात्रांमध्ये सहभागी होणारे भाविक
म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत भावनेचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले. या
यात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उतरलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला
यांच्यासोबत झालेल्या संवादाविषयी देखील पंतप्रधानांनी श्रोत्यांना सांगितलं.
येत्या एक जुलैला येणाऱ्या डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिनानिमित्त यांच्या कार्याचा
गौरव होणार असल्याचा उल्लेख करत मोदी यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटोदा गावातील आदर्श
उपक्रमांची माहिती आपल्या मन की बातमधून दिली आणि गावाचा गौरव केल्याबद्दल गावच्या
सरपंच जयश्री किशोर दिवेकर यांनी त्यांचे आभार मानले,त्या म्हणाल्या...
बाईट - सरपंच जयश्री दिवेकर
गावचे उपसरपंच कपिंद्र पेरे पाटील यांनी त्यांच्या गावातील
लोकसहभागामुळेच त्यांच्या गावाचा मन की बातमध्ये समावेश होऊ शकल्याचे नमुद केले.
ते म्हणाले...
बाईट - उपसरपंच कपिंद्र पेरे
****
नागपूर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी
अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी
बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी
विद्यापीठाची आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश आणि या
विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी आज केलं. त्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या नवीन
प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत
होते. सर्वांचा सहभाग व समर्पणातून निर्माण झालेल्या या विद्यापीठानं आपल्या
गुणवत्तेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी, असंही त्यांनी नमुद केलं. छत्रपती
संभाजीनगर इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला
असून मुंबई विद्यापीठाच्या उभारणीसाठी जागेची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. येत्या काळात ही तिनही विद्यापीठं पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित
झालेली असतील,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
गैरव्यवहार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तिपीठ महामार्गाला विरोध इत्यादी
मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्य विधिमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या
कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं आज केली. महाविकास
आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर
विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे
विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
आदित्य ठाकरे,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड
यांच्यासह इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यात
सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आणि हे सर्व मुद्दे
विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचं नमूद केलं. राज्यातली वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री का गप्प आहेत, युतीधर्मामुळे
त्यांनी मौन बाळगलं आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे
यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी,बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केलं, तर
मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाचा, मराठी भाषेचा बळी
सरकार देत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. अशा सरकारसोबत चहापानाला
जाणं योग्य नाही, त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतल्याचा पुनरुच्चार या सर्व
नेत्यांनी केला.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि पोलिस प्रशासनानं जालना
मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू होती. या अंतर्गत आज
दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे ४९० अतिक्रमणं काढण्यात आली. या मोहिमेमध्ये कालही
सुमारे ५०० अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी या कारवाईवेळी उपस्थित होते.
****
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी
हवामान विभागानं आज आणि उद्या तर नांदेड, हिंगोली आणि परभणी
जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस पिवळा बावटा जारी केला आहे. यानुसार या भागात मध्यम
स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला
आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तीन जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या होटगी स्टेशन ग्रामपंचायतीनं गावतील
जे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतात त्यांच्या घराचा पूर्ण
वर्षभराचा कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच निलम भोसले यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये मराठी आणि ऊर्दू शाळांना
पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
****
बीडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांनी आज हिंदी विषयाच्या मुद्द्यावर या संदर्भातल्या सरकारच्या आदेशाची
होळी केली. जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या नेतृत्त्वाखाली यावेळी आंदोलन
करण्यात आलं. हिंगोली शहरातही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी
आज गांधी चौक इथं हिंदी भाषेसंदर्भातल्या शासन निर्णयाची होळी करून आंदोलन केलं.
पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय सावंत आणि कार्यकर्त्यांनी यावेळी या संदर्भातल्या शासन
निर्णयाचा निषेधही केला. नाशिक इथंही या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं.
****
प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या जालना इथल्या आनंदी स्वामी
महाराजांच्या यात्रा उत्सवास आजपासून सुरुवात झाली. आषाढी एकादशीच्या दिवशी जुना
जालना भागातल्या या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते.
****
बीडमध्ये विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करणाऱ्या दोन फरार
शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यातल्या मांजरसुंबा इथं काल
मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी २६ जून रोजी
रात्री शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही शिक्षक फरार झाले
होते.
****
No comments:
Post a Comment